वाचा फायद्याची गोष्ट

मी माईंड पॉवर ट्रेनर म्हणून अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती या विषयावर कार्यशाळा घेत असतो. असेच ‘टीस्को’ नावाच्या कंपनीमध्ये तीन तासांची कार्यशाळा घेण्याचा योग आला. जेवण करताना जनरल मॅनेजर बरोबर जेवायला बसलो असताना त्यांना बाहेर फिरायला खूप आवडते व अनेक देशपरदेशामध्ये फिरले आहेत हे मला सांगू लागले. त्यांचे ते म्हणणे ऐकताच मी त्यांना आदराने म्हणालो, ‘साहेब, तुम्ही खूप नशीबवान आहात.’
विवेकानंद म्हणतात, ‘जास्तीत जास्त पर्यटन केल्यामुळे तुमच्या विवेक बुद्धीचा विकास होतो. आणि ती तुमच्यात मला दिसून येत आहे. साहेब तुम्ही कुठे कुठे फिरले?’ असा प्रश्न मी त्या मॅनेजरला केला असता, ते जेवण करता करता मला कुठल्या कुठल्या देशात फिरले व कुठे कुठे कसे अनुभव मिळाले हे सर्व सांगू लागले. ते बोलत असताना मी त्यांना उत्स्फूर्तपणे दाद देत होतो. व त्यांचे बोलणे व्यवस्थित मन लावून ऐकून घेत होतो. मधे-मधे मी त्यांची वाहवा पण मनापासून करत होतो. चहाच्या मधल्या सुट्टीतदेखील, त्यांना मिळालेल्या माझ्या प्रतिसादामुळे त्यांनी केबिनमधला अल्बम दाखवायला मला आणले. साहेब, तुम्हाला कधीही परदेशात फिरायला जायचं असेल, तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करेल, असे ते म्हणाले, मी त्यांच्या अल्बममधले काही निसर्गरम्य फोटो माझ्या मोबाईलवर काढून घेतले व पुन्हा त्यांची स्तुती केली. ते किती पुण्यवान आहेत हे त्यांना मनापासून सांगितले. याचा परिणाम असा झाला की, त्यांनी हे वर्कशॉप संपल्यानंतर मला कंपनीमध्ये एक दिवसाची कार्यशाळा घेण्यासाठी ऑर्डर दिली या एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये पण, मी ते बोलत असलेलं सगळं मनापासून ऐकत त्याला उत्स्फूर्तपणे खरीखुरी दाद देत होतो परिणामी त्यांनी आपल्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना माझी पुस्तके विकत घेण्याचा आग्रह केला. इतर काही कंपन्यांमध्ये देखील त्याच्या ओळखीने मला काम मिळवून दिले.
मित्रांनो, एखादा माणूस बोलत असताना त्याला मोठेपणा द्या. प्रगाणिकपणाने त्याचं ऐकून घ्या व त्याचा सन्मान करा आज ऐकणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे आपले म्हणणे ऐकून घेणारा ही आजच्या काळाची गरज आहे. ती भागवण्यासाठी तुम्ही पुढे या. जंक वुडफोर्डच्या पुस्तकांमध्ये तो म्हणतो, ‘फार थोडे मानवप्राणी दुसऱ्याची स्तुती मन लावून ऐकतात.’ मी तर त्याच्यापुढे जाऊन त्या जनरल मॅनेजरचे बोलणे एकाग्रपणे ऐकलं होतं, त्याची मनापासून स्तुती केली होती. आणि मुक्त कंठाने त्यांना दादही दिली होती. ही दाद अगदी खरीखरी होती. याचा फायदा मला खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता. एखाद्या माणसाचे लक्षपूर्वक ऐकणे व त्याला दाद देणे. हा त्या माणसाचा सन्मान असतो, हे पूर्णतः लक्षात ठेवा व चांगले श्रवणभक्त व्हा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!