राग हा माणसाचा शत्रू आहे. अनेकदा रागाच्या भरात आपण जे वागतो त्याचा नंतर पश्चाताप होतो पण गोष्ट पुन्हा पहिल्यासारखे होणे शक्य नसते. मित्रांनो येरवडा जेलमध्ये ज्या वेळेस कैद्यांसाठी तणाव मुक्तीच्या कार्यशाळा मी घेत असतो, अनेक उच्चशिक्षित सुसंस्कृत घरातील मुले मला तेथे भेटतात. केवळ क्रोधावर ताबा न ठेवल्यामुळे त्यांच्याकडून मोठा गुन्हा घडलेला असतो आणि त्यांना आयुष्यभर तुरुंगात रहावे लागते. स्वतःला ‘डॉन’ म्हणवणारे गुंड जेलमध्ये गेल्यानंतर पश्चात्तापाने होरपळत असताना मी पाहतो. बाहेर गुंडगिरी, दमदाटी करणारे गुंड जेव्हा पोलिस कस्टडी व शिक्षा भोगतात तेव्हा ते मांजर होऊन जातात. त्यामुळेच मित्रांनो क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. क्रोधाचा एक क्षण जीवन उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यानधारणा ही काळाची गरज आहे.
विनाकारण त्रास देत असेल तर शक्यतो मारामारीच्या फंद्यात न पडता कायदेशीर बाबींचा आधार घेणे, कायद्याची मदत घेणे ही आज काळाची गरज आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये कायद्याविषयक माहिती मिळवणे व त्या माहितीचा यथायोग्य वापर करणे ही आज आवश्यक अशी गोष्ट आहे. अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते माझ्या मुलाला गुंडांना भीत जाऊ नको, त्यांना नमवणे खूप सोपे असते हेही शिकवा असे म्हटले होते. म्हणून क्रोधाचा त्याग करा व लोकशाही मार्गाने पुढे चला.
गीतेत म्हटले आहे, “क्रोधात भवति संमोह । संमोहात स्मृतिविभ्रम । स्मृतिभ्रंशात बुदद्धीनाश । बुद्धीनाशात प्रणश्यति ।।” (क्रोधामुळे व्यक्तीचा विवेक सुटतो, तो सुटल्यामुळे स्मृतिदोष जडतो, स्मृतिदोषामुळे बुद्धिनाश होतो व त्यामुळे व्यक्तीचा विनाश होतो.) क्रोधामुळे मनुष्य हिंसक बनतो. त्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्ये घडू शकतात.
क्रोधामुळे व्यक्तीला रक्तदाबाचे विकार बळावतात. त्याची मज्जासंस्था दुर्बल होते. मनुष्य समाजापासून घरापासून दूर फेकला जातो. त्याच्या जीवनात अपयश येते. क्रोध विचारात विसंगती आणतो व त्या मनुष्याची वाटचाल नैराश्याकडे होते. क्रोधामुळे डोळे लाल होणे, छातीत धडधडणे, नाकपुड्या फुगणे, शरीर थरथरणे, अन्नावरची वासना उडणे, रक्तातील साखर वाढणे, अल्सर, हृदयविकार उद्भवणे. असे अनेक दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.
तेव्हा क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनावर ताबा ठेवा. रागाच्या भरात एखादे कृत्य केल्यानंतर आपल्या मनात देखील विचार येईल काय करून बसलो ? पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
