पंजाबमधील एक घटना वाचण्यात आली होती. रमेशचन्द्र शर्मा पंजाबमधील खन्ना नावाच्या शहरांमध्ये एक मेडिकल स्टोअर चालवत होते. त्यांनी त्यांची जीवनकहाणी सांगितली. त्यातून आपल्याला खूप काही बोध घेता येईल. आपले डोळे उघडतील. व आपल्याला निसर्गाच्या नियमांचे आकलन होईल व आपल्याकडून अशा चुका होणार नाहीत ज्याची वाईट फळ आपणास भोगावी लागतील.
रमेशचन्द्र शर्माचे स्वतःचे मेडिकल स्टोअर खूप जोरात चालत होते. त्यातून त्यांनी भरपूर मालमत्ता उभी केली. पण असे म्हटले जाते की माणसाच्या डोक्यात एकदा पैशाची हवा शिरली की तो माणुसकी हरवून बसतो. पैसाच त्याला महत्त्वाचा वाटायला लागतो. तो नीतिभ्रष्ट होऊ शकतो. रमेश शर्माने मेडिकल दुकानाच्या भरमसाठ कमाईतून जमिनी, फ्लॅट, गाड्या, सोने भरपूर मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवले होते. आपली कहाणी सांगताना रमेश शर्मा म्हणाला, “मेडिकल प्रोफेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मार्जिन असते. मूळ किंमतीच्या ४ ते ५ पट भाव घेऊन या मालाची विक्री केली जाते. पण मला कोणी दहा रुपये कमी कर म्हटले तरीपण मी नाकारत होतो. एवढा पैशाला मी लालची होतो. मी फक्त स्वतःचा विचार करत होतो. चार पैसे मला अजून कसे कमवता येतील या विचारांनी मी बेभान झालो होतो. एक दिवस उन्हाळ्याच्या दिवसात एक वृद्ध व्यक्ती माझ्या मेडिकल स्टोअर वर आला. त्याने आणलेल्या मेडिकल प्रिस्क्रिप्शननुसार मी औषधे काढली. त्या औषधांचे बिल ५६० रुपये झाले वृद्ध माणसाने सगळ्या खिश्यात हात घालून रक्कम बाहेर काढली पण ती १८० रुपये पेक्षा जास्त नव्हती. मला खूप राग आला एवढा वेळ घालवून औषधे काढली आणि या माणसाकडे फक्त १८० रुपये आहेत वयस्कर माणूस उधारीची भाषा करू लागला. त्याच्या बायकोसाठी त्याला ही औषधे हवी होती. साहेब १८० रुपये घ्या. बाकीचे मी नंतर खात्रीने आणून देतो, माझी बायको अस्वस्थ आहे तिचं वय झालंय तिला अर्जेंट औषधे द्यायची आहे. तुमच्या पाया पडतो. मला मदत करा. मी उरलेले पैसे तुम्हाला लवकरच आणून देईल. माझ्याकडे आत्ता येवढेच पैसे आहेत. मुलं पण आमच्याकडे लक्ष देत नाहीत. मला मदत करा. एक तारखेला पेन्शन मिळाली की मी उरलेले पैसे आणून देतो मी माझ्या पत्नीला जगवण्यासाठी प्रयत्न करतोय. या वृद्धापकाळात मला तिच्याशिवाय कोणच नाही. पण मी त्या वृद्धाचे ऐकले नाही. त्याला औषधे न देता हाकलून दिले. तसे पाहिले तर त्याने दिलेल्या १८० रुपयांतपण मला ३० रुपये फायदा होता. एवढी मुळात कमी किंमत त्या औषधाची होती. पण माझ्या लोभाने माझ्यातील माणुसकीचा, करुणेचा खून केला होता हे दृश्य बाजूला थांबलेल्या एका सद्गृहस्थाने पाहिले व त्याने त्या वृद्ध आजोबांच्या औषधे गोळ्यांचे संपूर्ण बिल स्वतः देऊन त्यांना औषध द्यायला सांगितली. अशा प्रकारे परोपकाराला मी पूर्णतः तिलांजली देऊन नुसते पैसे कमावण्याचा परिपाठ सुरू केला होता. यानंतर एकाच वर्षात माझ्या मुलाला ब्रेन ट्युमर झाला. खूप पैसा खर्च केला पण प्रकृती सुधारणा होत नव्हती .शेवटी मोठमोठ्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करून परदेशात मुलाला उपचारासाठी घेऊन गेलो, पण हाती काहीच लागले नाही कोटी रुपये खर्च करूनदेखील मला मुलाला वाचवता आले नाही.माझ्या एकुलत्या एका मुलाचे निधन झाले मुलाच्या उपचारासाठी मला प्लॉट, फ्लॅट व सोनं नाणं विकावे लागले. मी कंगाल झालो. शेवटी घर व दुकानही विकून टाकले. त्यानंतर सहा महिन्यानंतर मला लकवा मारला. डायबिटीसही झाला आज ज्यावेळेस मला औषधांना चार-पाच पट किंमत द्यावी लागते. दुकानदार किमतीत सूट देत नाही. त्यावेळेस मला खूप दुःख होते. एक दिवस मला इंजेक्शन्स हवे होते शंभर रुपयाचे इंजेक्शन मला सातशे रुपयाला दुकानदाराने सांगितले. माझ्याकडे पाचशे रुपये होते. दोनशे रुपये कमी असल्यामुळे दुकानदाराने इंजेक्शन्स परत दुकानात ठेवून दिली व माझा अपमान केला त्या वृद्ध व्यक्तीशी मी जसा वागलो होतो तसाच तो दुकानदार माझ्याशी वागला होता.
मित्रांनो, जे तुम्ही पेराल तेच उगवते. ‘जैसी करनी वैसी भरणी’ हे लक्षात ठेवा आपण सर्वजण पैसे कमवतो. प्रत्येकाला पोट आहे. पण बेइमानदारीने पैसे कमवू नका. गरिबांची लूट करू नका. स्वर्ग व नरक येथेच आहे. पैसा महत्त्वाचा आहे पण तो नेहमीच कामाला येत नाही. जीवनात करुणा, मैत्री जागवा परोपकार करा पुण्य अर्जित करा. हे आशीर्वाद तुम्हाला वारंवार मदत करतील.
खरोखर मित्रांनो, कर्म फल सिद्धांत हा अटळ असतो. कोणाच्या आयुष्यात कधी काय येईल काही सांगता येत नाही.
१२०० कोटी रुपयांचा मालक रेमंड कंपनीचा सर्वस्व आज मुला बरोबरच्या वादात अडकल्यामुळे स्वतः भाड्याच्या घरात राहत आहे. अशा अनेक घटनांचा मागोवा घेतल्यावर कर्म, फल, सिद्धांत याची निश्चिती अनुभवास येते. गजरे विकणारी व्यक्ती समाजकल्याण मंत्री होते, तर चहा विकणारी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होते. जन्मतःच एखादा मुलगा उद्योगपतीच्या घरात जन्मतो तर त्याचवेळी एखादा मुलगा हा जवळच्या झोपडपट्टीमध्ये जन्म घेतो. आई व वडील दोघेही उच्चशिक्षित व्यवसायाने प्रतिष्ठित डॉक्टर, सर्व प्रकारची काळजी घेऊनदेखील त्यांना झालेली मुलं
हे मतिमंद अपंग असतात. अपघातात सगळे दगावतात व चिमुरडी वाचते तिला खरचटतपण नाही याला काय म्हणायचं? शेवटी गतजन्माचा या जन्माशी काहीतरी संबंध येत असावा असे वाटून त्या अज्ञाताला जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. खूप प्रयत्न करूनही एखादी गोष्ट मिळत नाही आणि ध्यानीमनी नसताना सहजपणे मोठमोठी कामे होऊन जातात. ‘मी राजा असून आंधळा का?’ या धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राला मागच्या जन्मात धनुर्धारी असताना नेम लावून उन्मत्तपणे पक्ष्याचे डोळे फोडले या कर्मफलाचा आधार देतात. मग आपल्या हातात काय आहे? आपले भविष्य काय असावे या दृष्टीने आपले वरतन आचरण आणि वृत्ती असावी. म्हणून सत्कर्म करा व यम- नियमांचे पालन करून सुखाचे अधिकारी व्हा. सर्व पापांपासून दूर राहा. शास्त्रीय ज्ञानाच्या बळावर जीवन समृद्ध व सुखावह करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करा पण कधीकधी जीवनाला वेढणारा अज्ञाताचा, अनिश्चिततेचा जो कर्मफल सिद्धांताचा भाग आहे तोही स्वीकारण्याची तयारी असू द्या. शेवटी म्हणतात ना, ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ आपल्याला त्या कर्म फळातून बोध घेऊन सुयोग काय आहे हे ठरविणे, जाणणे हे आपली पुढची गती ठरविते. कर्मफळ कसेही असो मन मात्र समतेत राहू द्या. आलेल्या क्षणांमध्ये वर्तमानात राहून सत्कर्म करा. यातच तुमचे भविष्य दडलेले आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असेल त्याविषयी समवेत राहून सत्कर्म करत अंधारातून प्रकाशाकडे जा. व खूप सुख असेल तरी सत्कर्म करत प्रकाशातून प्रकाशाकडे जा… माझं नशीबच असं आहे म्हणून नशिबाला दोष देत बसू नका. सतत कार्यरत रहा, सत्कर्म करा. सदाचारी वा. नशीब बदलणे आपल्या हातात आहे. आज तुम्ही जे पेराल तेच भविष्यात उगवणार आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावाच लागतो, हे लक्षात ठेवा.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
