एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघुम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. तो पाय सारखा वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असतानाही तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटलं. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलांसाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी ती भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत.
मुलगा लहान होता. त्याला त्याचं अप्रुप वाटलं. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटलं. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, काका, तुम्ही देव आहात का? या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, अरे नाही रे बाबा, मी देव नाही. मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला. म्हणाला, काका-तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार. मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवलं. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसानं त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्य बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही. पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.
स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव काय कळणार ? “शिवभावे जीवसेवा” हा मंत्र स्वामीजींनी तरूणांना दिला होता.
गाडगेबाबा तर किर्तनात सांगायचे जगाचा नियंता असलेला देव देवळात कोंडू नका. देवाला कर्मकांडांची गरज नसते. एकदा नाशिकला काही शिष्यांनी गाडगेबाबांना विचारले “बाबा, तुम्ही आम्हाला देव दाखवू शकाल का ?” बाबा म्हणाले ठीक आहे. उद्या दाखवतो, असे ते म्हणाले व सकाळी सुर्याचा लालसर गोळा वर येताच साऱ्यांना म्हणाले, हे पहा- हा आपला देव-नमस्कार करा याला. हा बारा महिने आपल्यासंगे राहतो. या सुर्यनारायणासारखे अनेक नारायण तुमच्या समोर उभे ठाकतील. कदाचित रंजले-गांजलेले असतील त्यांना मदत करा. त्यांची सेवा करा आणि पुढे ते म्हणाले,
“शेंदूर माखोनिया धोंडा । पाया पडती पोरे रांडा ।
सोडोनिया खऱ्या देवा । करी धोंड्याची सेवा ॥”
म्हणजेच माणसातच त्यांनी देव पाहिला होता.
देवासाठी बळी दिलेल्या मुक्या प्राण्यांच्या हत्येला त्यांचा तीव्र विरोध होता. देवासाठी मुक्या प्राण्यांचा बळी ही परमेश्वराची थट्टा आहे असे ते म्हणत. “असा कसा तुमचा देव । घेतो दुसऱ्याचा जीव ।॥”
आचार्य गोएंकाजींना विचारले देव म्हणजे काय ?
ते म्हणाले “सत्य ही ईश्वर है परमसत्य ही परमेश्वर है ।”
आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी देवत्व मिळवण्यासाठी अनेक प्रकारची कर्मकांड करतो. तुकाराम महाराज म्हणतात “ज्याचा अभिमान गेला – तुका म्हणे तोच देव झाला”
म्हणून अहंकाराला-अभिमानाला मूठमाती देऊन देवत्व प्राप्त करा. देवत्व प्राप्त करणे किती लोकांना शक्य आहे माहित नाही. पण आपण सर्वजण ‘देवाचे मित्र’ मात्र नक्की होऊ शकतो.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
