भपक्याला भुलू नका

          सीए झालेल्या मेघनाला बघायला स्थळ आले होते. नवरा-बायको दोघेही डॉक्टर व त्यांचा मुलगाही डॉक्टर आहे. असे ते सांगत होते. येताना त्यांनी पन्नास लाखांची ‘ऑडी’ कार आणली होती. बोलताना त्यांनी आमचे दोन मजली स्वतःचे हॉस्पिटल व गावाकडे २० एकर जमीन असल्याचे मुलीच्या वडिलांना सांगितले. चौकशी अंती ‘ऑडी’कार त्यांच्या चुलत भावाची असल्याचे कळले. व हॉस्पिटलवर भले मोठे कर्ज असून बँकेने त्यांच्यामागे कर्ज फेडण्याचा तगादा लावला असल्याचे कळाले व २० एकर जमीन ही चार भाऊ व दोन बहिणीमध्ये विभागून होती. त्यांच्या मुलाने देखील वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा न करता आल्यामुळे मध्येच सोडून दिला होता. डॉक्टर दांपत्य नुसता भपका करत होते.

 

           आणखी एक घटना… प्रशांत घरंदाज उच्चशिक्षित तरुण, स्वतःचे वर्कशॉप टाकून कारखान्यांना छोटे छोटे पार्ट सप्लाय करायचा. प्रशांत दिसायला अत्यंत राजबिंडा व निर्व्यसनी होता. दामू शेठने प्रशांतच्या वडिलांना प्रशांतच्या लग्नाबाबत विचारणा केली. दामू शेठ फार मोठा उद्योगपती होता. त्यांच्या महागड्या गाड्या व ऐश्वर्य पाहून प्रशांतचे वडील बेहद खुश झाले. प्रशांतच्या मागे लागून दामू शेठच्या मुलीबाबत तगादा लावला व शेवटी प्रशांत दामू शेठचा जावई झाला. आणि लग्नानंतर दामू शेठच्या मुलीला स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार असल्याचे उघडकीस आले.
मित्रांनो, अलीकडे लोक भपकेबाजीबाबत खूप आघाडीवर आहेत जनताही भपकेबाजीला बळी पडू लागली आहे. महाकवी ज्ञानयोगी सुधाकर गायधनी यांची खूप गाजलेली कविता आहे,

 

          “आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरता फिरकेना, आम्ही सोनं पांघरून, चिंध्या विकायला बसलो, गर्दी पेलता पेलवेना.” त्यामुळे भपकेबाजीला जग भुलू लागले आहे.
मित्रांनो, मुलीचं लग्न ठरवताना सांगोवांगीच्या गोष्टीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष चौकशी करून खात्री करा. थोडा वेळ लागला तरीही ज्या कुटुंबात लग्न करून देणार आहात त्यांची आर्थिक, सामाजिक, आरोग्याची माहिती मिळवा. चार लोकांकडे चौकशी केल्याशिवाय पुढे जाऊ नका. पसंती झाली तरीही मुला मुलीला भेटू द्या, एकमेकांना जाणून घेऊ द्या.
लग्नात फसवणूक झाल्याने मोडणारी लग्न नैराश्याकडे नेऊ शकतात. तेव्हा श्रीमंतीच्या भपक्याला न भुलता चौकशी केल्याशिवाय पुढचे पाऊल उचलू नका.

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!