शब्द कसे वापरावेत?

जुली दामले मॅडमकडे पियानो शिकायला आली होती जुलीची नखे फार लांबलचक होती. अर्थात तिने ती स्वतः काळजी घेऊन वाढवली होती. दामले मॅडमने जुलीच्या नखांकडे पाहिले व त्या डायरेक्ट जुलीला म्हणाल्या, ‘अगं तू पियानो शिकायला आली आहेस तर, तुला नखं कापायला लागतील. ते तुला शक्य नसेल तर मी तुला शिकवू शकणार नाही. त्यामुळे काय तो विचार कर आणि मला सांग.’
जुलीने दामले मॅडमला मी येते म्हणून बाय केले. परत तिने दामले मॅडमशी कधीही संपर्क केला नाही. हीच जुली पियानो शिकण्यासाठी फर्नांडिस मॅडमकडे आली होती. फर्नाडिस मॅडमने ज्यूलीचा खूप आदर केला व जुलीला त्यांनी पियानोबद्दल सगळी माहिती दिली व पियानो तिला वाजवायला शिकवणं चालू केलं. एक-दोन सेशन झाल्यानंतर त्यांनी जुलीचं खूप कौतुक केलं. तिसऱ्या सेशनला त्या जुलीला म्हणाल्या, ‘तू खूप छान वाजवतेस, तुझे हात पण खूप आकर्षक व मेहनती आहेत. तुझ्या मनात एकाग्रता पण खूप चांगली आहे. आणि तुझी नखे पण खूप सुंदर आहेत. पण जूली जर ही नखं थोडी बारीक असती, तर तू अजून छान पियानो वाजवू शकली असतीस. तर तूच याबाबतीत विचार कर.’ कारण मला तुला एक छान पियानो वादक म्हणून यशस्वी झालेली पाहायची इच्छा आहे. मला माहित आहे, तू खूप मेहनत करून ही नखे वाढवलेली आहेत त्यामुळे ती कमी करणे म्हणजे किती मोठा त्याग करणे हे मी जाणू शकते. पण तुला प्रसिद्ध पियानो वादक म्हणून पहायची इच्छा आहे. आणि तुझ्यात ते गट्स आहेत.
फर्नाडिस मॅडमचे वाक्य ऐकताच जुली म्हणाली ठीक आहे मॅडम, मी याच्यावर विचार करते आणि दुसऱ्या दिवशी सेशनला येताना तिने आपली नखे बारीक केली होती. यापूर्वी तिच्या आईने देखील तिला नखे बारीक करायला सांगितली होती. पण तिने तिचेही ऐकलं नव्हतं. मित्रांनो मिसेस फर्नाडिस यांच तिने का ऐकलं कारण मिसेस फर्नाडिस यांनी जुलिला डायरेक्ट नखे कापून टाक असं न सांगता तीन-चार सेशन नंतर तिच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं, तिच्या नखांचं खूप कौतुक केलं. ते कापणं म्हणजे खूप मोठा त्याग आहे, असे मनापासून सांगत तिच्याविषयी सहानुभूती दाखवली व तिला मोठं झालेलं पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अर्थात, तिला होणारे सर्व फायदे तिने सांगितले.
म्हणून मित्रांनो एकच गोष्ट दामले मॅडम व फर्नाडिस मॅडम यांनी जूलीला सांगितली. पण जुलीने दामले मॅडमशी संबंध तोडून टाकले, फर्नाडिस मॅडमचे संपूर्ण ऐकले. याचे कारण फर्नाडिस मॅडमने जुली विषयी आदर, प्रेम, सद्भावना व्यक्त करत भावनिक हात घातला होता.
मित्रांनो, शब्दांची खूप ताकद असते. ते जेवढे तुम्ही चांगले वापराल तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल…

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!