◊ विपश्यना दुःख मुक्तीचा राजमार्ग
मित्र अद्वैतचा फोन आला, “सर, तुम्हाला मला अर्जंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर, माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय, वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाणे बंद केले आहे. व्यवस्थापन व संघटनेने खुपदा समजावलं, पण जगायचंच नाही म्हणतोय! स्वतःच्या पत्नीविषयी खूपच गैरसमज व संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले आहे. एकदा तर त्याने आत्महत्यतेचादेखील प्रयत्न केला होता. सर, त्याला लहान मुलं आहेत.”
त्याला यातून बाहेर काढण्यासाठी आपली मदत हवी आहे. अद्वैतच्या या मित्राला अविनाशला कुटुंबासह भेटायला बोलावले व सर्व परिस्थिती समजावल्यावर अविनाशला दहा दिवसीय विपश्यनेच्या शिबिराला बसवले.
त्याचे शिबिर यशस्वीरित्या पूर्ण झाले. विपश्यनेच्या दैनदिन सरावानंतर मन सबळ में निर्मल होत गेले. अविनाश नैराश्यातून बाहेर पडला, कामावर रुजू झाला. दारू बंद झाली. संशयाचे भूत मानगुटीवरून उतरले, स्वतःला व इतरांना समजून घेण्याची मनोवृत्ती वाढली आज सुखाने संसार चाललाय त्याचा.
◊ अशीच एक घटना –
एक परिचयाची महिला मला म्हणाली, “सर माझ्या डॉक्टर मैत्रिणीला नैराश्य आलेय. प्रेमभंग झालाय तिचा. मनाने खूप खचलीय नैराश्य, व्याकुळता, मानसिक अस्वस्थेमुळे एकदा तर तिने झोपेच्या खूप गोळ्या खालल्या होत्या “.
“तिला थोडी प्रेरणा व सहानुभूती देऊन मदत करावी.” त्याप्रमाणे डॉ. शर्मिलाशी बोलणी केली.
संवादातून ‘दुनिया में इतना गम है- मेरा गम कितना कम है।’ हे तिला उमगले शर्मिलाने माझ्या सांगण्यानुसार विपश्यना शिबिर पूर्ण केले. आज ती खूप प्रसन्न आणि आनंदी असते. स्वतःची वैद्यकीय प्रक्टिस तिने सुरू केलीय. दैनंदिन ध्यान करत असते.
मित्रांनो, अनेक प्रकारचे दुःखीकष्टी लोक विपश्यना ध्यान केंद्रावर (मनाच्या व्यायामशाळेत) कोमजलेले दुःखी-खिन्न चेहरे घेऊन येतात व शिबिर संपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आनंद बघण्यासारखा असतो.
अपयशाने करियरच्या चिंतेने, कोरोनाच्या भीतीने, घटस्फोट, व्यसन, न्यूनगंड, भित्रा स्वभाव, आत्मविश्वासाचा अभाव, मानसिक व शारीरिक आजार, रॅगिंग, छळ, आर्थिक कमकुवतपणा, बेरोजगारी अशा अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस लोक आत्महत्येकडे वळत आहेत. याला प्रमुख कारण मनाची दुर्बलता हे आहे. एका वर्षात भारतात १ लाख ३५,५८५ जणांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर लहान मुलांसाठी एकदिवसीय आनापान ध्यान शिबिर व १८ वर्षांवरील व्यक्तीसाठी ‘विपश्यना शिबिर’ हे उत्तम रामबाण औषध आहे. मनाची सबलता व निर्मलता वाढवून शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती साधणारे हे विपश्यना ध्यान साधना २५०० वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी शोधून काढली. पु. आचार्य सत्यनारायण गोयंकाजीच्या व्हीडीओ, ऑडीओच्या माध्यमातून हे ध्यान शिकवले जाते. राज्य सरकारने या साधनेला १४ दिवसांची परावर्तित रजा मंजूर केली आहे. विपश्यना ही साधना श्वास व संवेदनावर आधारित असल्याने कुठल्याही जातीचा, वर्णाचा, पंथाचा स्त्री-पुरुष ही साधना करून आपलं मन शुद्ध करू शकतो. संप्रदाय विहीन अशीही साधना आहे. प्रथम तीन दिवस आनापान सती म्हणजे श्वासाच्या साहाय्याने मन एकाग्र करणे शिकवले जाते. व नंतर सात दिवस विपश्यना साधना संवेदनांच्या आधारावर शिकवली जाते. शेवटच्या दिवशी मंगल मैत्री शिकवली जाते. या साधनेमुळे मन सबल व निर्मल होते. सगळा निसर्ग संसार मानवी मनाचा खेळ आहे. त्याचप्रमाणे ९० टक्के आजार हे मानवी मनाशी संबंधित असतात. त्यामुळे मन सबल व निर्मल केले तर माणसाची स्मरणशक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते, एकाग्रता वाढते, भय कमी होते, चंचलता दूर होते व आजारापासून तो दूर राहतो. मन एकाग्र झाल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. व जीवनात यशस्वीतेच्या दिशेने तो मार्गक्रमण करू लागतो. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सर्व दृष्टीने उच्च पदाला नेणारी अशी ही संप्रदायविहीन साधना आहे
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व तुरुंगातील बंदी जनांसाठी ही शिबिरे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मनुष्य निर्मळ झाला तर राष्ट्र निर्मळ होईल या विचारसरणीने आता वेग घेतला आहे. तिहार तुरुंगात आयपीएस किरण बेदीने बंदी जणांसाठी विपश्यनेचे शिबिर राबवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. आजही तिहार तुरुंगात ही शिबिरे चालू असतात.
पुण्यात स्वारगेट व आळंदीजवळ, मरकळ या गावी असलेल्या विपश्यना केंद्रावर ही शिबिरे विनामूल्य घेतली जातात.
इगतपुरी, नाशिक म्हणजेच धम्मगिरी हे या साधनेचे प्रमुख केंद्र असून जगभरात जवळजवळ अडीचशे विपश्यना केंद्र मोफत विपश्यना शिकवण्याचे काम करतात. जुन्या साधकांच्या दानावर सर्व काम चालते.
पुण्यातील दोन्ही केंद्रांवर दरमहा ३०० लोक प्रतीक्षा यादीवर असतात.
मित्रांनो, सारा संसार मानवी मनाचा खेळ आहे. मन हे प्रमुख आहे. हजार युद्धं जिंकण्यापेक्षा मनाचं एक युद्ध जिंकणारा योद्धा सर्वश्रेष्ठ असतो. म्हणतात ना ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.’ अशा या खचलेल्या -निराश-वैफल्यग्रस्त मनाला सबळ व निर्मल करून आनंदाने जीवन जगण्यासाठी एकदा का होईना या मनाच्या व्यायामशाळेत जा व जाताजाता आपल्या मनाला हसतपणे सांगा,
“आ चल मैं तुझे, मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तले,
जहा गम भी ना हो आसू भी ना हो,
बस प्यार हि प्यार पले.”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
