किंमत ही गोष्ट सापेक्ष आहे, कारण प्रत्येक गोष्टीची किंमत ही पैशात करता येत नाही. आई आपल्या मुलाला जन्म देते, माया, प्रेम करते, त्याला वाढवते, त्याची किंमत पैशात नक्कीच करता येणार नाही. मात्र व्यक्तीने आपले मोल ओळखले पाहिजे हेदेखील खरे आहे. आपले योग्य मोल जाणून घेण्यासाठी काय करायला हवे तर सजग रहायला हवे. एक छान गोष्ट वाचण्यात आली. २५० वर्षापूर्वीचे घड्याळ वडिलांनी मुलाला दिले व मार्केटमध्ये याची किंमत किती आहे ते मला सांग. असे वडील म्हणाले. घड्याळ घेऊन मुलगा किराणा मालाच्या दुकानात गेला. दुकानदार म्हणाला, हे माझ्या काय कामाचं? मला नको हे घड्याळ. तो एका जवाहिऱ्याकडे गेला. ते म्हणाले, “१०० रु. देईन.”
पुढे एका भंगारवाल्याकडे गेला. भंगारवाला म्हणाला, “चांगलं दिसतंय म्हणून ठेवून घेतो. याचे २० रु. देईन.” मुलगा म्युझियमवाल्याकडे गेला. तेथे गेल्यावर त्याने त्या घड्याळाचे ५,०००/- रु. देतो, मला म्युझियममध्ये हे हवंय म्हणून सांगितले.
अशा सर्व प्रकाराची वडीलांशी चर्चा केल्यानंतर वडील मुलाला म्हणाले,
“योग्य ठिकाणीच तुमची योग्य किंमत होते. ज्यांना आपली किंमत कळते तेच आपला आदर करतात, आपली किंमत ओळखा. ज्यांना आपली किंमत नाही त्या व्यक्तीपासून दूर रहा.”
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)
