व्हा अनासक्त

तानाजी खूप कष्टाळू, हुशार, नितीमान कर्मचारी, कारखान्यात लोक त्यांचा खूप आदर करत. शासनाने गुणवंत कामगार पुरस्काराने त्याला गौरवले होते आदर्श कुटूंब म्हणून नात्यात त्याला मोठा मान होता. अशातच तानाजीचा एकुलता एक मुलगा चोऱ्या करू लागला. घरफोडी, लूटमार यासारख्या अनेक गुन्हयात वर्तमानपत्रात त्याचे नाव झळकू लागले पोलिसांकडून कुटूंबाला वारंवार त्रास होऊ लागला. या सगळ्या बदनामीने तानाजी मनाने पार खचला व नैराश्यात गेला. त्याला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली.

दुसरी घटना चिमणशेठची मुलगी मॉडेलिंग करून चित्रपटसृष्टीत करियर करण्यासाठी वेगवेगळया पोझ मध्ये तोकड्या कपड्यातील फोटो फेसबुक वर टाकू लागली. समजावून, धाक दाखवून, मारहाण करून तिच्यात काहीच फरक पडेना म्हणून लोक काय म्हणतील या विचारांनी चिमणशेठ पूर्णतः खचले.

मित्रांनो असे अनेक आई-वडिल आपल्या मुला-मुलीच्या विचित्र वागण्यामुळे खूपच हैराण झाले आहेत. लोक काय म्हणतील, माझ्याच वाट्याला अशी संतती का आली, पुढे कसे होणार, यासारख्या विचारांनी हे पालक सतत चिताग्रस्त दिसत आहेत. खरोखर जरा खोलवर विचार केला तर प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कर्माचा साठा बरोबर घेऊन जन्माला येते व प्रत्येक व्यक्ती ही सगळयाच दृष्टीने भिन्न असते. दुसऱ्याला बदलणे हे आपल्या हातात नसते. आपण प्रयत्न करू शकतो. पण त्या व्यक्तीचा मानस, पुर्वकर्मसम्मुचय, समजून घेण्याची क्षमता, पुर्वग्रह अशा अनेक बाबीचा विचार करावा लागतो. त्यामुळे सर्व बाजूंनी प्रयत्न करूनही व्यक्ती बदलत नसेल तर आपण स्वतःला त्रास का म्हणून करून घ्यायचा ? यावर विचारमंथन करणे गरजेचे आहे व “सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग’ हे तर आपल्याला माहितच आहे आपल्याला त्रास होतो. कारण आपण संबंधित व्यक्तीशी असलेल्या नात्याशी आसक्त झालेलो असतो. तेथे मी -माझे हे विशेषण खूप घट्ट जोडून भावनिक बंधनात आपण अडकलेलो असतो.
दुसऱ्याच्या मुलाला अटक झाली-दुसऱ्याची मुलगी तोकडे कपडे घालून मॉडेलिग करतेय याचे आपल्याला दुःख का होत नाही. कारण तेथे या विशेषणांची आसक्ती थोडीही नसते. म्हणून जीवनात अनासक्त होणे गरजेचे असते. हे अनासक्त व्हायचे तर तेथे नात्यातील मी माझा हे बंधन मनातून दूर करणे गरजेचे असते. याबाबत विवेकानंदानी एक खूप छान गोष्ट सांगितली आहे.
एक मावशी एका बंगल्यात लहान मुलाला सांभाळायचे काम करत असे. आई ज्या पध्दतीने आपल्या मुलाची काळजी घेते त्याच पध्दतीने मावशी त्या मुलाची काळजी घेत असे. ते मुल उठल्यावर त्याला आंघोळ घालणे, दुध पाजणे, खेळवणे, झोपवणे अशी सर्व सेवा ती दाई करत असे. एका वर्षानंतर जवळच्याच बंगल्यातील इसमाने त्या दाईला आपल्या लहान मुलाला सांभाळण्याचे काम करायला तयार असशील तर आत्ताच्या पगारापेक्षा २ हजार रूपये वाढवून देण्याचे आमिष दाखवले. या दाईने पूर्वीच्या मालकाला मला तुम्ही २ हजार रूपये पगार वाढवा अन्यथा मी नोकरी सोडणार असल्याचे सांगितले. त्या मालकाने नकार देताच दाई त्या मुलाचा सांभाळ करण्याचे काम सोडून निघून गेली. आई ज्या ज्या गोष्टी मुलाला सांभाळताना करते, त्या सर्व गोष्टी ती दाई करत होती. पण मुलाला सोडून जाताना व नोकरीचा त्याग करताना तिला किंचितही वाईट वाटले नाही. कारण हा माझा मुलगा आहे, या भावनेची दोरी तिने स्वतःच्या मनाला बांधली नव्हती. मी व माझा हे दुःखाचे कारण असते. म्हणून आपल्या मुला-मुलींसाठी, नातेवाईकांसाठी जी आपली कर्तव्ये असतात ती मनापासून पार पाडा फक्त ही कर्तव्ये पार पाडत असताना नात्यातील आसक्तीचा बंध दूर ठेवा. माझा मुलगा, माझी मुलगी या घट्ट आसक्तीमुळे आपल्या अपेक्षा खूप वाढतात व अपेक्षाभंग झाला कि दुःख वाट्याला येते. दुसऱ्याच्या मुलाला-मुलींना काही झालं की, आपणांस तेवढे वाईट वाटते का? जेवढे आपल्या मुलांना काही झाल्यानंतर वाईट वाटते? म्हणून कौटुंबिक कुठलीही नाती सांभाळताना आसक्तीच्या बंधनात न अडकता अनासक्त व्हा त्यांच्या प्रती असलेली कर्तव्ये पार पाडताना कर्ताभाव न ठेवता साक्षीभाव ठेवा. मी व माझे हे बंधन दूर करण्यासाठी ध्यान करा व आनंदी रहा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!