रीनाने मला फोन केला.
“सर, उद्या भेटायला येऊ का? पंधरा मिनिटे का होईना वेळ द्याल का?”
रीना आमच्या कॉलेजमध्ये होती. परंतु ती कला शाखेत शिकत होती. त्यामुळे तसा तिचा व आमचा फारसा संपर्क येत नसे. परंतु एकदम सरळ साध्या राहणीमानाची व संस्कृतीला जपणारी, चौकटीत राहणारी, खानदानी मुलगी म्हणून, कॉलेजमध्ये तिच्यावर शिक्का होता. दिसायलापण ती छान होती. पण जास्त ती कोणात मिसळत नसे. आपला अभ्यास, आपलं कॉलेज व आपलं घर हे तिचं विश्व होतं. देखणी पोरगी जास्त दिवस कुठे घरात ठेवता, म्हणून आई-वडिलांनी वयाच्या एकविसाव्या वर्षीच तिचा विवाह करून टाकला होता. ती आमच्या घराच्या जवळच रहात होती. ‘दै. सकाळ’मध्ये संपादकीय पानावर तिने माझ ‘परिमळ’ सदर बऱ्याचदा वाचलं होतं. माझं ‘मनाची मशागत’ हे पुस्तकही तिने अॅमेझॉनवरून ऑनलाईन घेऊन, संपूर्ण वाचले होते. त्यामुळे पुस्तकावर असलेला फोन नंबर घेऊन, तिने मला फोनवर संपर्क साधला. तिने मला फोन करताच आमच्या कॉलेजच्या गतस्मृती जागृत झाल्या व तिला मी त्वरित वेळ दिली. दिलेल्या वेळेप्रमाणे रीना मला भेटायला आली. आल्या आल्या ती खूप गोंधळलेली वाटत होती. मी तिला चहा मागवला व कॉलेजच्या गप्पा सुरू केल्या. बोलताबोलता तिला थोर्ड कम्फर्टेबल वाटल्यावर, मी तिच्या घरचा विषय काढला. त्यावेळी तिला रडू कोसळले रीनाचा नवरा महेश हा फारच व्यभिचारी होता रिनाने आत्तापर्यंत त्याची दोन प्रेमप्रकरणे पकडली होती. तो नेहमी घराबाहेरच असायचा घरीपण तो मोबाईलवर, आपल्याच धुंदीत असायचा.
रीनाने आई-वडिलांना, सासु-सासऱ्यांना, याबाबत कल्पना देऊन, बरेचदा त्याच्याबरोबर घरगुती मीटिंग घेऊन, त्याला समजावून सांगण्याचा, व त्याला त्यातून बाहेर काढून, संसारात नीट लक्ष देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला होता. त्याला अनेक कौन्सिलरकडे ती घेऊन गेली होती. पण त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही
रीना आपल्या नवऱ्याला, भरकटलेल्या मार्गावरून, परत आपल्या सुखी संसारात घेऊन यायचा प्रयत्न करत होती. आणि फिरूनफिरून सारखाच त्याचाच विचार तिच्या मनात असायचा पण ह्या गोष्टीचा त्याच्यावर काहीच सकारात्मक परिणाम होत न्हवता शेवटी रीना नैराश्याकडे वळू लागली. तिची मुलं लहान होती. असे असूनदेखील, तिला आत्महत्ये सारखे भयंकर विचार मनात येऊ लागले होते. आणि त्याच वेळेला ती मला भेटायला आली अश्या मानसिक अवस्थेत तिला धीर देणे फार गरजेचे होते. म्हणून मी तिच्या मर्मावरच बोट ठेवले आणि तिला तिच्या लहान निरागस मुलांचा हवाला देत, तिला थोडं वास्तवात झाकून बघायला सांगितले. एवढेच बोललो की, तुझ्या गेल्यानंतर तुझ्या लहान मुलांचे काय भवितव्य असेल, त्याचे चित्र डोळ्यासमोर आण. हा विचार तिच्या मनात आला आणि एका भयंकर स्वप्नातून जागी व्हावी तशी ती खाडकन शुद्धीवर आली.
माझा अध्यात्म शास्त्राचा अभ्यास असल्याने, मृत्यूप्रसंगी चित्त जर अस्वस्थ असेल, तर पुढचा जन्म हा व्याकूळ व अस्वस्थता देणाराच मिळतो, असे संदर्भासहित स्पष्टीकरण मी तिला दिले. नवऱ्याचे काय…? तू मेल्यानंतर तो तीन ते चार महिन्यात दुसरे लग्न करून मोकळा होईल. त्यामुळे तू या आत्महत्येच्या निर्णयाला रद्द कर.
रीनाचे चित्त थोडे शांत झाल्यावर, मी तिच्या आयुष्याबद्दल थोडे जाणून घ्यायचे प्रयत्न केले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, तिला कोणी मित्र किंवा मैत्रिणीचं नव्हते. पूर्ण संस्काराच्या चौकटीत वाढलेल्या रीनाला मित्र तर लांबच, मैत्रिणीही नव्हत्या.
नेमकं पुढच्या आठवड्यात आमच्या ग्रुपचे गेट टुगेदर होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील मित्र, मैत्रिणी, एकत्र येऊन आम्ही एक ग्रुप तयार केला होता. त्यातील काहीजण दर रविवारी मॉर्निंग ट्रेकला जायचे. महिन्यातून एकदा आम्ही सर्वजण गेट टुगेदरला एकत्र यायचो. मी रीनाला या गेट टुगेदर साठी आमंत्रित केल. गेट टुगेदरच्या आदल्या दिवशी आमची क्रिएटीव्ह ग्रुप मेंबर काउंसलर स्नेहलला मी रीनाविषयी व तिच्या मानसिक स्थिती विषयी सर्व माहिती दिली होती. त्यामुळे रीनाला, स्नेहलने हळूहळू पार्टीत पूर्ण इन्व्हॉल्व्ह केले. त्या दिवशी रीना आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या मित्र मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये आली होती. स्नेहल व इतर जणींनी तिला बोलते केले. गाण्याचा व नृत्याचा कार्यक्रम झाला. एकत्र भोजन झाले. अनेक मित्र- मैत्रिणीनी रीनाला आपली ओळख करून दिली. रीना आयुष्यात पहिल्यांदाच एवढी खुलली होती. रविवारी तिने ट्रेकिंगच्या ग्रुपबरोबर जाणं चालू केलं. त्यात काही मित्र मैत्रिणींची तिची घट्ट दोस्ती झाली. शॉपिंगला जाण, एकमेकांशी गप्पा मारण, एकमेकांना मदत करणे, एकमेकांची काळजी घेणे चालू झाले. या ग्रुपमधून रीनाला भरपूर प्रेमानंद, आपलेपणा, सुरक्षिततेची भावना मिळू लागली. त्यामुळे तिचे मन प्रसन्न झाले. आरोग्यावरही चांगले परिणाम दिसू लागले. रीना पहिल्यापेक्षा आकर्षित व उत्साहित दिसू लागली. तिचा नवरा मात्र अजून त्याच दुष्टचक्रात अडकलेला होता. रिनाने त्याला सलग पाच वर्ष त्यातून बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न केले आणि शेवटी, तिला जेव्हा हे लक्षात आले, की तिच्या ह्या प्रयत्नांचा तिच्या नवऱ्यावर काहीच परिणाम होत नाहीये, किंवा होणार नाहीये तर तिने, त्याला सुधरवण्याचा फाजील विचार सोडून दिला. तिने एक दीर्घ मोकळा श्वास घेतला आणि स्वतःचा एक सुंदर, मोकळ्या मनाचा, निःस्वार्थ मित्रमैत्रिणीचा, असा एक ग्रुप उभा केला आणि ती तो धागा धरून आनंदाने पुढे जाऊ लागली. तिने स्वतः एक NGO काढली. आज ती सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. नुकताच तिला सामाजिक कार्यात, उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शासनाचा ‘सेवाभावी कार्यकर्ती’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. परवा तिने मला फोन केला व आमच्या ऑफिसवर भेटायला आली. ती अत्यंत प्रसन्न होती. चहा घेताघेता मला म्हणाली, “सर, तुम्ही भेटला नसता तर नक्की मी आत्महत्येच्या विचारापर्यंत गेले होते.” तेव्हा हसतच मी तिला म्हणालो, “अगं आता तो विचार परत मनात आणायचा नाही… आणि उलट आता तू ज्या लोककल्याणाच्या मार्गावर चालायला लागली आहेस, आणि तू दुसऱ्यांच्या हितासाठी काम करत आहेस, त्यावर माझ्या मनात एकच विचार येतो…” “जो राह चुनी तूने… उस राह पे राही चलते जाना रे…. हो कितनी भी लंबी रात… दिया बन जलते जाना रे…”
चौकटीत राहणाऱ्या मित्रमंडळींनो, चौकटीत जीव गुदमरू लागला, तर चौकट सोडून जरा बाहेर या व जीवनाचा आनंद घ्या. म्हणतात ना ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.’
थोडासा रफू करके देखिये ना…
फिरसे नई सी लगेगी.
जिंदगी ही तो है…
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
