मानवाला मिळालेली एक महत्त्वाची देणगी म्हणजे विचार करू शकणारा मेंदू, त्यामुळेच तर मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. तर मन ही गोष्ट जी शरीरात नेमकी कुठे हे माहीत नाही, पण तिचा मानवी जीवनावर, एकूण आयुष्यावर फार मोठा प्रभाव असतो तो विचारांच्या स्वरूपात. हे विचार सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे असतात. मनसुद्धा दोन प्रकारात काम करते. म्हणजे कसे तर आपण एखादी गोष्ट करावी की नाही अशा पेचात असतो, तेव्हा अनुभवी लोक आपल्याला म्हणतात की अंतर्मनाचा आवाज ऐका. मग अंतर्मन आणि बहिर्मन असे काही दोन वेगळे कप्पे असतात का. तर तो आपल्या विचारशील मेंदूचाच आविष्कार असतो.
एखादी गोष्ट करताना, निर्णय घेताना आपण बाह्यमनाने विचार करतो आणि ते अंतर्मनाला सूचना देते. अंतर्मन फार विचार न करता त्याचे पालन करते. म्हणूनच जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकायचा असे म्हणतो तेव्हा तो सकारात्मक असावा. मग त्यासाठी आपल्या विचारांची दिशा आणि दशा ही सकारात्मक असली पाहिजे. थोडक्यात बहिर्मनाने अंतर्मनाला सकारात्मक सूचना दिल्या तर त्याचा कौल सकारात्मक असेल. सकारात्मक घटना,सकारात्मक स्थिती व सकारात्मकतेने व्यक्त होणे शक्य होईल आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी बहिर्मनाला उद्युक्त केले पाहिजे.
मानवाची अंतर्मने एकमेकांशी जोडलेली असतात. त्यामुळे विचारही एकमेकांशी निगडित असतात.
बुद्धांपासून सर्वच ज्ञानी लोकांनी वारंवार हेच सांगितले आहे की जसे तुमचे विचार तसेच तुम्ही होता. वेदातही याला पुष्टी दिलेली आहे.
थोडक्यात, तुम्ही जसा विचार कराल तेच तुम्ही आकर्षित करता. एखादा माणूस आजारी पडल्यानंतर जर असा विचार करू लागला की मो आजारीच आहे, कधी बरा होणार तर ती व्यक्ती सतत आजारी राहते. कारण मनाने विचार करून तो शरीरात आजाराच्या कोषिका निर्माण करत असतो.
पण जर तुम्हाला तंदुरूस्त, निरोगी रहायचं असेल तर मनात भाव ठेवून मी तंदुरुस्त आणि निरोगी आहे, समाधानी आहे. माझे शारीरिक आरोग्य चांगलं आहे, मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे. असे म्हणत रहा, तेच
तुम्हाला लाभणार.
कोणत्याही प्रसंगाकडे पाहाताना आपला दृष्टिकोन किंवा नजर महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीशी बोलताना त्याच्याविषयी रागाचे भाव ठेवले, कुत्सित विचार केले तर त्याच प्रकारची वर्तणूक तुमच्याशी केली जाणार. मनात जे चित्र निर्माण कराल, ज्या भावना वारंवार मनात तयार होतील त्या प्रत्यक्षात अनुभवाला येतात. थोडक्यात आपण जसा विचार कराल तेच तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात येते. ज्याला ‘आकर्षणाचा सिद्धांत’ म्हणतात.
आता तुम्हीच ठरवा तुमच्या अंतर्मनाला कोणत्या प्रकारच्या सूचना देऊन काय आकर्षित करायचे. दुःख, राग की आनंद, समाधान. विचारा बहिर्मनाला आणि ह्या सूचना अंतर्मनाला.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
