सर त्याचं लफडं आहे!

 

निसर्ग हा अफाट असतो, त्याच्या लीलेचे अगाध रूप म्हणजे माणूस. निसर्गाचे हे रूप अगदीच आगळेवेगळे आहे. निसर्गाच्या या लीलेची दोन उपरूपे म्हणजे स्त्री आणि पुरूष. या दोन्ही रूपांमध्ये फरक ही फार वेगवेगळा. तसेही मानवी मनाचे, वर्तणुकीचे अनेक प्रकार आपल्याला पहायला मिळतात. पण स्त्री आणि पुरूष ही दोन रसायने काही आगळी वेगळी आहेत. या दोन्ही रूपांमध्ये वेगवेगळे भावबंध पहायला मिळतात. त्यातील नवरा बायको हे बंध जरा आगळे आणि आव्हानात्मक असतात.
सीमा वडिलांच्या घरी माहेरी आली होती. नवऱ्यावर रागावूनच ती माहेरी आली होती. तिच्या नवऱ्याचे बाहेर प्रकरण आहे म्हणून चिडलेल्या सीमाला त्याच्यापासून सोडचिट्टी घ्यायची होती. कोणत्याही पत्नीला आपला नवरा प्रामाणिक, एकपत्नीव्रती असावा असे वाटते, त्यात चूकही काही नसते. कारण स्त्रियांना एकपत्नीव्रताचे महत्त्व लहानपणापासूनच शिकवले जाते, साहाजिकच त्यांची पतीकडूनही तशीच अपेक्षा असते. सीमाच्या बाबतीत मात्र तिची ही अपेक्षा काही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे सीमा चिडली होती आणि तिने नवऱ्याला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. सीमा मला भेटली तेव्हा मला तिची मागणी रास्त आहे हे कळत होत होते मला निसर्गाची करणीही माहीत होती.
स्त्री आणि पुरूष म्हणून निसर्ग दोन वेगळ्या प्रकारे काम करतो मानसशास्त्रीय अभ्यासातूनही हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये काही हार्मोन्सचा फरक असतो हार्मोन्स म्हणजे शरीरातील निरोप्या असतात त्यामुळे शरीरांतर्गत अवयवयांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यास मदत होते. शरीराची वाढ, विकास, चयापचय, मनोवस्था आणि महत्त्वाचे म्हणजे लैंगिक कार्य आणि पुनरुत्पादनाचे कार्य हे सर्व हार्मोन्समुळे सुरळीत सुरू असते. पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक महत्त्वाचे कार्य करत असते ते स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात स्त्रवते. हे संप्रेरक लैंगिक भावना उद्दीपित करण्याचे कार्य करते. त्यामुळेच पुरुषांचे एकपत्नीव्रती असण्याची अपेक्षा अर्थातच पूर्ण होणे थोडे कठीण असते.
टेस्टेस्टेरॉन नावाच्या संप्रेरकामुळे लैंगिंक भावना वारंवार उत्तेजित होते. काही पुरुष वारंवार सेक्सच्या विचारात गर्क असतात. अनेकदा स्त्रियांच्या बाबतीत मजेने असे म्हटले जाते की स्त्रीचे मेंदू व मन छोटे असते. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांच्या नवऱ्याचे स्थान महत्त्वाचे असते फारतर एखाद्या मित्राला तिथे जागा असते. परंतु पुरुषाचे मनाची गोष्ट मात्र वेगळी आहे कारण पुरुषांचे मन फार मोठे आहे असे म्हणतात. त्यामुळे एकाच वेळी त्यांच्या मनात अनेक जणींना स्थान मिळू शकते. म्हणजे एखाद्या पुरुषाच्या मनात बायको, बायकोची मैत्रीण, मेव्हणी, स्वतःची मैत्रीण, मुलांची शिक्षिका, शेजारीण, वरची, खालची शेजारीण, ऑफिसमधली सहकारी, मित्राची मैत्रीण, मित्राची बायको आणि घरात कामाला येणारी मोलकरीणसुद्धा पुरुषांच्या मनात जागा मिळवते. साहजीकच पुरुष एकाचवेळी अनेक बायकांच्या विचारात राहू शकतात, त्यामुळेच पुरुष एक्स्ट्रॉ मॅरिटल अफेअर करतात किंवा विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्यामुळे पुरुष व्याभिचाराकडे जास्त वळतो. हे ऐकून सीमाच्या वडिलांनीही मान हलवत त्याला दुजोरा दिला.
अर्थात सर्वच पुरुषांना एकाच तराजूत तोलण्यात अर्थ नाही, कारण काही पुरुष याला अपवाद असतात. ते एकपत्नीव्रत असतात. तर काहींच्या पुर्वायुष्यात मैत्रिणी असतात मात्र लग्नानंतर ते पत्नीशीच एकनिष्ठ असतात. निसर्गतः स्वी पुरुषांमधील हा भेद आपण समजून घेतला पाहिजे. याचा अर्थ व्यभिचाराला मान्यता द्यायची असा बिलकूल नाही. पण त्यासाठी लहानपणापासून काही गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवण्याचे काम करावे लागेल.
सीमाच्या बाबतीत मी तिला हेच सांगितले की सोडचिठ्ठी दिल्याने प्रश्न नक्की सुटणार आहे का? समजा सोडचिड्डी दिली तर दुसरे लग्न करतानाही मनात साशंकता असेल, दुसरा पुरुषही एकपत्नीव्रती निघेल याची काय गॅरंटी. पुन्हा घटस्फोट घेऊन बाईने दुसरे लग्न करण्यातही अनंत अडचणी येत राहतात. त्यातही बाईला अॅडजेस्टमेंट करावी लागणारच. मग त्या पेक्षा तुझ्या नवऱ्याला आपण समुपदेशन करुया. समुपदेशनाचे काही सत्र पार पडल्यानंतर ध्यानधारणा, मनावर नियंत्रण मिळवण्याच्या काही उपायांनी त्याला समजावून सांगू शकतो. सविस्तर बोलणे झाल्यानंतर सीमाने विचारांती घटस्फोटाचा निर्णय बदलला. सीमाने नवऱ्याला या सवयीपासून दूर राहण्यास मदत करावी, त्याला प्रेम देत सांभाळून घ्यावे. टोचून बोलणे, टोमणे मारणे टाळावे जेणेकरून तो अपराधगंड बाळगणार नाही. सीमानेही हे सर्व मान्य केले आणि ती नवऱ्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!