उड्डाणटप्पू गंगचा म्होरक्या सुरेशचे लग्न होऊन २ वर्षे झाली होती घरप्रपंच चालवण्यासाठी तो रिक्षावर जायचा, मानदुखीच्या त्रासामुळे त्रस्त सुरेशला त्याचा मित्र भाऊड्याने योगाच्या वर्गाला आणले होते.
भाऊड्याने गुरुजीना सुरेशची ओळख करून दिली. वर्ग चालू झाला. योगथेरपी म्हणून गुरुजींनी सुरेशला मानेचे व्यायाम व सूर्यनमस्कार करून घेतले. डोळ्याच्या व्यायामाला सुरवात झाली. गुरुजी म्हणाले, सुरेश मी मी लेफ्ट म्हटले कि मान न हलवता डावीकडे पहायचे फक्त डोळ्याची नजर हलवायची. सुरेश हो म्हणाला पण गुरुजी लेफ्ट म्हटले कि सुरेश पूर्ण मानेसकट नजर डावीकडे वळवायचा. गुरुजींनी बऱ्याच वेळा सांगूनही तो फक्त डोळ्यानेच डावीकडे न बघता मानेसकट नजर डावीकडे न्यायचा. गुरुजींना नक्की काय अपेक्षित आहे, हे सुरेशला लक्षात येत नव्हते. शेवटी भाऊड्याने मध्येच हस्तक्षेप करून सुरेशच्या कानात कुजबुज करून काहीतरी सांगितले व तो गुरुजींना म्हणाला, सर मी त्याच्या कानात योग्य ते सांगितले आहे आता तो बरोबर करेल. गुरुजी सुरेशला लेफ्ट म्हणाले, सुरेशने मान न हलवता बरोबर डोळा डावीकडे वळवला व नजर डावीकडे स्थिर केली. आश्चर्यचकित गुरुजींनी, भाऊड्याला विचारलं, भाऊ तु याच्या कानात काय सांगितलं? ज्यामुळे याने मान न वळवता फक्त नजरच डावीकडे वळवली. भाऊड्याने गुरुजींनी सांगितलं, गुरुजी मी त्याच्याकानात सांगितलं, सुऱ्या तु आणि तुझी बायको जनरल स्टोअरमध्ये काहीतरी खरेदी करताय, त्याचवेळी डावीकडे एक सुंदर पोरगी आली. उजवीकडे बायको शेजारीच उभी आहे. तिला कळून न देता तु डाव्या बाजूला उभ्या असलेल्या देखण्या पोरीला कसं बघशील? तसं बघ. सर सुऱ्याला त्याच्या भाषेत सांगितलं कि लगेच समजतं. म्हणून समोरच्याला त्याच्या भाषेत सांगायला शिका.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
