मध्यम मार्ग

जेव्हा एअर कंडीशनर आले तेव्हा हेन्री फोर्डने घर -पोर्च ऑफिस-कार -सगळेच एअर कंडीशनींग केले त्यामुळे अल्पावधीतच तब्येतीच्या कटकटी सुरू झाल्यावर त्याला डॉक्टरांकडे जावे लागले. डॉक्टरांनी हेन्रीला सकाळी व संध्याकाळी एक एक तास गरम पाण्याच्या टबमध्ये पडून राहण्यास सांगितले त्यामुळे शरीरातून भरपूर घाम निघून हेन्रीचे स्वास्थ्य चांगले झाले हेन्नीच्या लक्षात आले की, दिवसभर आपण घाम पूर्णतः वाचवतो व संध्याकाळी घामाघूम होतो. दिवसभर शरीरावर पूर्णतः थंड हवेचा व संध्याकाळी पूर्णतः उष्णतेचा मारा करण्यापेक्षा शरीर संतुलनासाठी आपण मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. याच मध्यम मार्गाने हेन्नी फोर्डच्या आयुष्यात फार मोठा बदल घडला.
भगवान बुद्धांनी मध्यम मार्गाचा अवलंब करून फार मोठी क्रांती घडवून आणली होती. ते म्हणायचे अतिरेक टाळा, मध्यम मार्गाने चला एके दिवशी सारिपुत्त बुद्धांना म्हणाला भगवान आपण मध्यम मार्गीवर इतका जोर देत आहात कि मला वाटू लागलय की हा पण एक अतिरेकच होईल काय? बुद्ध म्हणाले या अतिरेकाने जनमाणसाचे कल्याणच होईल बाकी सर्व अतिरेक हे वर्ज्य आहेत. ज्याप्रमाणे विणेकरी वीणा वाजवताना तार ही मध्यम ताणातच ताणतो. तेव्हा तिचा सुरेख ध्वनी बाहेर पडतो. तार जास्त ताणली तर ती तुटते व कमी ताणली तर तिचा आवाज निघत नाही कुठलीही गोष्ट अति ही घातक असते, म्हणतात ना “अति सर्वत्र वज्येंत” .
काही लोक मनाला खूपच दाबून ठेवतात, मन मारून मारून दमन करतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात चैतन्य लोप पावून नैराश्य येते व काही लोक मनाला मोकाट सोडतात.
मनाला मोकाट सोडलं कि ते आपली हानी करू शकते. त्यामुळे दुःख निर्मितीच्या डोहाकडे आपण खेचलो जातो. म्हणून मनाला कुठे आवर घालणे व कुठे सैल सोडणे यासाठी मनाची प्रशा जागवावी लागते. शरीर लाडावून सोडणे जेवढे वाईट तेवढेच ते भंडावून सोडणेही वाईट. सतत बसून राहणे किवा सारखेच धडपडत राहणे, अजिबात विचार न करणे किंवा उगीचच असंबंधित बाबींचा अखंड विचार करणे या दोन्हीही गोष्टी सारख्याच निरर्थक असतात. शरीर आणि मन यांचे बाह्यांग व अंतरंग यांचे प्रमाणबद्ध संवर्धन केल्यास मनुष्य सुखी होऊ शकतो. पैशाचा अतिविचार करत पैसे कमविण्याची ईर्षा ठेवून तब्येतीकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे याउलट अत्ति पैसा हा वाईट असतो असे मानून त्याच्याकडे पुर्णतः दुर्लक्ष करणे या दोन्ही चुकीच्याच गोष्टी आहेत.
सर्व प्रकारचा व्यासंग करताना मध्यम मार्गावर चालता चालता प्रकृतीकडे मनाकडे लक्ष दिल्यास, विवेकाने वागल्यास व मध्यम मार्गाचे आचरण केल्यास जीवनात बहार येतो. मध्यम मार्ग अनुसरण्यासाठी मनाची प्रज्ञा विकसित करणे गरजेचे असते. त्यासाठी मनाला ध्यानाची जोड द्या. सर्वांत महत्वाचे म्हणजे आयुष्य हे सुखदुःखाचे मिश्रण आहे. यशाचा आनंदोत्सव किंवा अपयशाचे दुःख भोगताना मध्यम मार्ग लक्षात असू द्या. कारण जीवनात प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे. मध्यम मार्ग आपणास स्थिर राहण्यास मदत करतो, त्यामुळे मन समतेत राहते.

“सुख आये नाचे नही – दुःख आये नही रोय।
दोनों में समता रहे – उत्तम मंगल होय ।।”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

 

 

error: Content is protected !!