पैसा खाता येत नाही, पैशाशी बोलता येत नाही

अवधूत व त्याची पत्नी वारंवार होणाऱ्या कलहामुळे दोघे विभक्त झाले. समझोता करण्याचा अवधूतने खूप प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. परंतु पत्नीने त्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा अवधूतच्या मनावर एवढा गंभीर परिणाम झाला की, त्याने परत संसारात न पडण्याचा निर्णय घेतला. व तो नोकरीनंतर उरलेल्या वेळात वाचन, ध्यानधारणा, समाजसेवा करू लागला. अशातच आईवडील देवाघरी गेले. अवधूत एकटा राहू लागला. हॉटेलमुळे व मेसमुळे त्यांच्या जेवणाची सोय व्यवस्थित होत होती. मेसला तो इतरांपेक्षा जास्त पैसे द्यायचा, त्यामुळे त्याला घरच्यासारखं जेवण मिळत असते. अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. हॉटेल व मेस बंद झाले. घरातून बाहेर निघू नका असा सरकारने आदेश दिला. अत्यावश्यक सेवाही विरळ चालू होत्या. अवधूतला स्वयंपाक येत नव्हता. एक आठवडा त्याने कसाबसा भात, डाळ-खिचडी वर काढला. दोन महिने लॉकडाऊन घरीच राहावे लागणार होते. अवधूतच्या घरात व बँकेत भरपूर पैसे शिल्लक होते. पैशाची त्याला अडचण नव्हती पण नोटा देऊन जेवण मिळणार नव्हते .कोरोनामुळे सर्व घरांचे दरवाजे बंद होते. गप्पा मारायला माणसे उपलब्ध नव्हती. नोटा खाता येत नव्हत्या व नोटांशी बोलताही येत नव्हते अशातच अवधूतच्या घराजवळच शेजारच्या चाळीत राहणारा प्रकाश ज्याला अवधूतनेच कामाला लावले होते त्याचा अवधूतला फोन आला. प्रकाश अवधूतला म्हणाला, “सर, नाही म्हणू नका, निदान लॉकडाऊन संपेपर्यंत तरी मी व माझा मुलगा आपणास डबे पाठवत जाईन. डब्बा आपल्या दाराच्या कडीलाच मी लावत जाईन. तुम्ही तेथेच ठेवत जा. पण माझ्या या सेवेचा स्वीकार करा.” प्रकाशचे हे वाक्य ऐकून अवधूतच्या डोळ्यांत पाणी आले.
प्रकाश हा होतकरू व गरीब कुटुंबातील. तो व त्याची पत्नी दोघेही काम करून घर चालवायची. त्यांना दोन सुंदर मुले होती. घरात व बँकेत नोटांचा भरपूर गठ्ठा बॅलन्स नसला तरी खाऊन-पिऊन हे कुटुंब सुखी होतं. अवधूतला लक्षात आलं, ‘आज माझ्याकडे लाखो रुपये आहेत पण प्रकाशसमोर मी दरिद्री आहे.’ शेवटी प्रकाशच्या कुटुंबाने योग्य ती काळजी घेऊन अवधूतच्या भोजनाची व्यवस्था केली होती. योग्य ती खबरदारी घेऊन अवधूतला त्यांनी जेवण पुरवले होते. प्रकाश पैसेही घ्यायला तयार नव्हता. सर, तुमची सेवा करायची संधी हेच माझ मानधन, असे तो म्हणाला. प्रकाशला अवधूतने बळजबरीने पैसे दिले. पण लाखोपती अवधूतला कोरोनाने सर्वसामान्य प्रकाशची श्रीमंती व स्वतःची गरिबी दाखवली होती. मला काही फरक पडत नाही, माझ्याकडे पैसा आहे. असे म्हणणाऱ्या अवधूतच्या लक्षात आले की पैसा खाता येत नाही व पैशाशी बोलता येत नाही. त्यासाठी माणसांचीच गरज लागते.
मित्रांनो, माणसाने पैसा निर्माण केला. पैशाने माणूस नाही निर्माण केला. बंधु-भगिनींनो ही गोष्ट इथेच संपली नाही तर आता यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा तो तुम्हीच घ्या. कारण भगवान बुद्ध म्हणतात, “तुम्ही तुमचे गुरू आहात…”

“अत्त दीप भवः”

मित्रांनो, खूप काही मिळवलं पण आनंद व्यक्त करण्यासाठी घरातील लोक जवळ नसतील, तर त्याचा काय फायदा?

स्वर्गीय दादा कोंडके त्यांचं एक वाक्य त्यांनी त्यांच्या ‘एकटा जीव’ या पुस्तकात लिहून ठेवलंय ते म्हणतात, “हे ईश्चरा, या जन्मात तू मला पैसा, पद, प्रतिष्ठा सर्व काही दिलं. पण माझ्या जवळची, जिवाभावाची माणसं मात्र माझ्याजवळ ठेवली नाही. पुढच्या जन्मात यातलं मला काही नाही दिले तरी चालेल, पण माझ्या जवळची, जिवाभावाची माणसं मात्र माझ्या जवळ ठेव…..”

खरोखर मित्रांनो,
‘पैसा खाता येत नाही.
पैशाशी बोलता येत नाही.’

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!