अध्यात्माची जोड आवश्यक

मित्रांनो,
आज माझ्यासकट आपण सर्वजण पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या मागे नुसते धावत सुटलेलो आहोत. खरंच का हो, पैसा आणि प्रतिष्ठा आपल्याला सुख देते? पूर्ण सुख जर पैसा आणि प्रतिष्ठेमध्ये असते तर मग अनेक मोठमोठे बिल्डर्स, उद्योजक, प्रतिष्ठित मंडळी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताना, डिप्रेशनमध्ये का दिसतात? उद्योजक आत्महत्या करताना दिसतात. अनेक राजकारणी, धनवान प्रतिष्ठित, धार्मिक, नेते, डॉक्टर्स, अगदी इतरांना कौन्सिलिंग करणारे मानसोपचार तज्ञसुद्धा तणावाखाली जगताना दिसतात. ते सगळे बघितल्यावर लक्षात येईल की, केवळ सत्तासंपत्ती आणि प्रतिष्ठा असल्यावरच आपले प्रॉब्लेम्स मिटतात असे नाही, तर उलट वाढू देखील शकतात.
लेखक ‘राजेंद्र गवस’ म्हणतात, ‘पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जगताना आपल्याला आपले छंद आवडीनिवडी, जोपासता यायला हव्यात. जीवनाची गाडी उत्तम चालवायची असेल तर, तिचा बॅलन्स साधता आला पाहिजे. त्यासाठी मध्यम मार्गाची खूप गरज आहे. आपण जीवनाच्या सर्व अंगांना व्यवस्थित स्थान दिले तर आपला स्ट्रेस कमी होऊन आपल्याला बराचसा काळ नॉर्मल, आनंदी सुखी जीवन जगता येईल. महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन म्हणतात, ‘आपले आयुष्य जगणे म्हणजे सायकल चालवण्यासारखे आहे.’ एका बाजूला आपली मिळकत, दुसऱ्या बाजूला आपली गरज यांचा बॅलन्स करत करत आपल्याला पुढेपुढे जायचे आहे. गरजेपेक्षा आपली मिळकत भरमसाठ वाढली, तरी प्रॉब्लेम्स ! मिळकतीपेक्षा गरजा भरमसाठ वाढल्या, तरी प्रॉब्लेम्स!’
म्हणून मित्रांनो,
पैसा व प्रतिष्ठा जरूर मिळवा, परंतु त्याच्या आहारी जाऊन अतिरेक करू नका. जीवनाला अध्यात्माची जोड द्या. संत, महंत म्हणतात, ‘अध्यात्माशिवाय जीवन जगणे खूप अवघड असते.’ त्यामुळे रोज शरीरासाठी योगा व मनासाठी ध्यानधारणा करा. पंचशीलाचे पालन करत, जीवनाच्या सर्व अंगानी संपन्न व्हा. यातच सुखाचे सार दडले आहे.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

-डॉ. दत्ता कोहिनकर

(सुखाचा पासवर्ड या पुस्तकातून)

error: Content is protected !!