मी असे सुचवू का, तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि अधिक ताजेतवाने वाटण्यासाठी, तुम्ही आठवड्यातून कमीतकमी एक दिवस तरी टेक्नोलॉजी-मुक्त राहा?
याचा अर्थ पूर्ण चोवीस तास फोन नाही, सोशल मीडिया नाही, चॅट्स नाहीत आणि डिजिटल खरेदी नाही. प्रत्येक आठवड्याला.
फक्त जगण्यासाठी. तुमच्या आयुष्यातील मूलभूत आणि बऱ्याचदा संवेदनापूर्ण आनंद उपभोगण्यासाठी. वर्तमानात राहण्यासाठी (विखुरलेपणाने नाही) आणि मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आत्मविश्वासी होण्यासाठी (चिंताग्रस्त नाही). एखाद्या अनोळखी परिसरात हरवून जाण्यासाठी किंवा एखादे नवीन पुस्तकाचे दुकान शोधण्यासाठी. एखादा नवीन पदार्थ चाखून बघण्यासाठी किंवा एखाद्या छुप्या बागेतून अनवाणी फेरफटका मारण्यासाठी. तुमच्या आसपास जे तुमचे आप्त आणि मित्र आहेत, त्यांच्यावरील तुमचे प्रेम वाढवण्यासाठी, किंवा काहीच न करण्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी.
आता मनाशी असे ठरवा की आठवड्यातील एक दिवस सकाळी झोपेतून उठल्या क्षणापासून ते रात्री झोपेपर्यंत, तुमची सगळी डिजिटल उपकरणे बंद करून एका कपाटात तुमच्या दृष्टिआड ठेवून द्याल. ज्यामुळे तुम्ही जागृत राहाल. आश्चर्यासाठी. सौंदर्यासाठी. निसर्गासाठी. आताच्या या क्षणासाठी. अरेरे- डिजिटल व्यत्ययामुळे आपल्या साहसाच्या संवेदना बोथट होतात. आपल्या आयुष्यातील डिजिटल व्यत्यय कमी करेल अशी अजून एक प्रभावी पद्धत मी तुम्हाला सांगतो. मी याला दोन फोन तंत्र असे म्हणतो.
एक मुख्य-संपूर्ण माहितीने परिपूर्ण असा फोन ज्यामध्ये तुमचे सोशल मीडिया, बातम्या, हवामान आणि इतर ऍप्स असतील. अजून एक दुसरा फोन सर्व प्राथमिक माहिती असलेला/ स्ट्रीप-डाऊन केलेला-तुमच्या जवळ ठेवा, जेव्हा तुम्ही अगदी लक्षपूर्वक एखादी गोष्ट करत असाल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही काहीतरी महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक कामात मग्न असाल तेव्हा पहिल्या फोनमुळे तुमच्या कामात व्यत्यय येणार नाही.
अनेक पिढ्यांपूर्वी, आठवड्यातून एकदा, लोक एक दिवसाची सुट्टी घेत असत (त्याला सब्बाथ असे म्हणत). काहीही काम नाही, चिंता नाही, काहीही करायचे नाही; फक्त आराम करायचा असे त्याचे सूत्र होते. यामुळे लोकांच्या सकारात्मकतेत वाढ होत असे आणि लोक नव्याने ताजेतवाने होत असत. माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्हीही असेच करावे. या क्षणभंगुर पण शानदार जगातील आश्चर्यांशी स्वतःला पुन्हा जोडून घेण्यासाठी. तुमच्या बालपणातील स्फुल्लिंग पुन्हा एकदा चेतवण्यासाठी. तुमचा रिकामा झालेला गडू पुन्हा एकदा भरण्यासाठी.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
