गीता-सुशिक्षित, घरंदाज, सोज्ज्वळ मुलगी. लग्नानंतर दोनच वर्षात तिच्या पतीचे अपघाती निधन झाले. गीता साधु सासऱ्यांचा उत्कृष्ट सांभाळ करत होती. तिने त्यांच्याकडून नोकरीला जाण्याची परवानगी मागितली. सासरच्या लोकांनी त्यास विरोध केला. दिवसभराचा एकटेपणा तिला असह्य होत होता दिराच्या लग्नानंतर घरात जाऊ-गीता-सासू यांच्यात धुसपूस चालू झाली व गीताला मानसिक त्रास होऊ लागला. ती माहेरी येऊन रहावे असा विचार करत असताना, आईवडिलांनी गीता, “तु दिल्या घरी मेली” असा खणखणीत टोला देऊन तिला माहेरचा रस्ता नाकारला. गीता तिच्या
गुरुजीना भेटली व रडत रडत सर्व कहाणी तिने गुरुजीना सांगितली गुरुजी गीताच्या वडीलांना भेटून ती तरुण आहे, सासरचे लोक तिला त्रास देताहेत. तिला घरात घ्या व तिचे दुसरे लग्न लावून द्या असा सल्ला गीताच्या वडीलांना दिला असता, ते म्हणाले, “आमच्यात दुसरे लग्न करत नाहीत, पोरगी दिल्या घरी मेली.
मित्रांनो गीताची कहाणी ऐकून मला लंगड्या हत्तीची गोष्ट आठवली. एक हत्ती वर्षानुवर्षे लंगडत चालत होता. खूप उपचारानंतर पण त्याचे लंगडणे थांबले नाही. त्यावेळेस हत्तीचा मालक राजा हर्षवर्धन बुद्धांना भेटला व ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी हत्तीचा माहूत बदलण्याचा सल्ला दिला २१ दिवसात हत्ती लंगडण्याचे थांबवून नैसर्गिक चालू लागला. आश्चर्यचकित हर्षवर्धनने बुद्धांना याचे कारण विचारले असता बुद्धांनी त्यास सांगितले हा हत्ती माहूताचे अंधानुकरण करतोय याचा माहूत लंगडत चालतोय म्हणून हत्ती पण लंगडत चालत होता. असेच पुर्वापार चालत आलेल्या अनिष्ठ रूढींचे आपण आजही अंधानुकरण करतोय. खरोखर या लंगड्या हत्तीवर आज उपचार करण्याची गरज आहे.
आपला परिवार नागेबाबा परिवार
-डॉ. दत्ता कोहिनकर
(सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातून)
