जगु आनंदाने

 

स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला अथांग महासागराच्या तीरावर उभे राहून समुद्राच्या मध्यभागी असलेल्या प्रचंड आकाराच्या शीळेकडे पहात होते त्या प्रचंड शीळेवर जाऊन ध्यानस्थ बसण्याची अंतस्थ उर्मी तेव्हा त्यांच्यात दाटून आली. पण जवळ कवडी देखील नव्हती शेवटी त्यांनी नावाड्याला तिथे नेण्याची विनंती केली परंतू पैशांअभावी नावाड्याने ती धुडकावून लावली तक्षणी विवेकानंदानी पाण्यात उडी घेतली आणि ते पोहत पुढे निघाले, भरतीचा काळ असल्याने जोरात वेगवान लाटा पुढे मागे जात होत्या. काही लाटा जोराने येऊन विवेकानंदाच्या छातीवर आदळत होत्या. नाका-तोंडात पाणी जात होते, लाटेच्या वेगवान माऱ्याने स्वामी ३ ते ४ फुट मागे फेकले जायचे. लाट म्हणत होती.. “नरेंद्रा मागे फिर, मी तुला पुढे जाऊ देणार नाही, मी तुला खाऊन टाकेन.” स्वामीजींच्या मनातील प्रचंड सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास म्हणत होता.. ज्याच्या पराक्रमाला सीमा नाही तो तरूण मी आहे. “लाटे तू मला काय खाऊन टाकणार! अगं मीच तुला पिऊन टाकेन, मला कोणीही मारू शकत नाही, माझे कोणीही तुकडे करू शकत नाही,” “अहंम-ब्रह्मासि”.
सकारात्मक विचारांच्या ऊर्जेने स्वामीजी इप्सित स्थळी पोहोचले व तेथे केलेल्या ध्यानाने त्यांचे योग्यात रूपांतर झाले. विचारांची केवढी ही ताकद. दारूच्या आहारी गेलेल्या माणसाची दोन मुले, दोन सख्खे भाऊ. एक पुर्णतः दारूच्या आहारी गेलेला संसार विस्कटलेला, व्याकुळ जीवन जगत होता तर दुसरा भाऊ उच्चशिक्षित, ऐश्वर्यसंपन्न व निर्व्यसनी सुखात जीवन जगत होता. दारू पिणारा जीवनाबाबत भाष्य करीत होता, अहो मी दारू पिणाऱ्या बापाचा मुलगा व्यसन पण अनुवंशीक असतं. माझ्याकडून कसली अपेक्षा करताय ? नरकयातना माझ्या पाचवीलाच पुजलेली…….
दुसरा मुलगा म्हणाला, बाबांचे दारूमुळे झालेले हाल व अशिक्षीतपणामुळे झालेली गळचेपी मी उघड्या डोळयांनी पाहिली होती, तेव्हांपासून ठरविले होते खूप शिकायचे मोठे व्हायचे, व्यसनांपासून दूर रहायचे आणि चांगले जीवन जगायचे वडिलांकडे बघण्याच्या दृष्टीकोनातील दोन सख्ख्या भावांचा हा फरक.
या फरकाने आपण बोध घेऊ या की थोडक्यात आपलं सगळं आयुष्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. संत महंत म्हणतात “तुम्हीच तुमच्या जीवनाचे भाग्यविधाते आहात” तुमच्या मनातील विचारच तुम्हाला घडवतात. ब्रिटीश म्हणाले होते, भारतीयांच्या विचारांना मारून टाका म्हणजे ते मरतील. १५० वर्षे ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केलं. भारताच्या मानाने तुटपूंजी लोकसंख्या असलेल्या या देशाच्या प्रतिनिधींना विचारलं, तुमचा गुरू कोण आहे ? त्यावेळेला त्यांनी सांगितले ‘ऑक्सफोर्ड व स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटी’ स्पष्टीकरण देताना ते म्हणाले या विद्यापीठात आम्हाला रोज बिंबवले जायचे.
“तुमचा जन्म राज्य करण्यासाठी झाला आहे.” ९९ बकऱ्यांचे नेतृत्व एक वाघ करत असेल तर १०० वाघ एकत्र विहार करत आहेत असा सिध्दांत असतो.
गरूडाचे अंडे, कोंबडीच्या पंखाखाली उबवले… यथावकाश त्यातून गरूडाचे पिल्लू बाहेर पडले पण ते कोंबड्यांसारखेच ओरडू लागले, दाणे वेचू लागले, खुराड्यात जाऊन बसू लागले व पुढे ते कोंबड्यांसारखेच मेले. उंच भरारी घेण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरूडाला आपल्या काल्पनिक मर्यादांमुळे अपयशी जीवन जगावे लागले, हा दोष कोणाचा?
नेहमी स्वतःला सकारात्मक बनवा त्यासाठी सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. मानसशास्त्र असं सांगतं की ज्या गोष्टींचा तुम्ही वारंवार विचार कराल त्याच गोष्टीला तुम्ही तुमच्याकडे आकर्षित कराल, म्हणून सकारात्मक व्हा आनंदी रहा ! व मनाला एवढंच सांगा “या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे”

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!