।। आहार व अध्यात्म ।।

मनुष्याचा पिंड अन्नमय आहे. शरीराला अन्नाचा पुरवठा करावाच लागतो, परंतु तो प्रमाणात असावा जेणे करून स्थूलपणा येणार नाही, सुस्ती व आळस येणार नाही. शरीरात उत्साह कायम राहील इतके अन्न घ्यावे. रोजचे सामान्य जीवन जगण्यासाठी जास्त आहाराची गरज नाही. कारण जास्त आहार घेतला की, नवीन विचार सुचत नाहीत. अति आहार घेणाऱ्यांना मनःशांती लाभत नाही. मन दुर्बल होते. तेव्हा खाण्यावर नियंत्रण ठेवा.

 

जप करताना जांभया येणे, ध्यान करताना कंटाळा येणे हे सर्व अति आहाराचे लक्षण आहे. रात्री उपाशी राहू नये परंतु जेवणावर नियंत्रण ठेवावे. भूक लागणे ही नैसर्गिक क्रिया आहे. तृप्त होईपर्यंत खा. अति आहार नको.

 

जे लोक वयाच्या ५० वर्षाच्या जवळपास आहेत त्यांनी आतापासूनच तब्येतीची काळजी घ्यावी. जेवणावर पूर्ण नियंत्रण ठेवावे. शरीरातील अवाजवी स्थूलपणा कमी करून जास्त दिवस कसे जगता येईल ते पाहावे. अध्यात्मात प्रगती करण्यासाठी शरीरशुद्धी आवश्यक आहे. शरीर शुद्ध झाल्याशिवाय मनःशांती लाभत नसते आणि मनःशांतीशिवाय अध्यात्म साधत नाही.

 

प्रत्येक मनुष्यामध्ये पशुभाव अंतर्भूत आहे. मनुष्य जन्म मिळण्याअगोदर पशुजन्म होऊन गेलेले असतात. त्या प्रत्येक जन्माची काहीतरी छाप मनावर राहिलेली असते. हा पशुभाव कमी करण्यासाठी सोवळे पाळणे, सोवळ्याच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. पशुभाव कमी करण्यासाठी हे उत्तम साधन आहे.

 

शुद्ध व व सात्त्विक अन्नामुळे विचार शुद्ध होतात. मनातील मलीनता कमी होते. बोलणे प्रभावी बनते. वाणीचा प्रभाव वाढतो. सात्त्विक अन्नात विशेषकरून भाताचा उल्लेख करावा लागेल. तांदूळ शिजवताना जो रस निर्माण होतो तो त्यातच मुरतो. भाताला पूर्णब्रह्म म्हणता येईल. अन्नपचनानंतर त्यातून रक्त तयार होते. मेंदूला रक्ताचा पुरवठा होतो व त्यामुळे बुद्धीची व मनाची वाढ होते.

 

                                                                                                            आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!