आपली बलस्थाने ओळखा

जगात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही बलस्थाने असतात. आवाज, उंची, बुद्धी, कल्पनाशक्ती, अभिनय अशा अनेक गोष्टी आहेत, त्यांपैकी प्रत्येकाकडे काही ना काही असे विशेष असते. सर्वसाधारणपणे समाजात वावरताना किंवा अगदी कौटुंबिक पातळीवरदेखील आपल्यातील बलस्थानांपेक्षाही कमतरतांकडे अधिक लक्ष दिले जाते. काही वेळा तर लहानपणापासूनच बलस्थाने सांगण्याऐवजी मुलांना सातत्यान त्यांच्यातील कमी बाजू सांगितल्याने त्यांचा पार गोंधळ उडतो. विशेषतः मुलींच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. अजूनही आपल्या समाजाचा मुलींच्या प्रती असलेला पारंपरिक दृष्टिकोन याला कारणीभूत आहे. पण मुलगा असो किंवा मुलगी त्यांना लहानवयातच जर त्यांची बलस्थाने जाणवू दिली त्यावर काम केले तर ही मुले त्यांचे उत्तम भविष्य घडवू शकतील.
तीच गोष्ट मोठ्यांच्याही बाबतीत लागू होते. आपली बलस्थाने ओळखली पाहिजेत. खऱ्या अर्थाने जर आनंदात जीवन जगायचे असेल ना तर ही बलस्थाने ओळखून त्यावर विशेष काम करायला हवे. व्यक्तीच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित करून आपल्याला आयुष्य ज्याप्रकारे घडवायचे आहे तसे नक्कीच घडवता येऊ शकते.
उत्तम उदाहरण पाहूया. गानकोकिळा लता मंगेशकर, त्यांचा स्वर्गीय अनुभूती देणारा आवाजच आज आपल्या सर्वांना आठवतो आहे.या आवाजासाठी त्यांनी स्वतःवर किती बरे मेहनत घेतली असेल. वाचा आपण केवळ विचारच करू शकतो, कारण लताबाईइतकी मेहनत आणि कष्ट फार थोड्यांना जमणार असते. आज कितीतरी गाणी केवळ आणि केवळ लता मंगेशकर यांनीच गावीत आणि त्यांच्याच आवाजात आपण तो ऐकत रहावी अशीच आहेत. परिस्थितीने लताबाईंना खूप लहान वयातच कष्ट करण्याची वेळ आणली, पण त्यांनी आपले बलस्थान जाणले आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्या आवाजाच्या रूपाने आज आपल्या सर्वांच्या मनात अढळपद मिळवून गेल्या आहेत.
अशीच वक्तृत्वाची अमोघ कला असणारे प्राध्यापक शिवाजीराव भोसले. अमोघ वक्तृत्वाने समोरचा माणूस खिळून जाई. विषयाचा आवाका, अभ्यास आणि तो विषय मांडण्याची त्यांची हातोटी जबरदस्त होती. त्यांच्या व्याख्यानाला हजारो लोक गर्दी करत, तास दीड तास त्यांच्या अमोघ वकृत्वाने विषयाचा झरा वाहातच राही. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपली बलस्थाने ओळखा, ज्या बलस्थानामुळे लोकांचे भले होऊन तुम्हाला ही आर्थिक सुबत्ता येईल. अशा बलस्थानावर जास्त काम करा. व श्रीमंत अध्यात्मिक व्हा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!