पुण्यात सकाळी ६ ची वेळ, धुक्यामुळे पुढचं काही दिसत नव्हतं. त्यात बऱ्यापैकी अंधार, नेहमीप्रमाणे ६.०० वा. महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट बंद झाल्या. अरण्येश्वरकडून सारसबागेकडे कारने जात होतो. टेपचे बटन दाबले “तुने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी…” गाणे लागले. अंगात उत्साह संचारला व प्रसन्नचित्ताने म्युझिकवर अंग हलवत जोराने गाणे गुणगुणत मी गाडीचा स्पीड वाढविला. मित्रमंडळ चौकात वळताना भयानक अंधार, गाडीच्या दिव्याने अंधुकसा रस्ता दिसत होता. तेवढयात समोरच्या गाड्यांच्या फ्रंटलाईटमुळे डोळयावर ताण आला.
गाडी अंदाजे वळविताना एकदम छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र (रेडियमयुक्त) दिसले व गाडीला कचकटून ब्रेक लावला. पाहतो तर काय अंधारात काळी पँट व काळे जर्कीन घालून एकजण जॉगींग करत रस्ता क्रॉस करत होता. तो मला अंगावरील काळया कपड्यांमुळे दिसलाच नव्हता पण त्याच्या जर्कीनवरील रेडियमयुक्त फोटोमुळे मला खडबडून जागे केले. ब्रेक मारला. तो पळतच रस्ता क्रॉस करून निघून गेला. माझ्या श्वासाची गती वाढली होती, हृदयाचे ठोके वाढले होते. विचारचक्र जोरात चालू झाले होते. महाराजांना आठवून विचार आला. महाराज पूर्वी तुम्ही नसते तर आमचं काय झालं असतं ? आणि आजही तुम्ही समोर दर्शन दिलं नसतं तर माझं काय झालं असतं. त्या माणसाचं पण काय झालं असतं महाराजांविषयी कृतज्ञता दाटून डोळयातील अश्रु गळू लागले. पिढ्यानपिढ्या झाल्या तरीही एवढ्या वर्षानंतर संकटातून बाहेर पडण्यासाठी, मनाची शक्ती वाढविण्यासाठी माझ्या राजांचा चेहरा आजही स्फुर्ती देत आहे.
मित्रांनो गोष्ट येथेच संपली नाही एक महत्वपूर्ण विनंती आहे. सकाळी अंधारात बाहेर पडताना संपूर्ण काळे कपडे घालू नका, अंधारात तुम्ही दिसू शकत नाही. गाडी चालवताना समोरील गाड्यांचा प्रकाश डोळयावर आला की धोक्याची शक्यता निर्माण होते.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
