मी अच्युत गोडबोले सरांची अनेक पुस्तकं वाचली. अगदी सध्याच वाचलं ते म्हणजे ‘अर्थात.’ गोडबोलेंच्या लिखाणाची शैली खूपच रंजक असते. जे जे त्यांना वाचतात ते ते सगळेच मान्य करतील. पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधी, त्यांचं लिहिलेलं ‘प्रास्ताविक’ वाचणं म्हणजे पर्वणीच वाटते. त्यांचं प्रास्ताविक म्हणजे त्यांच्या मनाचा आरसाच असतो. ‘अर्थात’ हा अर्थ म्हणजे पैसा… पैशाचं शास्त्र. खरंतर अत्यंत क्लिष्ट विषय. माझंच सांगायचं तर मी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी. मला तर ‘अर्थशास्त्र’ फक्त नावापुरतंच माहीत. पण अच्युत सरांचं ‘अर्थात’ वाचायला सुरुवात केली आणि तस-तसं एक एक संकल्पना, व्याख्या समजत गेली आणि वाटलं हे खरंच माहीतच असायला हवं.
कोणतंही लेखन जेव्हा इन्फॉर्मेशन आणि नॉलेज असतं तेव्हा ते लिहिणं सोपं नसतं! त्यासाठी वाचन अगाध असावं लागतं. विश्वभरातील अनेक तज्ज्ञांचे विचार, माहिती, तर्क, टीका यांचा अभ्यास असावा लागतो आणि तो लेखकाने केलेला असतो. अर्थातच लेखन करताना लेखकानेदेखील जगभरातील अनेक पुस्तकं वाचली आहेत, हे प्रास्ताविकातून समजतं. अच्युत सरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जी जी पुस्तकं वाचतात, त्यांची नावं, त्यांचे लेखक आणि त्या पुस्तकाचे सौंदर्य, उत्कृष्टता, उपयुक्तत्ता यांचंही दिलखुलास वर्णन करतात.
‘अर्थात’ पुस्तकाची सुरुवात अर्थ क्षेत्रातील नाम वंतांच्या प्रतिक्रियांनी झालेली आहे. यामध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. डी. एम. नाचणे, डॉ. अभय पेठे, डॉ. राजस परचुरे, डॉ.धनमंजिरी साठे, डॉ. चंद्रहास देशपांडे, डॉ. नीरज हातेकर, डॉ. रूपा रेगे, डॉ. रोहिणी साहनी या सर्वांच्या पुस्तकावरील प्रतिक्रिया वाचनीय आहेत.
लेखकाला हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, या मागची प्रेरणा, तळमळ ही इतकी वाचनीय आहे की, आपण नकळत या अवघड विषयात रमत जातो, गुंतत जातो आणि आपल्यालाही लेखक सुरस भाषेत अर्थशास्त्र उलगडवून सांगतात. ही किमया फक्त लेखकच करू जाणे.
जगभरात चालणाऱ्या आर्थिक उलाढाली, शेअर बाजार कसा चालतो. इतिहासातील बार्टर पद्धती कशी होती आणि विशेष म्हणजे जगात होऊन गेलेले अर्थतज्ज्ञ, त्यांची हुशारी, त्यांचं पॅशन, त्यांच्या रंजक सत्यकथा या पुस्तकात वाचायला मिळतात. बँका व बँकांचे व्यवहार कसे चालतात? बलाढ्य राष्ट्रांची आर्थिक स्थिती, त्यांचे परिणाम हे सगळं वाचणं म्हणजे अद्भुत आहे. अच्युत सरांच्या प्रत्येक पुस्तकाचा शेवट हा वाचकांना नवीन दृष्टी देऊन जातो. विचार करायला भाग पाडतो. स्वार्थी दुनियेतून बाहेर काढून सभोवताली पाहायला शिकवतो. हीच तर लेखकाने जिंकलेली बाजी असते. उगीचच बाजारपेठेची गणितं मांडत बसण्यापेक्षा या जागतिकीकरणाला ‘ह्युमनफेस’ देण्यासाठी या ‘पर्यायी जगा’साठी चळवळ उभी केली तरच अर्थशास्त्र शिकण्याचा फायदा होईल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – वर्षा दौंड (९७५ ७४३ ०६८५)
