पैसा

 

सुदामरावाची २० एकर बागायती शेती दोन मुले, दोन मुली वडीलोपार्जित बाडा, गाई-म्हशी, नोकरचाकर सुदामरावाने कष्ट करून चारही मुलांना उच्चशिक्षण देण्याचा पूर्णतः प्रयत्न केला. एक मुलगा उच्चशिक्षण घेऊन पुण्यात स्थायिक झाला व त्याने स्वतःचा कारखाना उभा केला. धाकटा मात्र बौध्दिक कुवत कमी असल्याने फारसे शिक्षण घेऊ न शकल्याने शेतीच करू लागला दोन्ही मुलीची सुदामरावाने थाटामाटात लग्न करून दिली. दुर्दैवाने सुदामरावांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
सुदामरावांच्या मृत्यूनंतर धाकट्या मुलाने व सुनेने आईकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. तिला अपशब्द वापरून, नाहक त्रास देऊन पुण्यातील मोठ्या मुलाकडे राहायला जा म्हणून तगादा लावला. मोठ्या मुलाने आईचे हे हाल बघून तिला आपल्या घरी नेले आणि भावाच्या वागण्याला कंटाळून, वैतागून नाईलाजाने जमिनीची वाटणी मागितली असता धाकट्या भावाने त्याला धमकी व शिवीगाळ सुरू केली. त्यातून आईसमोरच त्या दोघांची हाणामारी झाली. जमिनीला भाव आल्याने दोन्ही बहिणींनी पण हक्क मागितला. केस कोर्टात गेली. आज २० एकर बागायत जमीन ओसाड पडली आहे. जमिनीची केस कोर्टात चालू झाल्यामुळे धाकट्या भावाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली. जमिनीला वाढलेल्या भावामुळे (किंमतीमुळे) रक्ताची नाती तुटली. आज सर्वजण एकमेकांचे तोड पण बघत नाहीत. सर्वजण एकमेकांचे वैरी झाले.
दुसरी एक घटना परदेशातून मुलगा व सून भारतात आले. आई वडिलांनी परदेशात आपल्याबरोबर येण्यासाठी त्यांनी आग्रह धरला व गोडीगुलाबीने जमीन विकायला लावली. पैसे आपल्या खात्यात भरले व आई-वडिलांना न सांगताच मुलगा व सून पुन्हा परदेशात् निघून गेले.
तिसरी एक घटना नवऱ्याला सोडून आलेली शारदा वेळ घेऊन मला भेटायला आली होती तिला नवरा, नुसते पैसे कमव तुला जे करायचे ते कर पण मला पैसे आणून दे म्हणून त्रास देत होता तिची कहाणी कथन करताना तिचे डोळे पाणावले होते. मित्रांनो पैशाच्या लोभापायी आई, वडील, पत्नी, पती, भाऊ या पवित्र नात्यावर कशाप्रकारे आभाळ कोसळले हे वरील घटनांवरून दिसून येते.

‘ना बीवी है ना बच्चा,
ना बाप बडा ना मैय्या,
द होल थींग इज देंट,
के भैय्या, सबसे बडा रूपय्या.’

या गाण्याची प्रचिती वरील उदाहरणांवरून येते. लोकं म्हणतात पैसा, पैसा काय करतो. पैसा मेल्यानंतर वर नेणार काय ? पण हे ही तितकंच खरं आहे जोपर्यंत मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत त्याच्याजवळचा पैसा त्याला प्रत्येक ठिकाणी मानपान देत असतो. दरिद्री माणसाला समाज दूर ठेवतो. त्याची अवहेलना केली जाते. श्रीमंत माणूस बुध्दीने व शिक्षणाने जरी कमी असला तरी समाजात, गावांत त्याचा नावलौकीक असतो. आपण जन्म कोठे घ्यावा हे आपल्या हातात नसते. त्यामुळे आपण गरीब घरात जरी जन्म घेतला तरी गरीब म्हणून मरणार नाही असा संकल्प करा व कष्ट करून सत्मार्गाने पैसा कमवा.
खरोखर मित्रांनो सगळ्या गोष्टी पैशाशी संबंधित असतात. त्यामुळे अर्थतज्ज्ञ म्हणतात “जर रूपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर – तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्वर.” त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या जगात सगळया गोष्टी भरलेल्या पोटानेच होतात. पण खरोखर सगळयाच गोष्टी पैशाने मिळवता येतात का? यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे. पैशासाठी लोक नातीगोती सोडतात, जवळच्यांना धोका देतात, स्वाभिमान गहाण टाकतात खोट्याला खरे म्हणतात, अपराध करतात, जीव घेतात, नाती तोडतात, वाटेल ते करतात. येथूनच दुःखचक्राला सुरूवात होते.
मित्रांनो पैसा महत्वाचा आहेच पण या पैशांनी आपण घर घेऊ शकतो. पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशांनी औषध आणू शकतो, पण आपण आपले आयुष्य वाढवू शकत नाही. पैशांनी घड्याळ मिळते, पण गेलेली वेळ मिळवू शकत नाही. पैशांनी मोठे पद मिळते पण मनापासूनचा आदर मिळवू शकत नाही. आपण पैशांनी मखमली गादी घेऊ शकतो, पण शांत झोप नाही. पैशांनी पुस्तके आपण घेऊ शकतो, पण विद्या नाही. पैशांनी रक्त पण विकत मिळते पण कोमेजून गेलेले जीवन नाही.
मित्रांनो ज्याला आपण पैसा म्हणतो ती एक मान्यता असते. सरकारने जाहिर केले की, अमूक अमूक चलनाच्या नोटा आजपासून बंद ! तर लगेच ही मान्यता बदलून जाते. त्यामुळे आजची श्रीमंती काय गरीबी काय दोन्हीही परिवर्तनशीलच असतात. म्हणून पैसा अवश्य कमवा पण चांगल्या मार्गाने. पैशाच्या काही टक्के रक्कम दानधर्मासाठी खर्च करा व नाती मैत्री धन यांचा सुरेख संगम साधा व यांचा समन्वय साधताना लक्ष्मीकडे देखील दुर्लक्ष करू नका.

‘वासुदेवाची ऐका कहानी, जगात नाही राम रे
दाम करी काम वेड्या दाम करी काम रे ।’

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!