। भगवान श्रीकृष्ण ।

 

भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीला, मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला आहे. भगवान श्रीकृष्णानी ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवसाला जन्माष्टमी म्हणतात.

 

त्यामुळे कृष्णजयतीच्या वेळी रात्री १२ वाजता अष्टमी असणे आवश्यक आहे. तेव्हा रोहिणी नक्षत्रही असेल तर फारच उत्तम पण रोहिणी नक्षत्र असण्याची जरुरी नाही.

 

भगवान श्रीकृष्णांनी श्रावण महिन्यामध्ये जन्म घेऊन श्रावण महिन्याला परिपूर्णता आणलेली आहे. या अवताराचे स्मरण म्हणून सर्व भक्त कृष्णाष्टमीला मोठ्या भक्तिभावाने त्याची उपासना करतात. ह्या दिवशी उपवास करतात व दुसऱ्या दिवशी पारणे करतात.

 

श्रीकृष्णावताराचं मूळ सूत्र भक्ती हेच आहे. श्रीकृष्णांनी जन्मच अशा ठिकाणी घेतला की तिथे सुरुवात भक्तीनेच झाली. गोप-गोपींशी संबंध आला. तत्वज्ञान, अभ्यास हे नंतर आले. भगवंतांच्या रासक्रीडा, जलक्रीडा त्यांच्या बालवयापर्यंतच्या काळातील होत्या, बाचे ज्ञान कोणालाही नाही. भगवंतांना श्रीराम अवतारात असताना ज्या ज्या ऋषिमुनींनी त्यांना ओळखले होते त्या सर्वांनी त्यांना मोक्षाच्या इच्छेने आलिंगन देण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हा भगवंतानी ‘राजाच्या अवस्थेत असल्याने आलिंगन देऊ शकत नाहीं’ म्हणून समजावले होते. पुढे श्रीकृष्ण अवतारात येथे आले तेव्हा पूर्वजन्मातील सर्व ऋषिमुनी या गोपकन्या म्हणून जन्माला आल्या, त्यांच्याबरोबर बाल अवस्थेपर्यंत रासक्रीडा केल्या व त्यांना आलिंगने दिली. त्यानंतर भगवंत जेव्हा मथुरेला गेले तेव्हा त्यांचे वय अवघे १० वर्षांचे होते.

 

भगवान श्रीकृष्णांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा. जेव्हा गोकुळात होते तेव्हा तेथे पूर्ण समरस झाले होते. एकदा गोकुळ सोडून मथुरेला गेल्यानंतर परत गोकुळात गेले नाहीत. तसेच द्वारकेला गेल्यावर मथुरेची आठवण काढली नाही. हे सर्व विसरणे व मायेत न अडकणे हे भगवान श्रीकृष्णांकडून शिकण्यासारखे आहे.

 

ज्ञानमागनि जाऊन दुसऱ्यांची मने कशी बदलता येतील, दुसऱ्यांना ते समजावून कसं सांगता येईल यावर त्यांचा भर असे. कौरव व पांडव यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी व संहार होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णांनी शिष्टाई केली. हे पूर्णावताराचे लक्षण आहे.

 

भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारात भगवद् गीता सांगून अखिल मानव जातीला फार मोठा आधार दिला आहे, धर्माचरणाचे शिक्षण दिले आहे.

 

 

                                                                                                      आपला परिवार नागेबाबा परिवार

 

लेखक – अज्ञात

error: Content is protected !!