नमस्कार तुमच्या खुर्चीला

दैनंदिन आयुष्यात आपण कशाला मान द्यायचा हे प्रत्येक जण ठरवत असले तरीही काही पदे ही मानाची असतात. तो मान त्या पदाचा, खुर्चीचा असतो. त्या पदावरून पायउतार होताच व्यक्तीचा मान दुसऱ्याच दिवशी कमी होतो.
ब्रिगेडियर जोसेफ यांना नामांकित अशा मॅनेमेंट इन्स्टिट्युटच्या मुलांना लेक्चर देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ब्रिगेडियर जोसेफसाहेब सरकारी दिव्याच्या गाडीतून उतरताच इन्स्टिट्युटच्या डायरेक्टर साहेबांनी त्यांना भलामोठा गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यांना स्वतःच्या ऑफिसमध्ये नेऊन स्वतःच्या खुर्चीवर बसवले व आकर्षक अशा कपात त्यांना चहा देण्यात आला व ऑडिटोरियममध्ये त्यांना टाळ्यांच्या गजरात सोडण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतरदेखील त्यांना गाडीपर्यंत सोडवण्यासाठी संस्थेची मंडळी थांबली होती. जोसेफ साहेबांचे नोकरीचे हे शेवटचे वर्ष होते. साहेब रिटायर झाले. नेहमीप्रमाणे साहेबांना नवीन बेंचसाठी लेक्चरला बोलावण्यात आले.
मात्र यावेळेला ते सेवानिवृत्त असल्याने त्यांना सरकारी दिव्याची गाडी नव्हती. ते स्वतःच्या कारमधून उतरले. आता त्यांना रिसिव्ह करायला इन्स्टिट्युटचे डायरेक्टरही नव्हते. ते स्वत हुन चालत ऑडीटोरियममध्ये आले तेव्हा तिथल्या को-ऑर्डिनेटरने त्यांना रिसिव्ह केले. थोड्यावेळाने एक मुलगा त्यांना चहा आणि पाणी घेऊन आला. पण यावेळी चहाचा कप थर्माकोलचा होता.
साहेबांनी या कपाकडे पाहिलं व त्यांना ते ब्रिगेडियर म्हणून मागच्या वर्षी खुर्चीवर असताना त्यांना मिळालेला मान व चहाचा आकर्षक कप आठवला. त्यामुळे साहेब या थर्माकोलच्या कपाकडे मनोमन हसले व मनाशीच म्हणाले जोसेफ “भौतिक जगात मान तुम्हाला नाही तर तुमच्या खुर्चीला असतो.”
आपल्या समाजात व्यक्तीपेक्षा खुर्चीला मान अधिक असतो हे काही नव्याने सांगायला नको.
त्यामुळे कोणत्याही पदावरील व्यक्ती असली तरीही हे भान कायम बाळगले पाहिजे की जोपर्यंत पदाची खुर्ची आहे तोपर्यंतच मिळणारा मान, मरातब कायम राहाणार आहे. त्यामुळे खुर्चीची गुलामी न करता आपल्यातील चांगला माणूस कायमच जागता ठेवलाय पाहिजे.
विशेषतः शासकीय, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात तर खुर्चीला कायमच वेगळा मान मिळतो. त्या खुर्चीवर कोण बसलंय ही बाब अत्यंत गौण असते. त्यामुळे खुर्ची तीच राहाणार आणि तिच्यावरचा माणूस बदलला की मिळणारा मान आपोआप तिकडे जाणार हेही ठरलेले, त्यामुळे खुर्ची आहे तोपर्यंत मनमानी करू हा दृष्टिकोनही चुकीचा आहे कारण त्याने लोक नावजण्यापेक्षाही नावे ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे.
माझा एक पत्रकार मित्र नेहमी बढाया मारत सांगायचा, हा अमुक आमदार मला फोन करतो, हा नगरसेवक मला जेवायला बोलावतो. तो अमुक अधिकारी मला खूप मानतो. हा मित्र ज्या वर्तमानपत्रामध्ये कामाला होता त्यासाठी हे सर्व लोक त्याला भाव देत होते हेच तो विसरून गेला होता. काही कालावधीनंतर या मित्राला त्या वर्तमानपत्रातून काढून टाकले. ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही एकतर नोकरी गेल्याने हा मित्र निराश झाला होता तो नोकरी शोधण्यासाठी त्याच्या याच मानणाऱ्या मोठ्या ओळखीच्या लोकांना फोन करू लागला, पण त्याचे फोन कोणीही उचलत नव्हते तेव्हा त्याच्या लक्षात आले, हे जे लोक त्याला खूप मानत होते, कोणी जेवायला बोलवत होते ते फक्त त्याच्याकडे असलेल्या पेपरमधील पदामुळे. त्याच्याकडून आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून या सर्वांनी त्याला जवळ केला होता.
मित्राला कळले की नमस्कार, मान, आदर हा सर्व त्या खुर्चीला होता त्यामुळे एका विशिष्ट पदावर असताना लोक त्याच्यासमोर झुकत होते एकदा जेव्हा हे पद त्याच्या हातून गेले या लोकांच्या लेखी त्याची किंमतही शून्य झाली होती. त्यामुळे केवळ आपल्याला खुर्चीने अधिकार मिळाला त्याचा गर्व न करता चांगुलपणा कायम ठेवून लोकांबरोबर वागा. तेव्हा लोक तुमचा आदरच करतील.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!