प्रख्यात वक्त्याची ‘मनाची शक्ती’ या विषयावरची कार्यशाळा सुरू होती. वक्त्याने ५० रुपयांची करकरीत नोट खिश्यातून काढली. व त्याने श्रोत्यांना पहिला प्रश्न केला.
सांगा ही ५० रुपयांची नोट कोणाला हवी आहे? पैसा तर प्रत्येकालाच हवा असतो. पण कोणीही हात वर केला नाही. कारण लोकांच्या मनात संभ्रम, शंका, भीती व हा काय देणार आहे का? असे अनेक विचार फिरत होते. यानंतर वक्त्याने ही नोट चुरगाळली व विचारलं, “सांगा, आता ही नोट कोणाला हवी आहे का?” काही जणांनी हात वर केला. हात वर करणाऱ्यांच्या विचारात काही काळाने बदल झाला होता.
तीच नोट आता त्याने जमिनीवर फेकली व तिला अजून चुरगाळलं व विचारलं, “आता सांगा ती नोट कोणाला हवी आहे.” बऱ्याच जणांचे हात वर आले, नोट खाली टाकून चुरगळल्यामुळे काळपट झाली होती.
मग वक्त्याने श्रोत्यांना विचारले की, “सांगा मित्रांना या नोटेला मी चुरगाळलं, खाली फेकलं, काळपट केलं तरी तिच्या किंमतीत काही फरक पडला का तर अजिबात नाही.”
नोटेचे उदाहरण आपल्याला वेगळ्या अर्थी लागू होते. उदा. कामाच्या ठिकाणी आपल्या कामातल्या न केलेल्या चुकाही दाखवून दिल्या जातात. काही वेळा दुसऱ्यांच्या चुकांचं खापर आपल्यावर फोडले जाते. कनिष्ठ म्हणून वरिष्ठांकडून अयोग्य वागणूक मिळते. त्यामुळे आपला आत्मविश्वास खच्ची होतो, पण इथेच स्वतःला सावरण्याची गरज असते. आपले काम चोख करावे आणि जे येत नाही ते शिकाऊ वृत्ती ठेवून आत्मसात करावे त्यामुळे कामाची गती वाढेल, चुका कमी होतील. चुकीमुळे आपल्या कौशल्याची किंमत कमी होत नाही, फक्त ती एक संधी असते त्या कौशल्याला अधिक धार चढवण्याची.
मित्रांनो, आयुष्यात आपणही बऱ्याच वेळा खाली पडतो. लोक आपल्याला त्रास देतात. आपली निंदा करतात, बदनामी करतात. या परिस्थितीत आपण मनाने खचू शकतो म्हणून लक्षात ठेवा कोणी कसेही वागले तरी मनाने आपले अस्तित्व अबाधित ठेवा. आपला स्वाभिमान, सन्मान कमी होऊ देऊ नका.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
