♦ सावधान…! अडचणीत याल ! ♦
रोहितच्या मोबाईलवर नेटचा इश्यू आल्यामुळे त्याने आईचा मोबाईल घेतला, त्याचा ऑनलाइन वर्ग चालू होता. काही वेळाने नीलिमाच्या मोबाईलवर मेसेंजर नोटिफिकेशन आले. नीलिमाच्या मुलाने रोहिलने त्या नोटिफिकेशनवर डबल क्लिक केले त्यावरचा मेसेज वाचून तो जोरात ओरडला, “आई, कुणीतरी विचारत आहे, तू कुठे आहे?” रोहितचे पप्पा ‘वर्क फ्रॉम होम’ करत शेजारीच बसले होते त्यांनी ‘वधू आण इकडे मोबाईल’ म्हणून मेसेजर चेक केला. घरात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. निरागस रोहितला काय झालं हेच कळाले नाही पण त्या मेसेजने घरात युद्ध पेटलं आहे.
पंडितला मित्राने अश्लील पॉर्न क्लिप पाठवली होती. कामाच्या गडबडीत ती डिलीट करायची राहून गेली. पंडितच्या मुलीने online अभ्यासासाठी पीपीटी पाहण्यासाठी आपल्या पप्पांचा मोबाईल घेतला व गॅलरीतील काल टीचरने पाठवलेल्या पीपीटी पाहताना, हाताळताना नकळत अश्लील क्लिप सोसायटीच्या ग्रुपवर शेअर झाली. सगळ्यांचे फोन व कमेंट यायला लागल्या. हे काय टाकलंय? पंडितला सोसायटीच्या मित्राने फोन करून ही गोष्ट कळवली. पण बराच वेळ झाल्याने Delete All ऑप्शन येत नसल्याने ग्रुपवरून ती क्लिप डिलीट करता आली नाही. पंडित स्वतःच्या नजरेतून पडला. ‘लोक काय म्हणतील’ या विचाराने त्याला नैराश्य आले आहे. मित्रांनो, पूर्वी मुलं शाळेत जायची. पुरुष मंडळी ड्यूटीवर जायची कोणी कोणाच्या मोबाईलला हातपण लावत नव्हते. अर्थात सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असायचे.
पण आज मुलांची शाळा मोबाईलवर चाललीय व पुरुष मंडळीपणा बरेचजण ‘वर्क फ्रॉम होम’ करताना दिसतायेत. त्यामुळे बऱ्याचदा घरात मम्मीपप्पांचा मोबाईल ऑनलाइन क्लाससाठी वापरला जातोय. लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे तीपण काही चुकीच्या साईट बघून चुकीच्या गोष्टीची शिकार होऊ शकतात. किंवा मित्रमैत्रिणींच्या मेसेजमुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. काही वेळेला मोकळ्या मनाचे मित्र-मैत्रिणी सहजपणे मनात काही नसताना कौतुकाचे चाट करतात किंवा मस्करी करतात परंतु आपल्या घरातील व्यक्ती त्या मेसेजला कशा पद्धतीने पद्धतीन घेईन हे सांगता येत नाही.
आणि अजून एक महत्त्वाचं. तुम्ही मोबाईल कोणाला दिलात किंवा रिपेरिंगला दिलात तरी थोडी काळजी घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये संबंधित व्यक्ती ज्या व्यक्तीला तुमची संपूर्ण माहिती हवी आहे, ती व्यक्ती एखादं सॉफ्टवेअर टाकू शकते. ज्यामुळे तुम्ही मोबाईलवर करत असलेल्या सगळ्या गोष्टी संबंधित व्यक्तीला कळू शकतात व तुमच्या वैयक्तिक आयुष्यात फार मोठी गडबड होऊ शकते.
हे फक्त बाहेरच नाही तर घरामध्येदेखील घडू शकते.
अनेक जणांचे संसार यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यामुळे काळजी घ्या. म्हणजे काळजी करावी लागणार नाही. अर्थात सर्वच बाबतीत. म्हणून पालक मित्रांनो सावधान.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
