कुटुंबाला अंधारात ठेवू नका

सचिन एका कारखान्यात नोकरीला होता. नोकरी करता करता सचिन एका कंपनीचे प्रॉडक्ट नेटवर्किंग पण करायचा. म्हणजे ते प्रॉडक्ट विकायचा. सचिनचा धंद्यामध्ये खूप चांगला जम बसला होता. परंतु सचिनच्या आई- वडिलांनी सचिनच्या मनावर असे बिंबवले होते की, आपले संपूर्ण इन्कम हे बायकोला सांगायचे नसते. आपल्या स्वतःसाठी काही पैसा किंवा मालमत्ता गपचूप करून ठेवायची असते. कोण-कधी-कसं वागेल सांगता येत नसत. आई-वडिलांच्या या उपदेशामुळे सचिन आपल्या उत्पन्नाचा २० टक्के भाग गपचूप काढून आपल्या अकाउंटला ठेवायचा. याच पैशातून त्यानं खेडशिवापूरला दोन एकर जमीन स्वतःच्या नावावरच घेतली होती. घोडी इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये देखील केली होती. हे सोनं किंवा जमिन बायकोला कळू नये, म्हणून त्यांनी बँकेत गपचूप एक लॉकर भाड्याने घेतलं होतं. त्या लॉकरमध्ये त्याने जमिनीची कागदपत्रं आणि सोनं आणि काही कॅश ठेवली होती. काही पैसे शेअरमध्येपण गुंतवले होते. तर काही दोस्तांना ट्रेडिंगसाठी पैसे दिले होते. ते दोस्त त्याला कमी वेळात जास्त व्याज मिळवून द्यायचे. सचिनने याची कोणालाच कल्पना दिली नव्हती. सचिनचा संसार व्यवस्थित चालला होता. परंतु अचानक अपघातात सचिनचे निधन झाले.
सचिनने घेतलेली दोन एकर जागा, तिची कागदपत्र, त्याने घेतलेलं सोनं, त्याने घेतलेला लॉकर, त्यात ठेवलेली कॅश तसेच शेअर्स याची त्याने कोणालाही कल्पना दिली नव्हती. त्यामुळे त्याची स्वतःची कोटींची प्रॉपर्टी असून देखील घरच्यांना माहीत नसल्यामुळे आज त्यांची आर्थिक स्थिती खूप बिकट आहे.
मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढेच आपल्या कुटुंबासाठी आपण काबाडकष्ट करतो, म्हणून त्यांना शक्यतो अंधारात ठेवू नका. भले तुमच्या नावावर प्रॉपर्टी राहू द्या. पण त्यांना प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती आणि कागदाच्या झेरॉक्स का होईना त्यांच्या ताब्यात द्या. जेणेकरून उद्या काही भले बुरे झाले, तरी आपल्या घरच्यांना त्याचा फटका बसता कामा नये.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!