एक प्रसिद्ध नाटक, नटसम्राट. जुने आहे पण नव्या स्वरूपात म्हणजे चित्रपट म्हणूनही साकार झाले आहे. बहुतेकांनी हा चित्रपट तर नक्कीच पाहिला असेल. त्यात पोटची मुलंच आईवडिलांशी कशा पद्धतीने वागतात ते पहायला मिळालं. एका उत्तम नटाने त्याच्या मुलांवर ठेवलेला विश्वास त्यांनी धुळीत मिळवत सारे पदरात पाडून घेतले त्याचे विदारक चित्र या नाटकातून पहायला मिळते. नाटक म्हणून नाही, पण समाजात आज अशीच अवस्था पहायला मिळते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. नेमका त्याचाच घात होतो आणि पदरी पडते ती जन्मभराची अक्कल! सावधान! कोणापासून तर सगळ्यांपासून सावध रहा. विश्वास हा कधीच पानिपतात गेला म्हणतात तो मानवी नात्यांमधूनही हरवत चालल्याचे दृश्य आपल्याला दिसते आहेत. हे नाटक खूप वर्षांपूर्वी लिहिलेले असले तरीही ही चित्रे आपल्याला समाजात दिसताहेत. पण तरीही आपण सावध रहात नाही ना!
लोक म्हणतात बदाम-अक्रोड खाल्ल्याने बुद्धी वाढते; पण मला वाटते की बदाम, अक्रोड खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अक्कल विश्वासघात झाल्यावर येते. ‘नटसम्राट’मध्येही बापाने पोरांच्या प्रेमापोरी आपल्याकडचे सगळे दिले आणि शेवटी त्याच्या नशिबी आला पोटच्या पोरांचा विश्वासघात !
जमीन जुमल्यांच्या वाटण्यांमधून भाऊ भावाचे वैरी होतात, एकत्र नांदती कुटुंबांत उभा दावा निर्माण होतो. सोने पिकवणाऱ्या काळ्या मातीचे तुकडे होतात, ते विकून पैसा केला जातो किंवा इमले उभारले जातात. नातेसंबंध दुरावतात. सख्या भावाबहीणीत वितुष्ट येते ते संपत्तीच्या हक्कावरून मग बहीण भावाचे नाते उरत नाही, मुलांना मामा मिळत नाही. संबंध अधिकाधिक दुरावतात. बहीणभावाने एकमेकांवर ठेवलेला विश्वास दुरावतो पैसा हा बऱ्याचवेळा वैर निर्माण करतो हे जरी खरे असले तरी पदरचे सर्व उधळून लावण्यातही काही अर्थ नसतो. ज्यांच्यावर डोळे झाकून पूर्ण विश्वास ठेवलेला असतो त्याच व्यक्ती विश्वासघात करतात म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही साथ देणार नाही, असा एक व्यावहारिक विचार प्रत्येकानेच करायला हवा. आपल्याकडे नैतिक मार्गाने कमावलेला पैसा जरूर सांभाळून ठेवावा. सुखे पायाशी लोळण घालतील ही अव्यवहार्य अपेक्षा न ठेवता म्हातारपणी शेवटपर्यंत गरजेच्या सोयीसुविधा मिळवता येतील इतका पुरेसा पैसा आपल्या गाठीशी प्रत्येकाने ठेवला पाहिजे.
“दिमाग को उतना ही सुकुन मिलता हैं। जितना पैसा अकाऊंट में बॅलन्स होता है ।”
वर दिलेल्या ‘नटसम्राटां’च्या उदाहरणाप्रमाणे व्यवहारी होत चाललेल्या या जगात पटकन् कोणावरही विश्वास न ठेवता अगदी पोटच्या मुलांवरही विश्वास न ठेवता आपला काही पैसा राखून ठेवा. निवृत्तीच्या वयातही आपली सर्व संपत्ती इतरांच्या नावे करण्याची घाई करू नका.
आपल्या समोरचे जेवायचे ताट द्यावे; पण बसायचा पाट देऊ नये हे कायमच लक्षात ठेवा. नात्यांच्या पाशात न अडकता, भावनेच्या आहारी न जाता आपल्या मृत्यूनंतर गोष्टी जरूर देऊन टाकाव्या, त्यासाठी इच्छापत्रासारखा सुलभ आणि सुरक्षित मार्ग निवडावा. भावनेच्या भरात निर्णय घेण्याने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला जाईल.
एक आईवडील सोडले तर सर्वच नाती पैशाने तोलली जातात. वेळप्रसंगी ती तुटतात. हल्लीच्या काळात तर आईवडीलांविषयीही व्यावहारिक प्रेम वाटण्याचे दिवस आहेत.
मध्यंतरी एक घटना कानावर पडली होती आईवडिलांनी अफाट कष्ट केले होते. संसार फुलवला होता, त्यावर एक मुलगारूपी फळही लागले. आईवडिल दोघेही सामान्य परिस्थितीतून झगडत स्थिरावले होते. पण त्यांचा निश्चय होता की मुलाला आपण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. तिघांच्या संसारात दोघे वेगवेगळ्या प्रकारे बचत करून पैसा बाजूला टाकत होते. मुलगाही हुशार आणि मेहनती होता. त्यांने आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवत शाळा, महाविद्यालयात उत्तम गुण मिळवत कायमच नंबरातले स्थान पटकावले होते. आईवडिलांची मेहनत रंग आणत होती. मुलगाही उच्च शिक्षण घेत होता तिथेही अव्वल येत होता. वर्ष सरली मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला उत्तम ठिकाणी नोकरी मिळाली आणि काही वर्षात त्याला परदेशी स्थायिक होण्याची संधी मिळाली. आईवडिलांना त्यांच्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना निर्माण झाली. मुलगा दूर असला तरीही आयुष्यभराच्या कष्टाचे चीज झाले होते. यथावकाश मुलगा तिथे स्थायिक झाल्यानंतर त्याने तिथेच ऑफिसमध्ये नोकरीला असलेल्या मुलीशी लग्न केले. इकडे आईवडील एकमेकांच्या साथीने आठवणींवर दिवस काढत होते. मुलगा आधी नियमित फोन करून चौकशी करत असे, आता त्याचे प्रमाण कमी झाले होते. आईवडील तरीही मुलाच्या फोनच्या आशेवर राहात होते. एकदा मुलाने भारतात येण्याचे ठरवले.आल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस घालवल्यानंतर आईवडिलांना एका ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेत घेऊन गेला त्याच्या बरोबरीच्या व्यक्तीबरोबर राहिलात तर वेळ जाईल तेव्हा इथे अधून मधून रहा असे सांगून मुलगा गेला काही दिवसांनी आईवडिल परत जायचे म्हटले तेव्हा त्यांना संस्थाचालकांकडून कळले की मुलांने त्यांची आयुष्यभराची सोय इथेच केली आहे आणि त्यांचे राहाते घर विकून टाकले आहे
मुलाच्या येण्याने आनंदी झालेले आईवडील एकदमच कोसळले, त्यांना प्रचंड धक्का बसला. मुलाने परदेशात घर घेण्यासाठी कमी पडत असलेले पैसे जमा करण्यासाठी आईवडिलांना त्यांच्याच श्रमातून उभारलेल्या घरातून अशा प्रकारे बाहेर काढले होते. त्यांच्याशी स्पष्ट न बोलता आता आईवडिलांना उलगडा झाला मुलगा अचानक न कळवता देशात आला, त्याने आईवडिलांना न सांगताच सर्व नातेवाईकांकडे नेऊन आणले, जिथे जाण्याची इच्छा होती तिथे फिरवून आणले होते पण त्यांना एक चूक लक्षात आली ती त्यांनी सही केलेल्या कागदाची. मुलावर आंधळा विश्वास ठेवून त्याच्या गोड बोलण्याने भुलले आणि त्यांनी राहातं घर त्याच्या नावावर करून दिलं होतं. त्याचाच फायदा मुलाने उचलला होता. आता पश्चातापाशिवाय त्यांच्या हाती काहीही राहिले नव्हते.
वासुदेवाची ऐका गाणी जगात नाही राम रे,
दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे.
असे कुणीतरी लिहून ठेवले आहे ते अनुभवातूनच आजूबाजूला जरा उघड्या डोळ्यांनी पाहिले तर अशी अनेक उदाहरणे दिसतील. सर्वच जण त्यांचे अंत करण खुले करत नसले तरीही दाम करी काम हा अनुभव नक्कीच प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या बाबतीत आलेला असतो.
समर्थ रामदास म्हणतात, “आधी ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण – सर्वांविषयी”
त्यामुळेच शहाणे व्हा आणि कर्तव्य पार पाडताना स्वतःला साईडट्रॅक करू नका उलट स्वतःला न विसरता प्राधान्य द्या.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
