५ दिवसाचा आठवडा -खूप काम, व्यस्त जीवनशैली. मग दोन-तीन दिवस का होईना सुट्टी मिळाली की, मित्र मैत्रीणों विशेषत बाहेरगावाहून नोकरीनिमित्त इतरत्र राहणारी बॅचलर्स किंवा कुटुंब आराखडा आखतात दोन दिवस सहलीला जाण्याचा स्थळ, वेळ, पक्की होते काही जण स्वतःचीच गाडी (दुचाकी किंवा चारचाकी) काढतात, जातानाच मद्य प्राशनाला सुरुवात, त्यातच बॅचलर्स असतील तर मग रिमिक्स गाणी किंवा “चाहे कोई मुझे जंगली कहे” अशा गाण्यांनीच सुरुवात होते. पावसाळा असेल व बरोबर मैत्रिणी असतील तर मग मित्रमंडळीना जगाचा विसरच पडतो. सिगारेट, बिअर, नाचगाणी, अश्लिलता अशा अनेक गोष्टींमुळे मन-दुर्मन होते, स्वतःवरचा ताबा सुटतो व “काय करुन बसलो असा मी एकदाच चुकलो” हे गाणे म्हणण्याची काही जणांवर वेळ येते. काही सांसारिक बांधव आपल्या मुलाबाळांसह सहलीला निघतात पण पुरेशा माहितीच्या अभावामुळे व नियोजनाच्या विस्कळितपणामुळे त्यांना सहलीचा मनमुराद आनंद लुटता येत नाही काही वेळेस अनेक संकटांना सामोरे जावे लागते. म्हणून बॅचलर्स असो या कुटूंब असो सहलीला निघण्यापूर्वी “नियोजन, मर्यादा व सुरक्षिततेचा नियम” यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.
काही महिन्यापूर्वी पानशेत जलाशयातील दुर्घटनेची बातमी वाचली. पानशेत परिसरात ‘जलक्रीडा पर्यटन’ संस्थेच्या बोटीमधून फिरायला गेलेले जैन बहिण-भाऊ स्पीडबोट उलटून मृत्यूमुखी पडले. विशेषतः त्यावेळी बोटीतील कोणाच्याच अंगात लाईफ जॅकेट नव्हते. एकाच कुटुंबातील या भावा-बहिणीचा असा दुर्दैवी अंत मन खिन्न करणारा व चिंतनास भाग पाडणारा होता. मित्रांनो, अशा विविध प्रकारच्या अपघातात सहलीमध्ये बऱ्याचजणांना सुरक्षिततेच्या नियमांना डावलल्यामुळेच प्राण गमवावे लागतात म्हणून सहलीला निघताना, आनंदाची लयलूट करताना जागरुकतेचे अस्व जवळ ठेवले, तर निश्चितच ‘यशस्वी सहलीचं’ सूत्र आपल्याला मिळेल हे निर्विवाद सत्य आहे. ‘काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही’, असे म्हटले आहे, ते अगदी खरे आहे.
कामाने जीव थकून गेल्यानंतर कुठेतरी फिरायला जाण्याचा मोह साऱ्यांनाच होतो नवी ठिकाणे पाहताना, तिथल्या संस्कृतीची ओळख करून घेताना रोजच्या कंटाळवाण्या दिनक्रमाचा विसर पडून पुन्हा त्या दिनक्रमामध्ये जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. भारत हा विविधतेतून नटलेल्या एकात्मतेचे प्रतीक आहे. कुठे हिमालयाची उंचच उंच बर्फाने अच्छादलेली रांग, तर कुठे अथांग समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, गिरीशिखरातून कोसळणारे धबधबे आणि कला-संस्कृतीची महानता दर्शविणारी मंदिरे.
पर्यटनस्थळाला भेट देणे म्हणजे मनाला ‘फ्रेशनेस’ देण्यासारखे असते, पण अनेकदा पुरेशा माहितीअभावी सहलीला जाताना अनेक अडचणींना व धोक्यांना सामोरे जावे लागते व नाहक त्रास सोसावा लागतो. म्हणून प्रवास काळजीपूर्वक आखून व्यवस्थित नियोजन केल्यास तो सुखाचा व आनंदाचा होतो. आपण ज्या भागात पर्यटनासाठी, गिरीभ्रमणासाठी, पदभ्रमणासाठी अथवा अरण्य पर्यटनासाठी जाणार असाल तेथील हवामान, सुट्ट्या, वन्यप्राणी-पक्षी, वनस्पती, नकाशे, टाईमटेबल, गाईडबुक्स सगळी माहिती अगोदरच गोळा करावी. प्रवास खर्चाचे बजेट करुन त्यापेक्षा थोडे जास्त पैसे व चेकबुक किवां क्रेडिट कार्डबरोबर असू द्यावे.
रेल्वे, विमान किंवा लक्झरीने सहलीला जावयाचे असल्यास आगाऊ बुकींग करुन किमान एक तास अगोदर पोहोचावे. परतीचे आरक्षण देखील एका दिवसाचे मार्जिन ठेवूनच करावे. प्रवासाला जाताना कमीत कमी व आवश्यक तेवढेच सामान बरोबर घ्यावे. प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेचे कुलूप किल्ल्या तपासून घ्याव्यात. बॅगावर आपले नाव, पत्ता, फोन नंबरचा स्टीकार आत व बाहेर लावण्यास विसरु नये. प्रवासाला जाताना मोजकेच कपडे बरोबर घ्यावेत कपड्याचा रंग शक्यतो मळखाऊ असा जाड पेंटस् असत्या तर खरचटण्याची भिती कमी होते आणि थंडी वाऱ्यापासून बचाव होतो, शर्ट, पँट किंवा स्त्रियांनी सलवार कुडता घालावा. प्रवासात साडी परिधान केल्यामुळे वावरताना सोयीचे होत नाही. न चुरगळणारे, धुवून वाळत घातले की पटकन वाळणारे व इस्त्रीशिवाय पुन्हा वापरता येणारे कपडे असावेत. अंतर्वस्त्राचे व मोजाचे जोड जास्तीचे ठेवावेत. प्रवासात वापरायच्या सँडलची किंवा चप्पलची गुणवत्ता चांगली असावी. आपले सँडल किंवा चप्पलवर ओळख खूण करावी. जेणेकरून चपलेच्या गर्दीत आपल्याला शोध मोहीम सोपी जाते… प्रवासात दागिने घालून जाणे टाळावे. फारच हौस असल्यास बेटेक्सचे दागिने घालावेत. सहलीला निघताना दशम्या, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा असे फार काळ टिकणारे पदार्थ बरोबर घ्यावेत. लेमन स्कॉश किंवा ऑरेंज स्कॉश घरून बनवून घेतल्यास शीतपेय टाळता येतात. भरपूर पाणी जवळ ठेवावे. कारण भटकंतीनंतर तहान लागतेच. पिण्याच्या पाण्याची तहान इतर कुठल्याही पेयाने भागत नाही.
प्रवास काळातले मुख्य आकर्षण म्हणजे हॉटेलमधील मुक्काम. छान छान अदबीने सेवा करणारे वेटर, उत्तमोत्तम आणि वेगळ्या ढंगाचे जेवण सगळे मस्तच मस्त, परंतु परत आपल्या स्वतःच्या घरट्यातच जायचं आहे, याचे भान ठेवून हॉटेल्स बुक करावीत. कुटुंबाबरोबर सहलीला जाणार असाल तर अगोदरच हॉटेल्सचे बुकिंग करुन ठेवावे.
‘सहलीचा आत्मा म्हणजे कॅमेरा’ मात्र, त्याचा वापर करताना काही तारतम्य पाळले पाहिजे. मनाई असलेल्या ठिकाणचे फोटो काढू नयेत, नाहीतर कॅमेरा जप्त होण्याचा व नको त्या चौकशीला सामोरे जाण्याचा धोका होऊ शकतो, प्राणी, पक्षी, निरीक्षणासाठी जाणे म्हणजे नुसते बघणे नव्हे; तर त्यासाठी दुर्बिण जवळ बाळगली पाहिजे. म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करता येईल.
प्रवासाच्या वाटेवर कधी हिरव्यागार कुरणावर लोळावेसे वाटते, तर कधी झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या गार पाण्यात पाय बुडवून बसावेसे वाटते. हे सगळे शक्य होते आपल्या स्वतःच्या वाहनामुळे त्यामुळे त्याची पूर्णतः सर्व्हिसिंग करुन घ्या आणि मगच निघावे प्रवास एक दिवसाचा असो किंवा अनेक दिवसांचा आपला आहार मितआहार व शक्तीवर्धक ठेवावा. रोज थोड्या पूरक हालचाली कराव्यात, भरपूर शुद्ध पाणी प्या, तंटा, वाद, भांडणे टाळावे, भरपूर विश्रांती घ्यावी. प्रवासात हवामान बदलते, डॉक्टरची उपलब्धता तेवढी नसते, परक्या मुलखात आलेले आजारपण आपल्याला बेजार करते. त्यामुळे सहलीच्या रंगाचा बेरंग होतो. त्यामुळे आजारी न पडण्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घेणे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. शेवटी ‘तब्येत सलामत तो प्रवास पचास.’
सुखाची हिरवळ पाहण्यासाठी दुःखाची दरी पार करावी लागते. त्यावेळी अत्यंत जागरूक व निर्भयपणे राहाणे आपल्या हातात असते. सहलीला, ट्रेकला, बोटिंगला, साहसी खेळांना जातांना एवढंच सांगावंसं वाटतं.
‘बाबूजी धीरे चलना,
राह में जरा संभलना’
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
