एक राजकुमार स्वतःच्या विवाहासाठी स्वयंवर घोषित करतो. या स्वयंवरात्त राजकुमारीच्या बरोबर एक नोकरदाराची मुलगी देखील सामील झालेली असते. कारण तिला तो राजकुमार खूप आवडत असतो.
राजकुमार, या स्वयंवरात प्रत्येक मुली जवळ जाऊन आपल्या जवळील पिशवीतील एक-एक बी प्रत्येकीला देतो आणि घोषणा करतो की, “तीन महिन्यांनी ज्या मुलीच्या कुंडीमध्ये या बी पासुन सुंदर रोप उगवेन. त्या मुलीशी मी लग्न करेन.” तीन महिन्यानंतर अनेक राजकुमारी आपआपल्या कुंडीतील सुंदर रोप घेऊन त्याच्या समोर येतात. नोकराच्या मुलीतील कुंडीमध्ये तिने खूप प्रयत्न करून देखील काहीच उगवलेले नसते. राजकुमार सगळयांच्या कुंड्या, त्यातील फुलांनी अच्छादलेली रोपे पाहतो व जिच्या कुंडीत काहीच उगवले नसते त्या नोकराच्या मुलीशी लग्न करण्यची घोषणा करतो. कारण त्याने सर्व तरूणींना दिलेल्या बीया या निर्जीव असतात. राजकुमाराशी लग्न करायच्या तीव्र लालसेने त्यांनी दुसरी आकर्षक रोपे कुंडित लावून आणलेली असतात. नोकरादाराच्या मुलीच्या आचरणातील सत्यता राजकुमाराला मोहित करते.
सत्याची ही केवढी मोठी ताकद।
स्वामी विवेकानंद म्हणतात “सत्य हे एवढे प्रभावी असते की आकाशातून जमिनीवर फेकले, तरी ठामपणे त्वरित उभे राहते.” लोक तुम्ही खरे बोलता म्हणून तुमचे घर पेटवू लागले तरी सत्याशी एकनिष्ठ रहा. पहा त्याच ठिकाणी तुम्हाला तुमची स्वतःची टोलेजंग इमारत उभी दिसेल अब्राहम लिंकन म्हणाले होते फसवून आलेल्या यशापेक्षा सरळ आलेख अपयश श्रेयस्कर असते.
सत्यासारखे श्रेष्ठ तत्व नाही, बारा वर्षे जी व्यक्ती पूर्णतः सत्यवचनी असते तिला वाचासिद्धी प्राप्त होते असे अध्यात्मात म्हटले जाते.
धर्मराजानं ‘नरो वा कुंजरो वा’ असं द्रोणाचार्यांना सांगितलं. हे अर्धसत्य असल्याने त्याचे परिणामही वाईटच आले. धर्मराज युधिष्ठिरासारखा नैतिक संघर्ष बऱ्याचदा आपल्या वाट्याला येतो. ‘सत्यं ब्रुयात प्रियं ब्रूयात’ असं वचन आहे. त्यातील सत्यापेक्षा प्रिय भागाकडे, खरं बोलण्यापेक्षा वर वाटेल असे बोलण्याकडे, दिवसेंदिवस आपला कल वाढत आहे. संत रामदास स्वामी म्हणतात,
मना सर्वथा सत्य सांडू नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे।
मना सत्य ते सत्य वाचे वदावे!मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे।
ज्यामुळे समस्त मानवजातीचे हित किंवा कल्याण होते ती गोष्ट सत्य होय. सत्याच्या स्वीकृतीसाठी मन, बुद्धी आणि इंद्रिय अत्यंत शुद्ध हवीत. विषययुक्त मन दुबळे असते, ते सत्याचा स्विकार करू शकत नाही. आज तर व्यवहारामध्ये पदोपदी माणूस खोटे बोलतो. आज माणूस असत्याला निर्वावला आहे. अनेकदा पालक मुलांना सांगतात, खोटे बोलू नका व त्यांच्याच समोर पदोपदी खोटे बोलतात. घरात असणारे वडील मुलाला एखाद्याला टाळायचे असल्यास मी घरात नाही म्हणून सांग असे सुचवतात. कशी आपली मुले सत्याला जवळ करतील? वय कमी सांगणे, मार्क वाढवून सांगणे, हुद्दा वाढवून सांगणे या साध्या साध्या गोष्टीत पण आपण असत्याला जवळ करतो. ब्रम्हदेशातील विपश्यनाचार्य सयाजी उबाखीन गुरूजीकडे एक वकील साधना करावयास आला, पूर्ण सत्य मी बोलू लागलो तर माझी वकीली चालणार कशी? असा प्रश्न त्याने उबाखीन गुरूजीना विचारला. उबाखीन गुरूजी म्हणाले, ‘धर्मावर विश्वास ठेवून पूर्ण सत्याला शरण जा, बघ काय चमत्कार होईल कालांतराने सत्यवचनी-न्यायवचनी म्हणून तो वकील प्रसिद्ध झाला. न्यायाधीश त्याच्या या सत्यवचनाच्या प्रभावाने त्याच्या बाजूने न्याय देऊ लागले. शहरभर त्याची किर्ती पसरली.
बुद्ध म्हणतात गुलाबाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने वाहतो पण सत्यवचनी -शीलवान माणसाचा सुगंध चारही दिशेला पसरतो. म्हणून नेहमी सत्य बोला – सत्याने चाला. ज्यावेळेस एखादया प्रश्नाचे उत्तर देतेवेळी खोटं बोलण्याची वेळ येईल, त्यावेळेस मौन पाळा किवा विषयांतर करा खोटे बोलू नका. दुसऱ्याला बोलायला लावू नका, खोटे बोलणाऱ्याला अनुमोदन देऊ नका.
सत्यवचन हा मानव धर्म आहे. सत्य, अर्थ व धर्म यात प्रतिष्ठित असलेल्या संताचे हे अमृतबोल आहे. एका गाण्यातील या ओळी खूप काही सांगून जातात,
सजन रे झुठ मत बोलो – खुदा के पास जाना है।
न हाथी है, न घोडा है वहाँ पैदल ही जाना है।
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
