मित्रांनो, कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस कमी होत आहे. लवकरच आपण कोरोनामुक्त जग पाहू, पण या कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं. त्यामुळे परवा सार्स, आज कोरोना तर उद्या आणखी काय येईल माहीत नाही. म्हणून आता आपण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोड देण्यासाठी सज्ज राहिल पाहिजे. कोरोना च्या कालावधीत बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एकाच प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत असल्यामुळे या लोकांना खूप हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. नोकरी परत कधी मिळेल माहीत नाही. यातून आपण आज बोध घेणे गरजेचे आहे. एकाच मार्गाने उत्पन्न येत असेल तर उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करा. वॉरन बफे म्हणतात, “जर एकाच मार्गाने शंभर रुपये येत असतील तर एक एक रुपया शंभर मागनि येऊ द्या.” त्यामुळे नोकरीबरोबर इतर जोडधंदे तयार करून वेगवेगळ्या मार्गानी उत्पन्न मिळवण्याकडे कल असू द्या. ‘परिवर्तन संसार का नियम आहे.’ हे लक्षात राहू द्या. अनेक प्रकारची कौशल्ये आत्मसात करा. कुठल्याही कामाला कमी लेखू नका. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घ्या. उत्कृष्ट प्लंबर, उत्कृष्ट वेल्डर, उत्कृष्ट सुतारदेखील दरमहा लाखो रुपये कमावतात.
मित्रांनो, इथून पुढच्या काळात तुम्हाला येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने राहता आले पाहिजे. पूर्वी मोबाईलवर मित्र-मैत्रिणीचे चालणारे चॅटिंग आता सर्वजण म्हणजे मुले व पती राज (वर्क फ्रॉम होम) असल्याने तुमच्या संसारात विघ्न आणू शकते. त्यामुळे सावधान ! पूर्वी कोणी कोणाच्या मोबाईलला हात लावत नव्हते. आज मुले तुमचा मोबाईल ऑनलाईन क्लाससाठी वापरत आहेत. त्यामुळे गॅलरीतील अनावश्यक कचरा, नको ते व्हिडिओ सतत डिलीट करत जा. काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही. मोबाईल, फेसबुक वापरताना जागृक राहणे व डिजिटल मीडियाचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात डिजिटल मीडिया नॉलेज असणाऱ्या, वक्त्यांनी घरात बसून ऑनलाईन सेशन घेऊन भरपूर उत्पन्न वाढवले. ज्यांना हे जमले नाही त्यांची मात्र आवक अचानक बंद झाली. म्हणून वेळेनुसार बदल करून नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे गरजेचे आहे. महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक होते. म्हणून मित्रांनो रोज व्यायाम करा.
मित्रांनो, माणसे या महामारीच्या काळात ताणतणावात गेली आहेत. म्हणून या मनावरचा ताण कमी करण्यासाठी, माणसे जोडा, एकलकोंडेपणा सोडा, वेळेचे व्यवस्थापन करा, व्यायाम करा, तोंडात लाळ तयार करून ती लाळ गिळा. लाळेमध्ये एड्रानिल असते, त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. म्युझिक विशेषता शास्त्रीय संगीत ऐका.
योगा व प्राणायाम करा.
आपल्या रोजच्या जगण्यात मनात येणारे विचार एका फुलस्केप पेपरवर कसल्याही प्रकारचा विचार न करता भराभर लिहा. व ते परत न वाचता फुलस्केप पेपर फाडून टाका. यामुळे दबलेल्या भावनांना रिलीफ मिळतो. आठवड्यातून एकदा पायाचा घोटा बुडेल एवढ्या गरम पाण्यात मूठभर मीठ टाकून ते हलवा. त्या मिठाच्या पाण्यात दहा मिनिटे पाय ठेवून बसा. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. आपला आवडता छंद जोपासा.
लहान मुलांबरोबर खेळा. पाळीव प्राण्यांशी खेळा.
लोक काय म्हणतील, याच्यावर जास्त विचार करू नका. भावनांचे दमन करू नका. शरीराला मसाज द्या.
टाळ्या वाजवा सकारात्मक विचार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ शांतपणे दहा मिनिटे मांडी घालून बसा. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा. डोळे बंद करून श्वासाला जाणत राहा. समजा नैराश्याचे प्रमाण जास्तच वाढले, फार आत्महत्येचे विचार वारंवार येऊ लागले तर मेंदूमध्ये काही रासायनिक घटकांची कमतरता झाल्याने जीवरासायनिक असंतुलन होत आहे. हे लक्षात घेऊन ते घटक वाढवण्यासाठी त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे आपण वेडे आहोत असे मुळीच नाही. अमेरिकेमध्ये ६० टक्के लोक कधी ना कधी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतात. अवास्तव अपेक्षा न बाळगता आनंदी राहावयास शिका. आनंदी जीवन जगण्यासाठी दहा दिवसीय विपश्यना ध्यान शिबिर करा. विपश्यना शिबिर पूर्णतः मोफत असते. आपले स्नेहसंबंध सुधारण्यासाठी व मनाच्या मूळ स्वभावाकडे जाण्यासाठी समोरच्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा. अनेक घटस्फोटाच्या मुळाशी गेले असता पति-पत्नी दोघेही एकमेकांचे कौतुक करावयास कमी पडलेले दिसले. एखादी चूक आपल्या आयुष्यात घडली असेल तर मोठ्या व्यक्तीसमोर ती कबूल करून पुन्हा ती घडणार नाही. असा दृढ संकल्प करा. अपराधीपणाची भावना ठेवून जगू नका. चांगली संगत धरा.
अॅडजेस्टमेट करायला शिका. व्यसनांपासून दूर राहा. समतोल आहार घ्या. चांगल्या सवयी लावा. वाईट सवयी दूर करा. नैतिक मूल्य सांभाळा. क्षमा मागा, क्षमा करा. निःस्वार्थपणे इतरांची सेवा करा. क्रोधावर ताबा मिळवा. नैसर्गिक भावभावनांचे दमन करू नका. बुवा, महाराजांच्या नादी लागू नका. स्वतःवर प्रेम करा. अहंकार दूर ठेवून नम्रता धारण करण्याचा अभ्यास करा. चांगले कर्म करा. फळ चांगले येईल.
मित्रांनो, उन्नत जीवनाचा राजमार्ग यातच सामावलेला आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
