♠ क्रोधाची साखळी ♠
मित्रांनो, जगाच्या बाजारात जागोजागी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात आपण एक उदाहरण घेऊ या, समजा, एखाद्या नोकरदार माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खरडपट्टी काढली, त्याला झाप झाप झापले. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आतून खूप राग येतो पण नोकरी टिकवायचीय, पोटापाण्याचा प्रश्न आहे. म्हणून तो कर्मचारी हा क्रोध आतच दाबून टाकतो. क्रोध ही एक ऊर्जा आहे. तिचे दमन केले तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते. सायंकाळी हा कर्मचारी कामावरून घरी येतो, त्याच्या आत दबलेली क्रोधाची ऊर्जा बाहेर पडण्यासाठी दिवसभर धडपडत असते.
क्षणार्धात पत्नी काहीतरी गाऱ्हाणे सांगायला लागते, तत्क्षणी हा क्रोध बाहेर पडून पत्नीवर काढला जातो.
पती हा परमेश्वर, तो म्हणेल ती पूर्वदिशा हे आजपर्यंत स्त्रियांच्या मनावर बिंबवले आहे. त्यामुळे पतीच्या आरडाओरडीमुळे तिला आलेला क्रोध ती दाबून टाकते. तेवढ्यात मुलगा शाळेतून घरी येतो, पहाते तर काय, त्याचे सर्व कपडे मातीने मळलेले. यापूर्वी अनेकदा तो ग्राउंडवरून मळलेल्या कपड्यानिशी घरी आलेला पण तिला कधीच क्रोध आता नव्हता. आज मात्र ती नवऱ्याने तिच्या अंगावर टाकलेला क्रोध ती मुलाच्या अंगावर टाकते व त्याला बदडते.
मुलगा आईला काय करणार? आईने मारल्यामुळे त्याला आलेला क्रोध तो पाटी किंवा वॉटर बॉटल किंवा खेळणे जोरात आपटून तोडतो व त्याचा क्रोध बाहेर काढतो.
मित्रांनो, ही क्रोधाची साखळी अशा पद्धतीने कार्य करते व घराघरात अशांतता निर्माण होते. क्रोधाचे वरपासून खालीपर्यंत वहन होते. लॉक डाऊनचे नियम तोडल्यानंतर बऱ्याच जणांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद का मिळाला? याचे कारण तुम्हाला आता लक्षात आले असेल ऊर्जा नष्ट होत नाही. तिचे वहन किंवा रूपांतर होते.
त्यामुळे क्रोधाची साखळी तोडायची असेल व ज्याला सुखी व्हायचे असेल त्याने मनाचा व्यायाम करून मनाला सबल व संयमी बनवणे गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येकाने ध्यान करणे ही काळाची गरज आहे.
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये मी तुम्हाला फक्त दहा मिनिटांचे आनापान सती ध्यान करावयाची विनंती करतो. हे ध्यान रोज सकाळ संध्याकाळ करा. श्वास हे आलंबन असल्यामुळे कुठल्याही पंथाचा, वर्णाचा, संप्रदायाचा माणूस हे ध्यान करू शकतो. युट्युब वर Anapana Meditation taught by S.N. Goenka असे टाइप करून सर्च करा व पूज्य विपश्यनाआचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींच्या सूचनांच्या साह्याने हे ध्यान करा. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल, एकाग्रता वाढेल बुद्धिमत्ता वाढेल, चंचलता दूर होईल व भय दूर होईल. समता युक्त मन, इंद्रियांचे व ऊर्जेचे व जीवनाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करू शकते.
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक :https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S
