चारित्र्य

 

धो-धो पाऊस पडत होता घाईतच कामावर निघालो. पार्किंगमध्ये येऊन पहातो तर काय, कार पंक्चर स्टेपनी लावण्यास वेळ घालवण्यापेक्षा सोसायटीच्या गेटवर येऊन रिक्षाला हात केला व कारखान्यात पोहचलो. थोड्या वेळाने आपली लॅपटॉपची बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले. त्यातच ५,०००/- रू.ची कॅश पण ठेवली होती. मन अस्वस्थ झाले. विचारचक्र फिरू लागली. तेवढ्यात फोन खणाणला, बॅगेत असलेल्या व्हिजिटींग कार्डवरून नंबर घेऊन रिक्षावाल्याने मला फोन करून गेटवर बोलावले व माझी लॅपटॉपची बॅग व कॅश परत केली. त्या रिक्षावाल्याला मी २,०००/- रू. बक्षिस म्हणून देऊ लागलो. त्याने घेण्यास नकार दिला. तो म्हणाला साहेब फक्त आशीर्वाद द्या. वडिलांनी सांगितले होते. मेहनतीच्या पैशालाच जवळ कर, आयुष्यात इमानदारीने जग. नमस्कार करून तो तेथून निघून गेला. एका रिक्षावाल्याने जपलेल्या नैतिक मुल्यांनी अंतःकरण भरून आले.
खरोखर नैतिकता चारित्र्य हा सुखाचा पाया आहे. आज चंगळवादाला तुफान आले आहेत. नैतीक मूल्ये पायाखाली तुडवली जात आहेत. लोक आत्मकेंद्री होत आहे. अशा परिस्थितीत आज तरूणाईवर नीतीमुल्यांचे संस्कार करणे गरजेचे झाले आहे. महात्मा गांधीनी एक मुठ मीठ उचलले लाखो लोकं त्यांच्या पाठीशी उभी राहिली. चारित्र्याचा केवढा हा प्रभाव. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे “मला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी शुद्ध व चारित्र्यसंपन्न माणसं या मी त्यांच्या सहाय्याने संपूर्ण जग बदलून टाकीन.” मॅकडूगल नावाचा मानसशास्वज्ञ म्हणत असे की, चारित्र्य म्हणजे स्थिर भाववृत्तीचा सुसंघटीत असा आकृतीबंध होय. ज्या व्यक्तीच्या जीवनात हे भावसंघटन आढळते, त्यांनाच चारित्र्य असू शकते. जे प्रवाहपतित होतात , कोणत्याही क्षणी कशालाही वश होतात, कशावरही भाळतात त्यांना चारित्र्य लाभू शकत नाही. चारित्र्य म्हणजे स्री पुरूषांनी परस्परांकडे पहाणे कटाक्षाने टाळणे व अपराध्यासारखे मान खाली घालून नाकासमोरून चालणे ही समाजात मान्य पावलेली एक भ्रामक अशी कल्पना आहे. चरित्रसंपत्र व्यक्ती विषयांचध नसते, हे खरे आहे पण तिच्या जीवनात असणारा ध्येयवाद हे तिच्या जीवनाचे शिखर असते. निष्क्रिय शालीनता कणजे चारित्र्य नव्हे. चारित्र्यावर आधारलेले शिक्षण घेतल्याने नैतिक मुल्यांची वृध्दी होते. नैतिक मुल्ये जपणारा माणूस हा दुःखमुक्त होतो.

गौतम बुद्धांनी शुदध चारित्र्याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हटले आहे. हत्या करू नका, चोरी करू नका, व्याभिचार करू नका, खोटं बोलू नका, व्यसन करू नका या पंचशीलाचे पालन केल्यास मनुष्य चारित्र्यसंपत्र व सुखी होतो. भगवान बुद्ध म्हणतात चारित्र्य हा अत्यंत महत्वपूर्ण दागिना आहे. तुम्ही आजारी पडलात तर सगळी संपत्ती खर्च करा पण निरोगी व्हा. तुमचा एखादा अवयव कापून टाकण्याची वेळ आली (गँगरीन झाले) तर कापून टाका. पण ज्यावेळेस तुमचे चारित्र्य (शील) तुटायची वेळ येईल व नैतिक मुल्ये पायाखाली तुडवावी लागतील. त्यावेळेस जीव गेला तरी चालेल पण पंचशील तोडू नका.

निष्कलंक, धारदार, तेजस्वी मानसिकता हेच चारित्र्याचे गमक आहे. असे चारित्र्य संपादन करण्यासाठी सुबुध्दीचा कौल स्वीकारून, परिस्थितीचे आव्हान स्वीकारून, आपले जीवन आदर्श मनाशी निश्चित करून आनंदाने – दृढतेने अखंडपणे चालत राहणे हाच चारित्र्यवर्धनाचा मार्ग आहे. या मार्गावरून चालताना कधी ‘शिवरायांचे आठवावे रूप’, ‘विवेकानंदाचा आठवावा प्रताप’, ‘ज्ञानेश्वरांचा आठवावा साक्षेप’ असे गुणगुणत राहावे तसेच वारंवार मनाशीच बोलावे.

थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा।
आपण त्यांच्या समान व्हावे, हाचि सापडे बोध खरा।

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!