एक काल्पनिक गोष्ट आहे. सुदाम्याला आपल्या मित्राचे ऐश्वर्य नजरेत भरले आणि आपणही त्याच्यासारखे श्रीमंत व्हावे असे वाटू लागले, रात्रंदिवस तो या विचारांनी त्रस्त होता. कोणीतरी त्याला सांगितले की गावातील नदीकिनारी असलेल्या देवळातील मुंजाबा देव नवसाला पावतो. त्या देवाला ‘इच्छापुर्तीचं ठाणं’ असंही म्हणतात.
सुदामा मग रोज तिथे जाऊन मुंजाबा देवाचं नामस्मरण करू लागला धूप-दिप-पूजा-अर्चा जोरात सुरू झाले. एक दिवस पौर्णिमेला सुदामा देवळात नामस्मरण करत बसला असता, स्वतःच देव त्याच्यासमोर प्रकटला. देवाने सुदामाला हाक मारली, डोळे उघडल्यावर त्याला आशीर्वाद देत सुदामाला काय हवंय ते माग म्हणून वर दिला.
सुदामा देव प्रसन्न झाल्याने अत्यंत आनंदी झाला होता. त्याला श्रीमंत व्हायचे होते त्यामुळे त्याने देवाला वर मागितला की मी ज्याला हात लावेल ते सोन्याचे व्हावे. त्याकाळीही सोन्याला भरपूर किंमत होती. सोनं बाळगणारी लोक ही श्रीमंतच असायची. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी सुदाम्याने हात लावेन त्याचे सोने व्हावे असा वर मागितला. देवाने ‘तथास्तु’ म्हटले आणि सुदाम्याचा हात परिस झाला. सुदामा जिथे स्पर्श करेल ते सोने होऊ लागले. देवळातील तांब्याला हात लावला तो सोन्याचा झाला, घंटेला स्पर्श केला ती सोन्याची झाली. कडीला हात लावला ती सोन्याची झाली. आनंदाने भावविभोर झालेला सुदामा पळतच घरी गेला. घरी आलेला पाहताच बायकोने त्याला जेवायला वाढले, पण हाय रे दैवा, देवाचा वर होता, हात लावेल त्याचे सोने होणार, मग पोळीला हात लावला, झाली ती सोन्याची. भूक तर लागलेली पण सोन्याची पोळी कशी खाणार. तेवढ्यात मुलगी घरात आली आपले वडील इतक्या वेळाने घरी आले म्हणून तिला आनंद झाला आणि तिने वडिलांना पाहताच मिठी मारली सुदामानेही तिला आनंदाने जवळ घ्यायची म्हणून हात लावला आणि तत्क्षणी ती सोन्याची झाली। तिचा पुतळा झाला. सुदामा तिला हलवू पाहत होता. पण कसंचं काय, तिच्यातला सजीवपणाच गेला होता.
आता सुदामाला त्याच्या श्रीमंत होण्याचा मिळालेला वर जणू शापच आहे असं वाटू लागले. भूक लागली तर खाता येत नव्हते, मुलीला जवळ घेता येत नव्हते, ज्याला हात लावेल ते सोन्याचे होऊन जात होते. सुदामाला मिळालेला वर नकोसा त्याला वाटत होता.
सुदामा आता देवाचा धावा करू लागला. रडू लागला, परमेश्वराला आळवू लागला. त्याच्या हाकेला प्रतिसाद देत देव साक्षात त्याच्यासमोर प्रकट झाला. देवाला पाहिल्याबरोबर सुदामाने त्याचे पाय धरले तो ओक्साबोक्शी रडत स्वतःला मिळालेला वर देवाने परत घ्यायची विनंती करत होता. माझी मुलगी पूर्वीसारखी परत करून द्या अशी विनवणी देवाला करू लागला.
देवाने सुदामाला विचारले, “मग तुझ्या श्रीमंत होण्याच्या स्वप्नाचे काय, ते कसे पूर्ण होणार?” सुदामा आता शहाणा झाला होता. त्याने देवाला नको मला वर, नको मला पैसा माझी मुलगी मला परत द्या देवा, अशी आळवणी करू लागला.
परमेश्वर गालात हसत होता, त्याने सुदामाला पुन्हा ‘तथास्तु’ म्हटले. तत्क्षणी त्याची मुलगी पहिल्यासारखी झाली. सुदामाने तिला जवळ मिठीत घेतले. देवही तिथून अंतर्धान पावले.
मित्रांनो, पैसा महत्त्वाचा असतोच; पण आपल्या आयुष्यात येणारी माणसे, घरातील माणसेही फार महत्त्वाची असतात, ती एका अर्थी आपली संपत्ती असतात. केवळ पैशाने मिळणारी श्रीमंती कामाची नसते तर माणसे मदतीला येतात. पैशाचा हव्यास करून आपल्या जवळची माणसे गमावू नका. अतिहाव टाळा. पैसा, किर्ती आणि आपल्या माणसांचा आनंद याचा समतोल साधणाऱ्या मध्यम मार्गाचा अवलंब करा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
