दत्ता आणि राजू दोघेही सख्खे भाऊ, दोघांचेही शिक्षण जेमतेम झालेले. दत्ता हा पापभिरू, शांत, सज्जन व कष्टाळू प्रवृतीचा याउलट राजू हा आळशी व गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.
चटकन – कमी श्रमात उलट-सुलट कामे करून पैसे कमावणे व आळसात खाण्यापिण्यात दिवस घालवणे राजूला आवडायचे श्रमजीवी दत्ताने काबाडकष्ट करून लोकसेवा व सत्याच्या मार्गाने नावलौकीक मिळवला होता. समाजात त्याला खूप मान मिळत होता. याउलट गुन्हेगारी प्रवृनीमुळे राजू दुःखीकष्टी व अपमानित जीवन जगत होता. लोक त्याला जवळ करत नव्हतो. दोघेही एकाच संस्कारात वाढलेले पण आपले आरंभीचे असणे जरी आपल्या हाती नसले तरी नंतरचे होणे आपल्या हाती असते हे दत्ताने सच्चाई व दीर्घोद्योगाने पटवून दिले होते.
खरोखर मित्रांनो काबाडकष्टाला- नैतिक मूल्यांची जोड दिल्यास सर्वत्र जीवनाचा सन्मान केला जातो. लहानपणी आजीने आम्हा मुलांना जग कधी बुडणार आहे हे तिला माहीत असल्याचे सांगितले. आम्ही उत्तराचा आग्रह धरत खूप गलका – गोंगाट केल्यावर ती म्हणाली. ज्या दिवशी माणसांच्या नजरेला थांबलेली- निवांत बसलेली -झोपलेली मुंगी दिसेल तेव्हा जग बुडेल आम्ही सर्वांनी खूप शोध घेतला. थांबलेली मुंगी आमच्या नजरेला पडली नाही. आजीला या गोष्टीतून एवढेच सांगायचे होते. मुंगीसारखा शून्यवत – नगण्य जीव अहोरात्र काहीतरी करीत असतो. याउलट ज्याच्या ठायी ईश्वराने सर्व सामर्थ्य दिले तो माणूस मात्र आपल्या नाकर्तेपणाने सर्व सामर्थ्याची प्रतारणा करतो. माणसाला परमेश्वराने दोन हात दिले आहेत ते श्रम करण्यासाठी, इतरांना आधार देण्यासाठी व रंजले गांजलेल्यांची सेवा करण्यासाठी. ‘जेथे राबती हात तेथे हरी” ही संत गाडगेबाबांची धारणा होती.
मुर्तीसमोर बसून दोन तास मंत्रोच्चार करणाऱ्या भाविकतेपेक्षा घामाच्या रूपाने- रक्ताचे पाणी करणारा व या घामाला त्यागाचा -सेवेचा सुगंध देणारा कामगार गाडगेबाबांना प्रिय होता. ज्या देशात श्रमाला प्रतिष्ठा लाभलेली असते अथवा श्रमाची उपासना निष्ठापूर्वक केली जाते तो देश समृध्द व अजिंक्य बनतो हा विचार गाडगेबाबांनी समाजासमोर प्रत्यक्ष स्वरूपात ठेवला होता.
आज कमी श्रमात जास्त धन मिळविण्याची अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे पण या वाममार्गाने मिळवलेला पैसा मी – मी म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांना देखील तुरूंगाची हवा दाखवत आहे. करोडपती असणारे महाभाग आज दुःखी कष्टी होवून नैराश्याने आत्महत्या करत आहे. कारण श्रमाला प्रतिष्ठा व नैतिक मूल्यांना डावलून केलेल्या कृत्याचे हे फळ आहे.
कोणा एका शास्त्रज्ञाचे साडेतीन हजार प्रयोग फसले. तरीही पहाटेच्या वेळी प्रयोगशाळेचे दार उघडून तो कामाला लागत असे कोणी त्याला हिणवले, ‘या वाया गेलेल्या प्रयोगाची कहाणी जगाला कळली तर? यावर तो म्हणाला हेच प्रयोग परत कोणाला करावे लागणार नाही. या कल्पनेने जग आनंदी होईल !’
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणायचे, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे”. म्हणून माणसाने नेहमी दीघोंउदयोगी रहावे. “उद्योगाची घरी – रिद्धीसिद्धी पाणी भरी” या सुभाषिताचे सार जाणून घ्यावे.
आयुष्यात काबाड कष्टाला सेवेची, त्यागाची, लोककल्याणाची व सत्याची जोड देणारे स्वामी विवेकानंद – छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले या महापुरूषांचा इतिहास आजही आपणांस प्रेरणा देतो व श्रमाला- नैतिक मूल्यांची जोड देऊन श्रमदेवतेची उपासना केल्यास आपण नियतीकडून सन्मानित झाल्याशिवाय राहणार नाही. अशी उच्चकोटीची शिकवण देतो. चला मग- उठा -जागे व्हा – रोज श्रमदेवतेची पूजा केल्याशिवाय राहू नका.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
