दिल्लीला विमानानं गेल्यावर त्यादिवशी रात्री मला झोप लागली नाही. म्हणून मी किंग आर्थर (King Arthur) नावाचा चित्रपट बघितला. त्यातून मला एक खूप मोठी शिकवण मिळाली. ती आज मला तुम्हाला सांगायची आहे.
मुळात ती अशी आहे: मैत्री करू शकत असताना शत्रुत्व का पत्करायचं?
मी आता तुमच्यासाठी हा संदेश लिहिताना लंडनमध्ये आहे. या हॉटेलच्या खोलीत फारशा गोष्टी ठेवलेल्या नाहीत. खोलीची रचनाही जरा वेगळीच आहे. पावारोटी (Pavarotti) ऐकतोय. काल मी टेट मॉडर्न (Tate Modern) पाहून आलो (माझ्या सगळ्यांत आवडत्या आर्ट गॅलरीजपैकी एक), थेम्स नदीच्या काठाकाठानं काही तास फिरलो आणि मग माझ्या एका जुन्या मित्राबरोबर मस्त जेवण केलं (खरं म्हणजे, हा मित्र एवढा जुना नाही).
आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी गोष्टी घडत असतात, नाही का? वाद होतात. लोक आपल्याशी वाईट वागतात. काही गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, दुःख होतं.
मला तुम्हाला असं सुचवायचंय की सगळ्यांत आधी त्यांना माफ करा. ते जसं वागले ते त्यांच्या दृष्टीनं त्या क्षणी योग्य होतं. त्यांचा विवेक जागा असता तर कदाचित ते तसं वागले नसते. म्हणून, माफ करा त्यांना. हे लक्षात असू द्या की कोणाच्या आपल्याशी वाईट वागण्याला माफ करणं याचा अर्थ असा नाही की ते विसरून जाणं. माफ करणं म्हणजे सोडून देणं नाही, माफीचा अर्थ एवढाच होतो की त्यांच्या समजुतीप्रमाणे ते योग्य वागले हे तुम्हाला समजू शकते. म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकता. पुढे तुमच्या महत्त्वाच्या कामाला लागू शकता. कारण आयुष्य है जगण्यासाठी आहे.
दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला अशी सांगावीशी वाटतीय की स्वतःलाही माफ करा. तुम्ही एक माणूस आहात. त्यांनी जे केलं तोच विषय तुम्ही मनात धरून ठेवलात तर तुम्ही निराश होऊ शकता, दुःखी होऊ शकता. तुम्हाला राग येऊ शकतो, असं होण्यात चूक काहीच नाही. असं होऊच शकतं. इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या मनातल्या भावनांची जाणीव तुम्हाला असू द्या. ती जाणीव तुम्हाला झाली की तुम्ही तुमच्या भावनांची तीव्रता कमी कमी करत नेऊ शकता. मग या अन्यायाच्या, वैतागाच्या कडू आठवणी वर्षानुवर्षं मनात साठून राहत नाहीत. कारण ही साठवण आपल्यातली ऊर्जा, सर्जनशीलता, कार्यक्षमता, आपला आनंद, सगळंच हिरावून घेते.
खरी शिकवण काय आहे इथे? शत्रू बनवायची सवय लावून घेऊ नका. माणसं तोडायची सवय लावून घेऊ नका.
मला खूप आश्चर्य वाटतं. कितीतरी लोक त्यांच्या मनासारखं घडत नाही तेव्हा-मूर्खासारखे वागतात, भावनेच्या आहारी जातात. टोकाच्या प्रतिक्रिया देतात. लोकांशी संबंध जोडण्याऐवजी ते तोडतात. त्यापेक्षा जेव्हा लोक तुमच्याशी वाईट वागतील तेव्हा अशा सगळ्या संधींचा (किंवा शक्य तेवढ्या संधींचा) मित्र बनवण्यासाठी उपयोग करा. खूप सुंदर मार्ग आहे हा, तुमचं आयुष्य समृद्ध करण्याचा, नाही का?
होय, एक शत्रू असणं हेही खूपच आहे. इतक्या वर्षांचा लोकांशी संपर्क असण्याचा माझा अनुभव आहे. इतक्या सगळ्या वर्षांत माझ्याशी खरोखरच वाईट वागणारे फक्त तीन जण मला भेटले (मी त्यांना परत कधीही भेटणार नाही). खरंच. फक्त तीन.
बहुतेक लोक आपलं आपलं आयुष्य जगत असतात. दुखावलेले असतात ते इतरांना दुखावतात. त्रासलेले असतात ते इतरांना त्रास देतात. या सगळ्यांत तुम्ही मनानं मोठे व्हा. त्यांना संधी द्या आणि त्यावर ते काय करतात ते पहा. बहुतेक वेळा ते अनपेक्षित प्रतिसाद देतील. त्यांनी तसा प्रतिसाद नाही दिला तरी तुम्ही त्यांचे मित्र होऊ शकता, थोडे अंतर ठेवून.
आपला परिवार नागेबाबा परिवार
लेखक – अज्ञात
