आधार…

काल मी कणीक मळत होते.. त्यामुळे उजवा हात अडकला होता आणि चहा पण उकळायला ठेवला होता. चहा उकळल्यावर त्यात दूध तर घातलं. पण डाव्या हाताने गाळणार कसा ?

तरी पण प्रयोग म्हणून मी गाळलाच. तर त्यात एकदा गाळणं वाकडं झालं. चहा सांडला. नाना कसरतीतून मी तो प्यायला. पण चहा प्यायल्याचे समाधान झाले नाही. मला जरा डाव्या हाताचा राग आला. एवढं पण काम धड जमत नाही म्हणजे काय ?

कसं ना ? उजवा हात पण माझाच. डावा पण माझाच. पण जी कामे मला उजव्या हाताने लिलया जमतात ती डाव्याने अजिबात जमत नाहीत. तरी पण मी त्याला आहे तसं स्विकारलं ना ?

बरं म्हणून तो अगदीच बिनकामी आहे का ? मी विचार करू लागले तर अजिबात नाही. जड उचलताना, आधार घेताना पटकन तोच पुढं येतो…

म्हणजे तो जन्मापासूनच माझ्याबरोबर असल्याने फारशी खळखळ न करता मी ते स्वीकारलं आहे. हां आता. उजवा हात कापलं भाजलं की तो येतोच की पुढं. नाही कुठं म्हणतोय ?

तसंच आपल्या भावंडांचंसुद्धा असतं ना ? आपण कितीही भांडलो, तुलना केली तरी ती तशीच आहेत हे स्वीकारलेलं असतं. त्यामुळे आपण त्यांच्याकडून अवास्तव किंवा आहे त्याच्या विरूदध् वागण्याची अपेक्षाच केलेली नसते किंवा आपण त्यांना फारसं बदलण्याच्या भानगडीतही पडत नाही. अगदी आई वडिलांचे स्वभावसुद्धा. बरेचदा तेही मनाविरूद्ध असू शकतात तरी पण आपण लहानपणापासून त्यांना आपण स्विकारलेलंच असतं. की माझी आई अशीच वागणार किंवा बाबा असेच बोलणार. वगैरे वगैरे..

तीच गोष्ट नवरा बायकोची. काही बायका असतात हट्टी, कडकड्या प्रत्येकवेळी आपलंच म्हणणं खरं करणाऱ्या. तसेच नवरेदेखील. फालतू कारणावरून चिडणारे, एकदम अबोल किंवा कायम जगाची चिंता स्वतःच्या डोक्यावर घेणारे. तरी पण एकत्र राहतात. का ?

कारण त्यातला कुणीतरी एकजण दुसऱ्याला आहे तसं स्वीकारतो म्हणून….

हेच जर स्वीकारलं नाही गेलं आणि त्यातला कुणीतरी कायमच वरचढपणा किंवा मी म्हणेन तसं दुसऱ्यानं वागलंच पाहिजे असं हेकेखोर असेल तर ?

माझी एक मैत्रिण तिच्या सरांबद्दल सांगत होती की तिच्या सरांचं अगदी सगळं ठरलेलं असतं. अगदी सहा महिन्याच्या मेडिकल चेकअप् सकट ते आठवड्याला कुठल्या भाज्या करायच्या इथपर्यंत आणि बाहेर जातानासुद्धा त्यांनी आणि त्यांच्या बायकोने कुठले कपडे घालायचे. यासकट सर्व….

ती म्हणाली. किती मज्जा ना ? मॅडमना काही तोशिषच नाही. सगळं pre planned पण मी म्हणाले…

हा तर सरळ सरळ न दिसणारा अन्याय आहे. म्हणजे त्या बायकोला एक दिवस हिरवी नाही. पिवळी साडी नेसाविशी वाटली तरी तिनं ती नेसायची नाही. का ? तर नवऱ्याला कसं वाटेल म्हणून. पहिले थोडे दिवस प्रेमाने दुसऱ्याचे ऐकणे वेगळे. पण कायमच असे कसे वागता येईल. दोन वेगळ्या व्यक्तिंची मतं, राहण्याची स्टाईल हे भिन्न असणारच ना ?

समजा एखादी बाई देवभोळी असेल. नवरा तिला म्हणाला. बाहेर जाऊया आणि ती सारखी देवळातच घेऊन गेली तर ?
किंवा एखादा नवरा पार्टी संस्कृतीतच वाढलेला असेल. पण त्याच्या बायकोला तसं जमत नसेल, पटत नसेल. तर ?

हां आता. एखादेवेळी स्वतःच्या मनाला मुरड घालून, किंवा प्रेम म्हणून किंवा दुसऱ्याच्या मताचा आदर म्हणून वागणं ठीक आहे. पण प्रत्येकवेळी हे कसं शक्य आहे ?

उजव्या हाताची कामं तुम्ही जशी डाव्या हाताकडून adjust करून घेता. तसं एक वेळ ठीक. पण तो जसा आहे तसाच accept केला तरच दोन्ही हात त्यांची कामं नीट करू शकतील ना ?

जसा तुम्हाला डाव्या हाताचा तो तसाच आहे म्हणून सतत राग येत नाही किंवा तुम्ही त्याला वळवून उजवं करण्याचा प्रयत्न करत नाही. तसंच प्रत्येक व्यक्तिंची मतं, राहण्याची स्टाईल, वागण्याची पद्धत. ही accept केली तर मजा आहे. Adjust केली तर नाही….

लेखिका : मेघना जोग.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!