एकदा एका शिष्याने गुरुला आदरपूर्वक वंदन करत काही मुद्यांवर प्रकाश टाकण्याची विनंती केली. शिष्याने गुरुला विचारलं की, ‘माणसाला दैनंदिन आयुष्यात साहाय्यक ठरणाऱ्या व जीवनातील अंधकार दूर करु शकणाऱ्या खऱ्या प्रकाशाचा स्त्रोत कोणता?’
यावर स्मित करत गुरुवर्य उत्तरले, ‘प्रकाशमान सूर्य हा प्रकाश व ऊर्जेचा आदिस्रोत होय. याच्यामुळेच आपल्याला दैनंदिन कामे करता येतात व त्यामुळेच माणसाचे आयुष्य उजळून निघते.’
शिष्याने उत्तरावर प्रसन्न होत प्रश्न केला, ‘सूर्यास्तानंतर आपल्याला प्रकाशाचा स्रोत कोणता ?’
त्यावर गुरुवर्य उत्तरले, ‘दुसरा स्रोत म्हणजे चंद्र, जो कमी क्षमतेचा असला तरी त्याच्या प्रकाशात आपण काम करू शकतो.’
शिष्याचे औत्सुक्य ताणले गेले. ‘या दोहोंच्या अनुपस्थितीत आपल्यासाठी प्रकाशस्रोत कोणता?’
या प्रश्नावर गुरुवर्य उत्तरले, ‘अग्नी हा त्यानंतरचा स्रोत होय.’ या उत्तरावर शिष्याच्या डोळ्यात एक आगळीच चमक आली. त्याने प्रश्न केला की, ‘यदाकदाचित, वरीलपैकी कोणताच प्रकाशस्रोत माणसाला उपलब्ध नसेल तेव्हा काय?’
गुरुवर्य शांतपणे उत्तरले की, ‘तेव्हा माणसाचा ‘आवाज’च त्याचा मार्गदर्शक ठरतो.”
हे ऐकताच शिष्य अत्यंत आनंदी झाला. त्याने गुरुदेवांना शेवटचा प्रश्न केला की, ‘जेव्हा माणसाच्या आवाजासकट त्याच्यापाशी कोणताच प्रकाशस्रोत नसेल, तेव्हा त्याला प्रश्नांच्या व्यूहातून बाहेर पडण्यास कोण साहाय्य करेल?’
हा प्रश्न अपेक्षितच असल्याप्रमाणे गुरुवर्यांनी स्मित केले व ते म्हणाले, ‘बाळा तू तर ज्ञानी आहेस, प्रकाशाचा, मार्गदर्शनाचा, आवाजाचा कोणताही स्रोत जेव्हा अस्तित्वात नसेल, तेव्हा स्वतःच्या आत डोकावून बघ. तुझा आत्मा, तुझी सद्सद्विवेक बुद्धी यांचा प्रकाश तुला कधीही सोडून जाणार नाही. परम प्रकाशाचा तो चिरंतन स्रोत आहे ज्याच्यात निसर्गाशी तादात्म्य पावण्याची शक्ती आहे. इतर ऐहिक गोष्टी जेव्हा हरवल्या जातात तेव्हा तोच प्रकाश माणसाला मार्गदर्शक ठरतो.’
या गोष्टीतून खऱ्याखुऱ्या ज्ञानाचे महत्त्व व आपल्या आयुष्याला दिशा देण्याच्या त्याच्या क्षमतेची ओळख पटते. त्यामुळे बाहेरील सर्व मार्गदर्शना बरोबर आपला आतला आवाज ऐका. ‘तुमच्या आतला आवाज हा तुमचा खरा गुरु आहे.’ अंतर्मन तुमच्याशी बोलत असते. त्याला ध्यानाच्या माध्यमातून रोज सराव करत, शांत, सबल व निर्मळ करा व आतील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता क्लिअर करा.
यासाठी नियमितपणे ध्यान करणे आवश्यक आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
