जगातील सर्वात श्रीमंत अशा नऊ उद्योगपतीची अमेरिकेतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली. प्रत्येक जण आपल्या व्यापारातला अतिश्रीमंत उद्योगपती. एक जण हिऱ्यांचा जागतिक व्यापारी, दुसरा जागतिक स्तरावतील गॅस उत्पादक अग्रेसर उद्योगपती, तिसरा जागतिक स्तरावरील तेलाचा व्यापारी. थोडक्यात मोठमोठ्या उद्योगपतीची मांदियाळीच जणू तिचे लाभली होती.
त्यानंतर सुमारे तीस वर्षांनी एका संस्थेने या नऊ उद्योगपतींचा अभ्यास करण्यासाठी एक सर्वे केला. त्यातील दोन जण हार्ट अटॅकने मृत्यू पावले होते तर ३ जण पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जाऊन खच्ची झाले होते. २ जण तुरुंगात गेले होते आणि दोघांनी तर आपले जीवन आपल्याच हातांनी संपवण्याचा निर्णय घेतला होता.
वास्तविक हे सर्वच उद्योगपती प्रतिष्ठित, श्रीमंत होते. पैसा-अडका भरपूर होता, मनात आणलं असतं ते काहीही करू शकत होते. तरीही त्यांची अशी अवस्था का बरे झाली असावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने याविषयी अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की या सर्वांनी त्यांचे लक्ष फक्त पैसा कमवणे यावरच ठेवले होते.
सतत आणि भरपूर पैसा कमावण्याच्या नादात त्यांनी स्वतःचा विचार केला नव्हताच पण कुटुंब, आप्तेष्ट यांचाही विचार केला नव्हता किंबहुना त्यांचा त्यांना विसरच पडला होता. पैशासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे पैसा कमावण्याच्या ध्येयाचा अतिरेक केला होता. पैसा कमावणे आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन न साधता आल्याने त्यांच्या वाट्याला दुःखच येत होते.
थोडक्यात काय तर संतुलन फार महत्त्वाचे असते. विणेची तार जरा जास्त ताणली गेली तर ती तुटते व कमी ताणली गेली तर वीणा वाजतच नाही. म्हणूनच वीणा वाजवताना विणेकरी तार मध्यम ताणतो त्यामुळे जीवनातील सर्व अंगांचे व्यवस्थापन करताना संतुलन साधले तर तुमच्या जीवनाचे सुख यातच सामावले असेल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
