प्रत्येकाचे चांगले वाईट दिवस असतात. रात्रीमागून दिवस येतोच तसेच दुःखामागून आनंदही येतच असतो. पण वाईट दिवसात चांगल्याची आशा राखणे आणि चांगल्या दिवसात जुन्या दिवसांचा विसर पडू देऊ नये हे ज्याला जमलं तो जिंकतो. आपल्या तोंडाने कोणाचे वाईट चिंतू नये आणि कोणाला बोलू नये. परिस्थिती एकसारखी राहत नाही, याची जाणीव ठेवली की आपोआपच वागण्याबोलण्याचे संतुलन राखता येते. वडील रेल्वेत कामाला होते. स्टेशनजवळील रेल्वे क्वार्टर्समध्ये आम्ही राहत होतो. बाजूलाच ‘स्लम एरिया’ होता. आमच्या क्वार्टरशेजारी असलेल्या घरात जोराने रेडिओ लागलेला असायचा, माझी परीक्षा चालू असताना माझ्या आईने त्यांना रेडिओचा आवाज बारीक करावयास सांगितला तर त्यांनी अजून वाढवला होता. वडील सांगावयास गेले तर त्या घरातील कर्त्यापुरुषाने व त्यांच्या मुलाने माझ्या वडलांना शिवीगाळ केली होती. “आमच्या घरात आम्ही काय पण करू.” अशी विधाने केली होती. शिवीगाळ ऐकणाऱ्या माझ्या वडिलांची हतबलता मी पाहिली होती. मी लहान होतो. खूप अभ्यास करायचो. त्याच भागात मी एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेलो होतो. भाषण संपल्यानंतर माझ्याभोवती लोकांची गर्दी झाली. स्टेजवरून खाली उतरली, ड्रायव्हरने पुष्पगुच्छ व शाल हातातून घेऊन कारचा दरवाजा उघडला, तोच एक वृद्ध गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन घाईतच माझ्याजवळ आला. व हात जोडत म्हणाला, साहेब, मी तुमच्या शेजारीच रहायचो. तुमचे फोटो पेपरमध्ये बघतो, टीव्हीवर तुम्हाला बघतो. खूप मोठे झालात. साहेब. साहेब आमची परिस्थिती खूप बेकार झालीय. घरात खायला सहा तोंडे, याला नोकरी नाय. पेन्शनवर सगळं चाललंय. साहेब, मला मदत करा.” असं म्हणत त्यांनी मुलाला हात जोडायला लावले. त्यांची आर्थिक हतबलता पाहून मला जुन्या स्मृती जाग्या झाल्या. मी त्यांच्या मुलाला क्रॉन्टॅक्ट सिस्टीमवर कामाला लावले. माझे वडील ‘अरे ला कारे’ करणाऱ्यातले नव्हतेच. त्यामुळे ते शांत राहिले, याचा अर्थ ते बोलू शकत नव्हते असा नव्हता, पण न बोलणाऱ्याला कमजोर समजण्याची चूक आपल्यापैकी अनेक जण करतात. तेव्हा दिवस एकसारखे राहात नाहीत, हे बोलणाऱ्यांच्या लक्षात राहात नाही.
-खरोखर मित्रानो दिवस फिरतात.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
