स्त्रीला सगळ्यात प्रिय काय असतं..!

राजा हर्षदीपने, राजा किर्तिसेन यांचा पराभव केला व संपूर्ण प्रदेश काबीज केला. राजा किर्तिसेनला, त्याने पायापाशी बसवले व विचारले? ‘बोल किर्तिसेन, आता तुझं काय करायचं?’
किर्तिसेन म्हणाला, “महाराज मी आपणास शरण आलो आहे, आपण जे काही सांगाल ते मला मान्य आहे.”
राजा हर्षदीपचे व पत्नीचे कधीच पटत नव्हते. त्यांचे वारंवार खटके उडत, भांडणे होत. त्यामुळे राजा हर्षदीप दुःखी होता, राणीशी कसं वागायचं? हे त्याला कळतच नव्हतं. म्हणून तो किर्तिसेनला म्हणाला, “माझं तुझ्याकडे एक काम आहे. स्त्रीला सगळ्यात प्रिय काय हवं असतं? या प्रश्नाचं अचूक युनिव्हर्सल व रिझल्ट देणारे उत्तर तू मला आणून दिलेस व त्यामुळे राणीची व माझी भांडणं थांबली, तर मी तुला तुझा प्रदेश परत देईल व तुला सोडून देईल. पण हे उत्तर मात्र तू मला पाच दिवसात आणून दिले पाहिजे. किर्तिसेन राजाला, हर्षदीप राजाची ही अट मान्य झाली. तो गावात आला, त्याने अनेक स्त्रियांना विचारलं, “ताई, सांगा स्त्रीला सगळ्यात प्रिय काय असतं?” कोण आई म्हणाले, कोण बहीण, वडील, कोण मुलं म्हणाले, तर कोण म्हणाले ‘पती’ तर प्रत्येक महिलेचं उत्तर वेगळ होतं. राजा हर्षदीपला उत्तर हे युनिव्हर्सल व त्वरित रिझल्ट देणारं हवं होत अनेक वेगवेगळ्या गावांत जाऊन कीर्तिसेनाने, अनेक महिलांना प्रश्न विचारला? पण त्याला प्रत्येक महिलेकडून वेगवेगळी उत्तरं मिळत होती शेवटी तीन दिवस झाले, चौथा दिवस उजाडला किर्तिसेन चिंतातुर अवस्थेत बसून होता. तेवढ्यात जवळून त्या भागातील गोविंद भाऊ ज्याला किर्तीसेनन खूप मदत केली होती. तो तेथून चालला होता थोडक्यात किर्तिसेन यांचा तो आता जवळचा मित्र झाला होता. त्याने किर्तिसेनला, पाहिले आणि चिंतेचं कारण विचारले. गोविंदला किर्तिसेनने हे सर्व हकिकत सांगितली आपल्या किर्तिसेन राजावर आलेले संकट पाहून गोविंद भाऊ ला एकदम गहिवरून आले, तो किर्तिसेनला म्हटला, समोरच्या डोंगरावर असलेल्या मंदिराच्या बाजूला एक भलामोठा वृक्ष आहे, त्यावर एक चेटकीण राहते ती या प्रश्नाचे युनिव्हर्सल व रिझल्ट ओरिएंटेड उत्तर देईल याची मला खात्री आहे. चल आपण दोघेही तिला या प्रश्नाचे उत्तर विचारू. कीर्तिसेन व गोविंद भाऊ त्या डोंगरावरील भल्यामोठ्या वटवृक्षाजवळ गेले, व गोविंद भाऊ व कीर्तिसेन तेथे बराच वेळ बसल्यानंतर जोरात आवाज आला व तेवढ्यात झाडावरील ती चेटकीण त्याच्यासमोर प्रकट झाली व तिने जोरदार हास्य करत विचारले, “काय रे, कशाला आलात तुम्ही येथे ? काय काम काढले?” त्यावेळेस गोविंद भाऊने त्या चेटकिणीला हात जोडले. व राजा कीर्तिसेनची सर्व कहाणी सांगितली फक्त एकच दिवस उरला आहे. कीर्तिसेनला या प्रश्नाचे योग्य व रिझल्ट ओरिएंटेड व युनिव्हर्सल उत्तर नाही मिळाले, तर विजयी राजा हर्षदीप किर्तिसेनचा शिरच्छेद करेल यासाठी या प्रश्नाचं, सर्वमान्य आणि रिझल्ट देणारे उत्तर तू आम्हाला सांगावं, म्हणून मी किर्तिसेनला, इथे घेऊन आलो आहे. गोविंद भाऊ हा अत्यंत तरुण, राजबिंडा देखणा शेतकरी होता.
ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, “तुझ्या मित्राला हवे, असलेले योग्य उत्तर जे युनिव्हर्सल व रिझल्ट ओरिएन्टेड असेल, ते मी सांगते, त्याच्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो. पण त्यासाठी माझी एक अट आहे.
गोविंद भाऊ म्हणला, “तू जे म्हणशील ते मला मान्य आहे. पण माझा मित्र मात्र वाचला पाहिजे. कृपया या प्रश्नाचे योग्य उत्तर तू सांग.”
तेवढ्यात ती म्हणाली, “मी उत्तर सांगितल्यावर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल.”
हे ऐकताच किर्तिसेन गोविंद भाऊला म्हणाला, “गोविंद, अरे जाऊदे तू चेटकिणीची लग्न करण्याची रिस्क घेऊ नको. चल इथुन, आपण निघुन जाऊ. तू तुझे आयुष्य का खराब करतोस?”
तेव्हा गोविंद भाऊ म्हणाला, “किर्तिसेन तुम्ही राजे आहात, तुम्ही जगलात तर नवीन राज्य निर्माण करू शकतात. तुम्ही संर्वांनाच सुखी ठेवू शकता, माझे काय घेऊन बसलात ? असे म्हणून गोविंद भाऊने चेटकिणीला होकार दिला. चेटकिणीने उत्तर दिले, स्त्रीला सगळ्यात प्रिय असते ‘निर्णय घेण्याचा अधिकार’ चेटकीण म्हणाली, “गोविंद आता मी तुझी बायको आहे, किर्तिसेनला जाऊ दे. तू इथेच थांब. गोविंद भाऊने विनंती करून कीर्तिसेनला, राजा हर्षदीपकडे धाडले. किर्तिसेनचे उत्तर ऐकून हर्षदीप खुश झाला. दुसऱ्या दिवशी राणीने हर्षदीपला विचारले, “जेवण काय करू?” हर्षदीप राजा म्हणाला, “जे तुला आवडेल ते.” त्या नंतर तिने विचारले, “आपण आज आमराईत जायचं का?” हर्षदीप म्हणाला, “तू म्हणशील तसे.” खरोखर राणी बेहद खुश झाली व त्यांची ‘तू तू मैं मैं’ थांबली. किर्तीसेनने आणलेले उत्तर एकदम लागू पडले. राजा हर्षदीपने किर्तिसेनची सुटका करून त्याला त्याचे राज्य परत दिले, तिकडे चेटकिणीने गोविंद भाऊला विचारले, गोविंद, मी दिवसाची व रात्रीची सुंदर युवती होऊ शकते किंवा दिवसा सुंदर युवती व रात्रीचे चेटकीण होऊ शकते तू सांग मला, “मी कधी काय होऊ?” गोविंद चाणाक्ष होता, त्याला माहीत होतं की, “स्त्रीला सगळ्यात प्रिय निर्णय घेण्याचा अधिकार असतो.” हे त्याने ऐकलं होतं त्यामुळे तो चटकन म्हणाला तुला जे योग्य वाटतं ते कर. तेवढ्यात चेटकीन म्हणाली, “मग मी दिवसा व रात्री दोन्ही समय सुंदर युवती होऊन तुझ्याबरोबर राहते.” ती सुंदर होऊन गोविंद समोर प्रकटली. गोविंद तिचे रूप पाहतच राहिला.
मित्रांनो, गोष्ट काल्पनिक आहे. पण त्यातून जो काही बोध आहे तो तुम्ही तुमच्या जीवनात वापरून बघा काय चमत्कार होतोय .एखाद्या स्त्रीला निर्णयाचा पूर्ण अधिकार द्या, पण समजा तिच्या एखाद्या निर्णयामुळे नुकसान होण्याची चिन्हं दिसत असतील, तर तिला प्रेमानेपण समजून सांगण्याचा प्रयत्न करा. तेही महत्त्वाचे आहे. स्त्रीला मानसन्मान व कौतुकाची भूक असते. स्त्री घरातील सगळ्या लोकांच्या आवडीनिवडी बघून त्या प्रमाणे कार्य करत असते. स्त्रीला कधी एखादी गोष्ट हवी असेल ती डायरेक्ट बोलत नाहीत. ज्या वेळेस स्त्री तुम्हाला विचारल आपण असं करायचं का? त्या वेळेला समजून चला की तिला ते करण्याची इच्छा आहे. तिला ते घेण्याची इच्छा आहे. व त्याला होकार देउन तिचं मन जिंका.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!