सुषमा माहेरी पुण्यात आली होती. पेपरमध्ये माझे लेख वाचून मला आवर्जून भेटायला आली होती सासू, नणंद व नवऱ्याकडून वारंवार होणारा अपमान, पाणउतारा यामुळे ती स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसली होती. स्वतःला अबला म्हणवून घेत होती. न्यूनगंडाने ग्रस्त होती.
मी तिला पूर्णतः बोलून दिले. थोडी मोकळी व शांत झाल्यानंतर मी तिला म्हटले. सुषमा स्त्री ही किंगमेकर असते. आजपर्यंत जेवढे राजे, संत, महंत, महापुरुष होऊन गेले त्यांना जन्म देणारी स्त्रीच असते.
“जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती राष्ट्राला उद्धारी” असं म्हटलं जातं. एक पुरूष शिकला तर एक व्यक्ती उभी राहते पण एक स्त्री शिकली कि अख्खं घर उभे राहते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे, माता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे रमाईमाता, महात्मा फुलेंच्या मागे सावित्रीमाता उभ्या होत्या म्हणून ते महत्त्कार्य करू शकले. निसर्गाने शक्तीचे वरदान स्त्रीला दिले आहे. हिंदू संस्कृतीत अन्नाचे खाते अन्नपूर्णेकडे, विद्येचे खाते-सरस्वतीकडे, पैशाचे खाते लक्ष्मीकडे तर शक्तीचे खाते जगदंबेकडे दिलेले आहे. स्त्री प्रचंड शक्तीमान, प्रेमळ व सहनशील असते. महाराष्ट्रात १० आत्महत्या रेकॉर्डवर आल्या तर त्यात पुरूषांची संख्या ७ व स्त्रीयांची संख्या तीनच असते. सिंधूताई सपकाळ आडाणी आहेत पण सिंधूताईंवर लोक पी.एच.डी. करताहेत. तू बलवान व शक्तीमान आहेस हे सुषमाला मी पटवून दिले. व दुपारी आमच्या क्लबच्या गेटटुगेदरला चल म्हटले.
माहेरीच असल्यामुळे व वेळ असल्यामुळे सुषमाने माझ्याबरोबर येण्याचे मान्य केले. पण ती म्हटली, सेलिब्रेशन ला काहीतरी कारण पाहिजे ना रे? मी तिला म्हटले बोट नाकाजवळ घे बघ श्वास चालू आहे का? अरे आपला श्वास चालू आहे, आपण जिवंत आहोत, यापेक्षा सेलिब्रेशन ला अजून काय हवंय? सुषमा गेटटुगेदरला अनेक मुलीमध्ये मिसळली, गायली, नाचली. तिला खूप छान वाटले. अनेक नवीन मैत्रिणी मिळाल्या तिच्यातला न्युनगंड दूर झाला. उत्साह अंगात संचारला. निरोप घेताना ती मला म्हणाली, हे कौन्सलीग करायला, तू अगोदर का नाही रे भेटलास?
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
