मानसिक हक्क

 

मी नियमितपणे एका देवळात दर्शनासाठी जात असे. देवळाबाहेर एक भिकारी कायम मदतीसाठी याचना करताना भेटत असे. देवाच्या दारी आलेल्यांना कधी वाटले तर त्याच्या हाती एक-दोन रुपये टेकवायचे आणि पुढे जायचे. देवाच्या दर्शनाला येणारी एक व्यक्ती नियमित यायची आणि जाताना दहा रुपये त्या भिकाऱ्याला देऊन काही न बोलता पुढे निघून जात असे. एक दिवस ही व्यक्ती व्यथित चेहऱ्यानेच देवाच्या दर्शनाला आली होती. नेहमीप्रमाणे दर्शन घेऊन काही काळ तिथे थांबली, आज तिचे मन धाऱ्यावर नव्हते. मग उठून चालू लागली, भिकारी होताच तिथे त्याने नेहमीप्रमाणे हात पसरले. चित्त थाऱ्यावर नसलेल्या या देवाच्या भक्ताचे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्षच झाले होते. तो विचाराच्या तंद्रीत पुढे जाऊ लागला. तसे भिकाऱ्याने हटकले आणि विचारले, “आज मला पैसे दिले नाहीत?” त्याची विचारतंद्री भंगली. तरीही त्याला काही सुचले नाही. तेव्हा या भिकाऱ्याने त्याच्यावर ओरडायलाच सुरुवात केली. बिचाऱ्या त्या व्यक्तीला कळेचना की रोज दिली तरी दयेपोटी केलेली मदत, भीक होती ती. पण त्या भिकाऱ्याने त्याच्यावर आपला हक्कच असल्यासारखी वर्तणूक केली होती.
असाच काही अनुभव शामरावांना आला. शहरात नोकरी लागल्याने शामराव आणि त्यांचे कुटुंबिय गावाहून शहरात येऊन वसले. गावचे मध्यम आकाराचे टुमदार घर होते, घर नीट रहावे म्हणून त्यांनी ते एका कुटुं‌बाला नाममात्र भाड्याने दिले. घर, घराचे अंगण, झाडे यांचीही काळजी आता शामरावांना घ्यायची गरज नव्हती त्यामुळेच ते शहरात निर्धास्त राहिले होते. अधून मधून गावी घरी चक्कर मारायचे पण ते तेवढ्यापुरते होते. या कुटुंबाला त्यांनी घरच्यांसारखे वागवले होते, व्यवहार व्यवहाराच्या जागी ठेवत आपलेपणाचे, माणुसकीचे संबंध जोपासले होते. काही वर्षांनी जेव्हा शामरावांनी या भाडेकरूंना रीतसर घर खाली करण्याची सूचना दिली. तेव्हा मात्र या भाडेकरूंनी अरेरावीची भाषा सुरू केली. कायदेशीर कागदपत्र असतानाही उलट शामरावांना तुम्ही आम्हाला घरातून बाहेर कसे काढता, तेच पाहातो अशी उर्मट भाषा भाडेकरूने वापरायला सुरुवात केली. इतक्या वर्षांचे प्रेमाचे, सलोख्याचे संबंध एका सूचनेनंतर १८० च्या कोनातून फिरले. यात खरेतर शामरावांची काहीच चूक नव्हती, पण त्यांना कायद्याचा आधार घेत त्या भाडेकरूंना घर खाली करायला लावावे लागले.
अशा घटनांमुळे एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचदा लोक आपल्याला काही काळासाठी मिळालेली मदत, वस्तू, वास्तू यावर आपला हक्कच आहे असे समजायला लागतात. पण ती गोष्ट आपली नसते तर आपल्याला मदत म्हणून देऊ केलेली असते. मदत ही देणाऱ्याच्या विचारांवर, भावनेवर, देण्याच्या दानतीवर, ऐपतीवर आणि मुख्य म्हणजे इच्छेवर अवलंबून असते ही गोष्ट मदत घेणाऱ्यांना लक्षात नसते किंवा ते सोयिस्करपणे विसरून जातात. एक प्रकारे ते या गोष्टींना आपला हक्कच समजू लागतात.
गुलाबने स्वतःची एनजीओ काढली होती. त्याअंतर्गत अनेकांना मदतीचा हात द्यायचा. एनजीओ ही संस्था समाजातल्या दानशूर लोकांच्या मदतीने चालणारी संस्था असते. अशा संस्था चालवणे हे अनेकदा अवघड होते कारण समाजाकडून येणाऱ्या मदतीच्या आधारे, काही वेळा शासनाकडून येणाऱ्या मदतीच्या आधारे त्या चालतात. या संस्था स्वतः काही कमाई करत नाहीत त्यामुळे समाजातल्या दानशूरपणाची कसोटी लागते. गुलाब ने अशीच एनजीओ सुरू केली होती, जयंतीभाई तिचे मुख्य आधारस्तंभ होते. ते नियमित संस्थेला प्रति महिना पाच हजार रूपये द्यायचे. पाच वर्षांपासून हा शिरस्ता नियमित सुरू होता. त्यामुळे संस्थेची काही कामे मार्गी लागत होती. गुलाबही त्यामुळे निर्धास्त झाला होता पण त्याच वेळी तो हे विसरला होता की जयंतीभाई जे करत होते ती मदत होती. ती त्यांना जमेल तशी, हवी तेव्हा आणि शक्य असेल, जमणार असेल तरच करणार होते. सुदैवाने पाच वर्षात जयंतीभाईंच्या मदतीत खंड पडला नव्हता. ते व्यावसायिक होते, उत्तम व्यवसाय सुरू होता, पुढे मुलाने व्यवसाय उत्तम चालवला होता. परंतू व्यवसायात चढउतार तर ठरलेलेच असतात. त्याप्रमाणे जयंतीभाईंच्या मुलाच्या बाबतीत झालं. व्यवसायात त्याला आर्थिक अडचण येते, त्यामुळे तो संकटात सापडतो. मग जयंतीभाई त्याला आर्थिक मदत करायचे ठरवतात. तेव्हा गुलाबच्या एनजीओ ला प्रतिमहिना देत असलेल्या पाच हजार या रकमेत कपात करून ते गुलाबला प्रतिमहिना एक हजार रूपये द्यायचे ठरवतात. जयंतीभाई दुसऱ्या दिवशी गुलाबकडे येतात. त्याला परिस्थितीचे आकलन करून देतात आणि सांगतात की मी तुला आत्तापर्यंत प्रतिमहिना पाच हजार रूपये देत होतो पण आता मी तुला एक हजार रूपयेच देणार आहे. कारण आता मला घरात मुलालाही आर्थिक मदत करावी लागणार आहे. त्यामुळे एनजीओ च्या मदतीत मी कपात करणार आहे.
यावर गुलाब नाराज होऊन शेठजीना म्हणतो की, “शेठ मुलाला देण्यासाठी माझा हिस्सा का कमी करता? मलाही एनजीओ चालवायची आहे ना. तुमच्या मुलाला स्वतःची सोय करायला सांगा ना.”
शेठजीच्या डोळ्यात आश्चर्य लपून राहू शकले नाही. शेठजी स्वतःहुन मदत करत होते. ती काही त्यांची जबाबदारी नव्हती, समाजाप्रती आपले कर्तव्य म्हणूनच शेठजी त्याकडे पाहात होते. पाच वर्षांच्या सातत्याने गुलाब त्याच्याकडे मानसिक हक्क म्हणून पाहू लागला. वास्तविक एनजीओकडे एकच एक व्यक्ती, संस्था मदत करत नसतात. मुळातच एनजीओ या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालवल्या जातात. त्यामुळे त्यांना मिळणारी मदत ही कायमस्वरूपी असतेच असे नाही. एनजीओच्या कामाची दखल घेत त्याचे महत्व जाणून घेऊन समाजातील लोक, संस्था त्यांना मदत करतात. मात्र ती मदतच असते हे महत्त्वाचे असते आणि गुलाब तेच विसरला होता
सातत्याने पाच वर्ष मिळणाऱ्या मदतीविषयी कृतज्ञ राहताराहता तो त्याचा मानसिक हक्कदार झाला होता. त्याला दर महिना मिळणारे पाच हजार रुपये हक्काचे वाटू लागले आणि तिथे गफलत व्हायला सुरुवात झाली होती.
मित्रांनो, अनेकदा आपण मिळणाऱ्या मदतीला हक्क मानून गोष्टी गृहीत धरू लागतो. त्यात हे विसरतो की जबाबदारी, कर्तव्य आपले असते. ते सुलभ व्हावे म्हणून दुसऱ्याने स्वतःहून केलेली ती मदत असते. त्यावर आपण हक्क सांगून कसे चालेल. अशा मदतीवर हक्क सांगणाऱ्या हे सत्यकथन पचवणे जड जाते आणि मग माणसे एकमेकांवर रागावतात, नाराज होतात. एकमेकांविषयी गैरसमजही बाळगतात.
प्रसिद्ध शायर कवी गुलजार त्यांच्या शायरीतून हेच सांगू पाहतात, ते म्हणतात,

 

“झूठ कहूँ तो लफ्जों का दम घुटता है।
और सच कहूँ तो लोग खफा तो जाते है ।”

 

मदतीला हक्क समजणाऱ्यांना खोटे सांगू शकत नाही आणि त्यांना खरे सांगितले तर नाराजी ओढवून घ्यावी लागते.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!