स्वप्रेमाची जादू – प्यार करो रे

आपण जेव्हा निसर्गात जातो तेव्हा खूष होतो, आनंदी होतो. मनमोकळेपणाने वावरत असतो. पण तेव्हा आजूबाजूच्या फुलावेलींचे निरीक्षण केले आहेत का? वेली, फुले मुक्तपणे डोलत असतात, नीटच निरीक्षण केले तर ती खूप आनंदी आणि खूष असतात. मस्त वाऱ्यावरून त्यांचा गंध इकडे तिकडे पसरत असतो. ही वेली, फुले आपल्यालाही आनंद देऊ करतात, आपले मन प्रसन्न करतात. निसर्गातल्या परमेश्वरनिर्मित या अजब सौंदर्याकडून आपल्याला काही तरी शिकता येईल. काय शिकता येईल तर स्वतःवर प्रेम करणे !
या तरुवेली स्वतःवर प्रेम करतात म्हणून त्या इतक्या उल्हसित दिसतात, त्यांना फुले येतात. ती आपल्याला आनंद देतातच, पण मुळात ती आधी स्वतःवर प्रेम करतात. म्हणूनच ती बहरतात, डोलतात, सुगंध देतात आणि वातावरणही प्रफुल्लित करतात.
यात एक महत्त्वाचं आहे काय आहे तर दुसऱ्याला आनंद, हर्ष देण्याआधी त्या स्वतःवर प्रेम करतात.
निसर्गाची ओढ माणसाला पूर्वीपासून आहेच. शहरातला माणूस पहा आठवडाभर सहा दिवस मान मोडून काम करतो. पण त्याला आठवड्या शेवटी किंवा महिन्यातून एकदातरी निसर्गाच्या सानिध्यात जायचे असते याचे कारणही तेच निसर्ग माणसाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो.
एकदा मी असाच एका वर्कशॉपमध्ये गेलो होतो. तिथे काम करणारा वर्ग हा बहुसंख्या महिला होत्या. सगळ्या जणी कामात तरबेज होत्याच. त्यांच्याशी संवाद साधताना मी सहजच त्यांना विचारले की, “भगिनींनो, तुम्ही स्वतःवर प्रेम करता का?” प्रश्न तसा खूप साधा होता, पण तरीही एवढ्या सर्व महिलांमधून काही मोजके हात वर आले. ही आश्चर्याचीच गोष्ट म्हणायला हवी. कारण स्त्री म्हटले की आपल्यासमोर येणारी प्रतिमा ही सर्वांवर प्रेम करणारी मायमाउली अशीच येते. पण याच माउलीला जेव्हा विचारले की काय बाई स्वतःवर प्रेम करता की नाही? तेव्हा मोजके हात वर आले. म्हणजे इतर सर्व माउली स्वतःवर प्रेमच करत नव्हत्या का? की त्यांना स्वतःवर प्रेम करायचे म्हणजे काय? स्वतःवर प्रेम का करायचे? असे प्रश्न पडले होते की काय? असा विचार माझ्या मनात डोकावून गेला.
मग हात वर केलेल्या महिलांना मी विचारले की, “बहिणींनो, समजा तुमच्या घरातले म्हणजे नवरा, मुलमुली सगळे बाहेरगावी गेले आहेत आणि घरी तुम्ही एकट्याच आहात. घरी कोणासाठी म्हणून काही करायचे नसले तरीही स्वतःसाठी आवडीचा पदार्थ बनवून खाता का?’ ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी आले. माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवानुसार हे उत्तर अपेक्षितच होते. सर्वसाधारण घरामध्ये स्त्रियांच्या बाबतीत हेच चित्र दिसते. घरातील गृहिणी असो की नोकरी, व्यवसाय करणारी स्त्री ती घरातल्या सर्वांच्या आवडीनिवडी जपत असते. घरातल्या मुलाने काही करून मागितले की देते कित्येक घरांमध्ये चार जणांच्या एकाच पदार्थाच्या वेगवेगळ्या आवडी असतात, ती वेळप्रसंगी चौघांसाठी त्या रांधून वाढते. पण एखादा दिवससुद्धा ती स्वतःच्या आवडीचा पदार्थ करेल याची खात्री नाही. घरातल्यांनाही तिच्या आवडी निवडीबद्दल फारशी माहिती असतेच असेही नाही. कित्येकदा आपल्या आईला, बायकोला नेमके काय आवडते या प्रश्नाचे उत्तर पुरुषांकडे नसते.
आपल्या समाजाची रचनाच अशी बांधली गेली आहे की त्यात स्त्रियांनी स्वतःचा विचार कायमच दुय्यम ठेवला आहे. आजी, आई, बायको म्हणून त्या सातत्याने घरातल्या पुरुषांचा विचार करतात गृहिणी किंवा नोकरदार स्त्री दोन्हीही घरासाठी काबाडकष्ट करत असतात. जेव्हा घरी एकट्या राहायची वेळ येते तेव्हाही त्या स्वतःच्या आवडीला प्राधान्य न देता काहीतरी करून खाण्याकडेच त्यांचा कल असतो. थोडक्यात सांगायचे, तर घर, संसार, पोरंबाळं, नवरा, आला गेला या सर्वांसाठी त्यांच्या आवडीनिवडी जपताना स्वतःच्या आवडीनिवडी त्या पार कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवतात. त्या इतरांच्या आवडीनिवडी जपण्यात इतक्या गुंतलेल्या असतात की जेव्हा त्यांना स्वतःसाठी काही पदार्थ बनवायची वेळ येते तेव्हाही त्या स्वतःला आवडणारा पदार्थ कोणता? असा विचार करत नाहीत.
मी मग त्या भगिनींना हेच सांगितले की इथे काहीतरी चुकतेय. तुम्ही इतरांच्या आवडी निवडीची काळजी घेता घेता स्वतःचा पूर्णच विसर पाडताय. मग खरंच तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? तुमच्या आवडीनिवडींचा विचार करता का? आवडीनिवडी जपण्यासाठी विशेष प्रयत्न करता का? या सर्वांची उत्तरे साहजीकच आता नकारार्थीच येणार. कारण स्वतःवर प्रेम करताना तुम्हाला स्वतःच्या आवडीचा विसर पडून चालणार नाही. म्हणूनच तुम्ही स्वतःवर खरंच प्रेम करता का हा प्रश्न स्वतःलाच एकदा विचारून पहा.
मघाशी म्हटलं तसं निसर्गाचे उदाहरण परत बघा. निसर्गातल्या तरुवेलींचे स्वतःवर प्रेम असते म्हणून तर त्यावर सुंदर फुले फुलतात, ती सुंदर फुले पाहणाऱ्याच्या डोळ्यांना सुखावतात. जर झाडाचे स्वतःवर प्रेम नसते तर ते डोलले नसते आणि त्यावर सुंदर फुलेही आली नसती. म्हणून आपल्याला त्यांनी आनंद दिला नसता.
घरातल्यांसाठी काबाडकष्ट करण्यात चूक नाहीच, पण स्वतःवर प्रेम करणे, आवडी जपणे हे देखील स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहे. इतरांच्या आवडी जपताजपता आपल्या मनाला कुठेतरी दुखावतो आहे असे नाही का वाटत?
आहात ना एक दिवस एकट्या, करा की मग आपल्या आवडीचे पदार्थ, स्वतःचे लाड करा, स्वतःला प्रेमाने खाऊ घाला. पदार्थाची, त्याच्या रूपाची, चवीची मजा घ्या. स्वतःच स्वतःला दिलेली कंपनी एन्जॉय करा. दुसऱ्याच्या आवडी जपता जपता त्या पदार्थाशी निगडित असलेल्या आठवणी, माणसं, प्रसंगांना पुन्हा उजाळा द्या. रमून जा त्या काळात जेव्हा तो पदार्थ तुम्हाला मनापासून आवडायला लागला होता. कदाचित मनाचा तळ ढवळला जाईल, आवडीचा पदार्थ किती आनंदांच्या स्मृती जागवेल, पुन्हा एकदा मनाला ताजेतवाने करेल. स्वतःचे लाड करून पहा.

 

आजपासून स्वतःचाही विचार करायला सुरुवात करा,

“दुनिया की छोडो,
पहले उसे खुश रखो ।
जिसे आप हररोज,
आईने में देखते हो ।
औरों को खुश रखते रखते,
आपने उसका दिल,
बार बार दुखाया है ।”

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

 

error: Content is protected !!