दृष्टिकोन…

डोक्यावरचे केस कमी झाल्यामुळे थोडं टक्कल पडल्याची जाणीव मनातल्या एका कोपऱ्यात होत होती. परंतु एका कॉलेजमधील व्याख्यानानंतर एक प्रोफेसर मॅडम मला फोन करून माझ्या व्याख्यानाची व व्यक्तिमत्त्वाची खूप स्तुती करू लागली. मी तिला माझ्या टक्कलाविषयी बोलताच, माझ्या व्यक्तिमत्वाबाबत चर्चा करताना ती मला म्हणाली, ‘अनुपम खेर’ व ‘राजीव गांधी’ यांना पण टक्कल आहे. पण ही माणसे किती मोठी आहेत. आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व पण किती छान आहे, अशी उदाहरणे देऊन तिने मला सकारात्मक दृष्टिकोन दिला.
मित्रांनो, एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता? हे खूप महत्त्वाचे असते. सॉक्रेटिस दिसायला एकदम बेढभ आणि कुरूप होता. तो आपल्या खोलीमध्ये जाता-येता आरशामध्ये बघायचा. त्याला त्याच्या मित्राने याच्या मागचं कारण विचारलं. तू सारखा आरशासमोर उभे राहून आरशात का बघतोस ? त्यावेळेला सॉक्रेटिस त्या मित्राला म्हणाला, ‘मी चांगला दिसत नाहीये, हे मला माहित आहे. माझा चेहरा कुरूप आहे म्हणून मी आरशात पाहत असताना ही कुरूपता लपवण्यासाठी काहीतरी सुंदर, मोठं काम केलं पाहिजे असं माझं मन मला सांगते. मनाला वारंवार मोठं काम कर. ही प्रेरणा मिळवण्यासाठी मी आरशात बघत उभा राहतो.’ मग त्या मित्राने विचारले, ‘सॉक्रेटिस, तू अशा दृष्टिकोनातून आरशात बघत असशील, मग एखाद्या सुंदर माणसाने आरशात कशासाठी पहावं?’ त्या वेळेला सॉक्रेटिस त्याच्या मित्राला म्हणाला, ‘त्या सुंदर माणसाने आरशात बघत स्वतःच्या सुंदरतेला साजेसं असं काम करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळावी, असे वारंवार आपल्या मनाला सांगावं.’ खरोखर आहे.
मित्रांनो, आपला दृष्टिकोन आपलं जीवन ठरवतं. आपलं संपूर्ण जीवन हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. म्हणून मित्रांनो, दृष्टिकोन बदला म्हणजे जीवन बदलेल.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!