एक काल्पनिक गोष्ट आहे एक शिक्षिका मुलांना सांगते तुम्हाला जेवढ्या लोकांचा राग येतो तेवढे पेरू व एक मोठे कापड उद्या येताना घेऊन या दुसऱ्या दिवशी शिक्षिका मुलांनी आणलेले पेरू त्या कापडात बांधून त्यांच्या कमरेला बांधते व काही दिवस हे असेच राहून देण्याची सूचना करने ५ व्या दिवशी एक मुलगा म्हणाला, मला झोपताना या पेरूंमुळे एकाच कुशीवर झोपून चमक भरली. दुसरा म्हणाला, मला खेळताच येत नाही, पेरूंमुळे भरभर पळता येत नाही. तिसरा म्हणतो, पेरू सडलेत फार वास येतोय. चौथा म्हणतो फारच ओझं वाटतंय, त्यामुळे बैचेनी आली आहे ते ऐकूण शिक्षिका हसते आणि त्या चारही मुलांना म्हणते, “विद्यार्थ्यांनो कंबर तुमची, पेरू तुमचेच, कापड तुमचेच मग ज्याक्षणी त्रास जाणवला त्याक्षणी हे कापड सोडून पेरू फेकून का नाही दिले?” तात्पर्य काय तर आपणही असेच अनेक पेरू आपल्या कमरेला बांधून ते ओझे घेऊन आयुष्य काढीत असतो.
एखादी व्यक्ती आपला अपमान करते, मनाविरूध्द वागते, नाहक त्रास देते, हे ओझे आपण वर्षानुवर्षे घेऊन बसतो. काहीजण तर म्हणतात, त्याने माझा असा अपमान केला, सात जन्म विसरणार नाही. जन्मभर असे विचार करून आपणच आपली हानी करून घेतो व आपल्या शरीरात रक्तदाबासारख्या अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. म्हणून ज्या गोष्टींमुळे आपले मन दुःखी होते त्या गोष्टींना सोडून देऊन संबंधित व्यक्तीला क्षमा करणे म्हणजे आपणच आपल्यावर कृपा करून आपले हित साधणे होय. सर्व धर्मामध्ये क्षमायाचनेला खूप महत्व दिले आहे. क्षमा केल्यामुळे आपल्या मनातील द्वेषभावना कमी होते. मन शांत राहण्यास मदत होते. त्यातून संबंध सुधारतात. प्रगतीचा टप्पा गाठण्यास सुलभता बेले. मन हलके-फुलके राहते. लोकांचा विरोध मावळतो. जैन धर्मात पर्युषण पर्वानंतर ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणत क्षमायाचना करण्याची तर इतर धर्मात मंगलमैत्रीच्या माध्यमातून क्षमायाचना करण्याची साधना शिकवली जाते.
इतरांनी केलेली हानी व अपमान आपल्याला सोडता आला पाहिजे. दृष्ट माणूस बदला घेण्याची, शहाणा माणूस माफ करण्याची व प्रज्ञावान मनुष्य दुर्लक्ष करण्याची इच्छा बाळगतो. एक गुरू व त्याचा शिष्य प्रवास करत असताना त्यांना नदीकिनारी एक तरूणी भेटते. नदीला पाणी वाढल्यामुळे तिला पलीकडे जाता येत नसते. तिच्या विनंतीनुसार गुरु तिला आपल्या खांद्यावर बसवून पलीकडे सोडतात. हा प्रकार पाहून त्यांचा शिष्य दिवसभर विचारचक्रात अडकून बैचेन होऊन सायंकाळी गुरूला म्हणतो, गुरूजी तुम्ही तर आम्हाला शिकवलंय- स्त्री स्पर्श करू नये. परंतु तुम्ही तर एका स्त्रीला खांद्यावर घेऊन गेलात. तेव्हा हसत गुरूजी म्हणाले, “मी तिला किनाऱ्यावर केव्हाच सोडून दिले तू मात्र तिला अजुनही धरून बसला आहेस का?” सोडून देण्याची कला शिकणे ही एक साधनाच होय. सॉक्रेटिस पत्नीच्या शिव्या खाऊनही ती दमलेली दिसली कि तिची विचारपूस करायचा. सोडून देण्याची, माफ करण्याची कला सॉक्रेटिसने आत्मसात केल्यामुळे तो खडूस बायकोबरोबर राहू शकला.तुकाराम महाराज, गौतम बुध्द, येशू ख्रिस्त यांनी क्षमायाचनेचा उत्तम आदर्श घालून दिला. सुळावर चढवत असलेल्या लोकांविषयी येशू खिस्त म्हणत होते, ‘हे पित्या यांना माफ कर, ही तुझीच लेकरे आहेत, ते काय करतायत हे त्यांना कळत नाही.’ या क्षमायाचनेमुळे त्यांना संतशिरोमणी म्हटले जाते. म्हणून क्षमायाचनेची साधना करा.
डोळे मिटून शांतपणे बसा. ज्या व्यक्तीला आपण दुःखावले त्याला आठवून बंद डोळयासमोर त्याची प्रतिमा आणून त्याची माफी मागा व ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला असेल त्याची प्रतिमा बंद डोळयासमोर आणून त्यांना माफ करा. असे वारंवार केल्याने खरोखरच आपल्या सुप्त भावना संबंधित लोकांपर्यंत पोहचतात व संबंध सुधारण्याची प्रक्रिया चालू होते. पूज्य आचार्य गोएंकाजी म्हणतात, “मै करता सबको क्षमा- करे मुझे सब कोय, मेरे तो सब मित्र है- बैरी दिखे ना कोय।”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
