… आणि ती हसली

 

शंकर महाराजांच्या मठासमोर सकाळी सकाळी दोन आजीबाई जोरजोरात भांडत होत्या. मठाच्या दारातच त्या भिक्षा मागताना दिसायच्या व तेथेच झोपायच्या. मठाच्या दारातच त्यांचं छप्परविरहित भिंतीविरहित घर. लोकांनी दिलेल्या भिक्षेवर त्यांचा उदनिर्वाह चालायचा. मी कारमधून उतरलो व त्यांच्या जवळ जाऊन भांडणाचे कारण विचारले. तेव्हा एक आजी म्हणाली, “हिनी माझी बाटली चोरली. आता मी पाणी कशानी पिऊ?” दुसरी आजी माझ्यासमोर शपथ घेऊन, नाय हो सायेब, मी कशाला हिची बाटली घेऊ? उगीचच मला शिव्या देतीय बघा असे म्हणाली.
मी त्या आजीला माझ्या कारजवळ घेऊन गेलो माझी पाण्याची बाटली तिला दिली. ती जाड बाटली बघून आजी बेहद खुश झाली व हसायला लागली. तिने माझ्याकडे हात करून आशीर्वाद दिला. हसत हसत परत ती भिक्षा मागायला अंथरलेल्या गोणपाटावर जाऊन बसली. दोघीची भांडणे मिटली.
मित्रांनो मी आजीला जी बाटली दिली तशा ३ ते ४ बाटल्या माझ्या घरात पडून आहेत. मला काहीच फरक पडला नाही पण त्या बाटलीमुळे भांडणे टळली आणि आजीबाईला मात्र पिण्याचे पाणी ठेवण्याची सोय झाल्यामुळे खूप फरक पडला होता. तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या घरात वर्षानुवर्षे पडून आहेत व समाजातील लोकांना त्याची उणीव आहे. वर्षानुवर्षे दहा- दहा जोड कपडे, चप्पल, बूट, मुलांच्या सायकली, भांडीकुंडी घरात पडून आहेत, वापरत नाही अशा गोष्टी घरातून बाहेर काढा व ज्यांना अभाव आहे त्यांना द्या, पहा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व हास्य. चला तर मग शोधूया आपण काय काय देऊ शकतो आपल्या गरजवंत बांधवांना.

मधुबन खुशबू देता है । सागर सावन देता है।।
जीना उसका जीना है। जो औरो को जीवन देता है।।

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात  मनाची मशागत या पुस्तकातून)

error: Content is protected !!